पारनेर कारखाना विक्री घोटाळा प्रकरण; पुण्यातील चोरडिया बंधूंची चौकशी होणार
Parner Sugar Factory Scam : पुण्यातील बडे उद्योजक अतुल चोरडिया व अशोक चोरडिया बंधूंना पारनेर पोलिसांनी नोटीसा बजाविल्या आहेत.
Parner Sugar Factory Scam : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर कारखाना (Parner Sugar Factory Scam) विक्रीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी महत्त्वाचे पावले उचलले आहेत. पुण्यातील बडे उद्योजक अतुल चोरडिया व अशोक चोरडिया बंधूंना पारनेर पोलिसांनी नोटीसा बजाविल्या असून, या दोघांची चौकशी पोलिस स्टेशनला हजर राहावे लागणार आहे. नऊ आरोपींच्या बँक खात्यावर 23 कोटी रुपये पाठविल्याचा आरोप या दोघांवर आहे.
पारनेरला सहकार साखर कारखाना होता. तो आर्थिक अडचणीत जाऊन बंद पडला होता. राज्य सहकारी बँकेने लिलावाद्वारे त्याची विक्री केली. पुणे जिल्ह्यातील एका नेत्याच्या संस्थेने हा कारखाना खरेदी केली. या विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याची तक्रार कारखान्याचे सभासद रामदास घावटे व बबनराव कवाद यांनी दाखल केली होती. त्यासाठी कारखाना बचाव समिती स्थापन केली होती. मात्र, पोलिसांना याची दाखल घेत नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु अनेक वर्षे तपास झाला नव्हता. आता संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
Video : महाराष्ट्रात पावसाची स्थि काय? किती टक्के तूट; कोणत्या जिल्ह्यांची स्थिती चिंताजनक?
नऊ जणांच्या खात्यांवर 23 कोटी रुपये पाठविले
पारनेर कारखाना लिलावात खरेदी करण्यासाठी चोरडिया बंधूंनी पुण्याच्या माजी खासदार विदुरा नवले यांच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या नऊ आरोपींच्या खात्यांवर सुमारे २३ कोटी रुपये पाठविले. संबंधित रक्कम क्रांती शुगर कंपनीत गुंतवण्याऐवजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला पाठवण्यात आल्याचा कारखाना बचाव समितीचा आरोप आहे. या व्यवहाराच्या माध्यमातून क्रांती शुगर कंपनीसाठी कारखान्याची मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या आर्थिक व्यवहारांवर आक्षेप घेत कारखाना बचाव समितीने तपासाची मागणी केली होती. रामदास घावटे यांच्या फिर्यादीवरून नवले कुटुंबातील संबंधित नऊ व इतर दोन अशा अकरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.
रक्कम करचुकवेगिरीतून मिळालेला काळा पैसा ?
रक्कम करचुकवेगिरीतून मिळवलेला काळा पैसा असल्याचा आरोप कारखाना बचाव समितीने केला आहे. संबंधित रकमेच्या माध्यमातून खरेदी दाखवून त्याच मालमत्तेवर 340 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात आल्याचा दावाही समितीने केला आहे. या सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून निधीचा स्त्रोत, संबंधित बँक व्यवहार आणि कारखाना खरेदीतील आर्थिक साखळी तपासावी, अशी मागणी कारखाना बचाव समितीने केली आहे. समितीचे वकील अॅड. रामदास घावटे यांनी याबाबत पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्याकडे निवेदन दिले होते.
पुढील आठवड्यात चौकशी होईल-दिवटे
पारनेर कारखाना विक्री संदर्भात आर्थिक व्यवहार प्रकरणी चोरडिया बंधूंना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. त्यांनी आजारी असल्याचे कारण दिले आहे. पुढील आठवडा त्यांची चौकशी होईल, असे पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी सांगितले.
चोरडिया बंधू यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही फोटो आहेत. ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या बांधकाम व्यवसायात भागिदार असल्याचे बोलले जात आहे.