दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप; विसर्जनासाठी कोणता मुहूर्त शुभ? जाणून घ्या पूजा-विसर्जनाची संपूर्ण पद्धत
Ganesh Visarjan : गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या उत्साहात घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाचा दीड दिवसांचा मुक्काम आज पूर्ण होत आहे.
Ganesh Visarjan : गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या उत्साहात घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाचा दीड दिवसांचा (Ganesh) मुक्काम आज पूर्ण होत आहे. काही घरांमध्ये दीड दिवस, तर काही ठिकाणी 5 किंवा 10 दिवस गणपतीची स्थापना करण्याची परंपरा आहे. प्रत्येक कुटुंबाच्या रूढी-परंपरेनुसार विसर्जनाचा दिवस ठरतो. त्यानुसार दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मंगळवार, 15 सप्टेंबर 2026 रोजी केले जाणार आहे.
गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर दीड दिवसांनी उत्तरपूजा करून मूर्तीचे विसर्जन करण्याची परंपरा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान्पिढ्या सुरू आहे. धार्मिक श्रद्धेसोबतच या परंपरेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातही विशेष स्थान आहे. त्यामुळे आज बाप्पाला निरोप देताना भाविकांकडून पूजा, आरती आणि नैवेद्य करून विसर्जनाची तयारी केली जाईल.
विसर्जनासाठी कोणते मुहूर्त शुभ?
महाराष्ट्रातील पंचांगानुसार, मंगळवार, 15 सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करता येईल. उपलब्ध पंचांगानुसार दुपारी 12:17 ते 1:48, त्यानंतर 3:20 ते 4:52 हा कालावधी शुभ मानला जातो. संध्याकाळी 7:52 ते 9:20 आणि रात्री 10:49 ते पहाटे 3:13 या वेळेतही विसर्जन करता येईल.
ओम नमस्ते गणपतये… च्या जयघोषाने दुमदुमला परिसर, दगडूशेठ गणपती समोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण
मात्र, विसर्जनाच्या मुहूर्ताच्या वेळेत शहरानुसार काही प्रमाणात फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या शहरातील पंचांगानुसार वेळ तपासणे योग्य ठरेल. शक्यतो राहुकाळात विसर्जन करणे टाळण्याची प्रथा आहे.
विसर्जनापूर्वी काय करायचे?
विसर्जनापूर्वी गणपती बाप्पाची नेहमीप्रमाणे पूजा करून आरती करावी. त्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवून उत्तरपूजा करावी. कुटुंबातील सर्व सदस्यांनी गणरायाचे दर्शन घेऊन सुख, समृद्धी आणि कुटुंबाच्या मंगलतेसाठी प्रार्थना करावी.
यानंतर गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेताना भाविकांकडून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ असा जयघोष केला जातो. भक्तिभावाने बाप्पाला निरोप देत दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता केली जाते.
यंदाच्या गणेशोत्सवातील प्रमुख तारखा
14 सप्टेंबर 2026 — गणेश चतुर्थी व गणपती स्थापना
15 सप्टेंबर 2026 — दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन
17 सप्टेंबर 2026 — गौरी आवाहन
18 सप्टेंबर 2026 — गौरी पूजन
25 सप्टेंबर 2026 — अनंत चतुर्दशी