महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद कोर्टात, 16 मार्चच्या सुनावणीकडे कुस्तीविश्वाचं लक्ष

कुस्ती संघटनांमधील मतभेद, स्पर्धांच्या नावांवरून निर्माण झालेले वाद, वेगवेगळ्या संघटनांचे दावे यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे..

  • Written By: Published:
Untitled Design 25

Maharashtra Kesari wrestling tournament dispute in court : राज्यातील प्रतिष्ठेची मनाली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गेल्या काही वर्षांपासून कुस्ती संघटनांमधील मतभेद, स्पर्धांच्या नावांवरून निर्माण झालेले वाद आणि वेगवेगळ्या संघटनांचे दावे यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. आता हा वाद न्यायालयात पोहोचला असून 16 मार्च रोजी पुणे सत्र न्यायालयात या प्रकरणाची महत्वाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणात इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघ यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे. या दाव्यामुळे 18 मार्चपासून पुण्यातील वाघोली येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ISWAI ने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा केला आहे की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाला महाराष्ट्र केसरी या ऐतिहासिक आणि पारंपरिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्याचा किंवा त्या नावाचे प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. या नावाचा आणि ब्रॅण्डचा गैरवापर होत असल्याचा आरोप देखील याचिकेत करण्यात आला आहे. नोंदणीकृत ट्रेडमार्क आणि संबंधित कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्यासाठीच ही याचिका दाखल करण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

नियम धाब्यावर, बंदी असून देखील खासदार निशिकांत दुबे यांनी सपत्नीक घेतले भीमाशंकरचे दर्शन

दरम्यान शनिवारी 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण आणि मनाच्या गदेचे पूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने रामकृष्ण सातव यांच्या वतीने ही स्पर्धा 18 मार्च ते 22 मार्च 2026 दरम्यान वाघोली येथे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

ISWAI चा दावा असा आहे की 1958 पासून ही संस्था हिंद केसरी, भारत केसरी आणि रुस्तम ए हिंद यांसारख्या प्रतिष्ठित अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करत आहे आणि या पदव्यांची ट्रेडमार्क धारक देखील आहे. या पदव्यांमुळे देशभरातील अनेक पिढ्यांतील पैलवानांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. म्हणूनच या पदव्यांची प्रतिष्ठा आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठीच न्यायालयात दाद मागितल्याचे संस्थेने म्हटले आहे.

16 मार्चची सुनावणी निर्णायक

या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 मार्च रोजी पुणे सत्र न्यायालयात होणार आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत 18 मार्चपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर स्थगितच सावट कायम राहणार असल्याचं चित्र आहे. म्हणूनच आता न्यायालयाच्या निर्णयाकडे कुस्तीपटू, आयोजक आणि क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

follow us