Download App

Assembly Election 2024 : बीडमध्ये पवारांचे गणित चुकलंय; हक्काच्या जागा जाणार?

शरद पवार यांच्या उमेदवार निवडीची सर्वांनीच वाहवा केली. मात्र शरद पवार यांचे हे बलस्थानच विधानसभा निवडणुकीत कमजोरी बनतेय काय अशी परिस्थिती आहे.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्ट्राईकरेट सर्वाधिक होता. बीड लोकसभा मतदारसंघाची हायप्रोफाईल जागाही राष्ट्रवादीने जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यशामागे सर्वात महत्त्वाचे कारण होते उमेदवारांची निवड. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उमेदवार निवडीची सर्वांनीच वाहवा केली. मात्र शरद पवार यांचे हे बलस्थानच विधानसभा निवडणुकीत कमजोरी बनतेय काय अशी परिस्थिती आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील शरद पवारांची उमेदवाराची निवड चुकल्याचे बोलले जातेय.


उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून रसद; सरकारी अधिकाऱ्यांचा उल्लेख करत पवारांचा मोठा आरोप

बीड जिल्ह्यात आरक्षण आंदोलनाने मराठा समाज एकवटलाय. लोकसभेत मनोज जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. किंबहुना मराठा समाजाने निवडणूक हातात घेतली होती. याच लाटेवर स्वार होऊन विधानसभेत किंवा चार जागा जिंकणे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला शक्य होते. अगदी आकडेवारीच्या भाषेत बोलायचे झाले तर परळी आणि आष्टी विधानसभा मतदारसंघ वगळता चारही मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मताधिक्य मिळाले होते. परळीत पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची आघाडी मिळाली तर आष्टी मध्ये 32 हजार मतांनी त्या पुढे होत्या. त्यामुळे या दोन जागांवर प्रयत्न करत उर्वरित चार जागा सहज जिंकणे शक्य होते.
वीस वर्षांनी बीड जिल्ह्यात शरद पवारांचा खासदार निवडून आला तो फक्त बीड अन गेवराईच्या जीवावर. गेवराई विधानसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना 1 लाख 34 हजार 505, पंकजा मुंडे यांना 95 हजार 409 मते मिळाली. सोनवणे यांनी 39 हजार 096 मतांची आघाडी घेतली.

Maharashtra Politics : अशी ही घराणेशाही, काका, पुतणे, भाऊ, मुले यांचीच चलती!


गेवराई मतदारसंघात पवारांना मानणारा मतदार पण….

पण गेवराई उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने ‘मक्षिकापात’ केलाय. बदामराव पंडित हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले. त्यांच्या एकनिष्ठतेचेच फळ म्हणून त्यांना गेवराई विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. गेल्या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. वास्तविक गेवराईची जागा कधीच ठाकरेंच्या शिवसेनेने लढवलेली नाही. त्यामुळे या जागेवर महाविकास आघाडीत शरद पवार गटाचा दावा होता. मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या आघाडीच्या युवक प्रदेशाध्यक्ष पुजाताई मोरे इच्छुक होत्या. शेतकरी प्रश्नावर त्यांनी मोठ मोठी आंदोलने केली होती. 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अडवून फडणवीसांविरोधात राज्यभरात वातावरण तयार केले होते. सोनवणे यांच्याप्रमाणेच कोरी पाटी असलेल्या तरुण उमेदवाराला संधी दिली असती तर गेवराईतील लढत आणखी रंगतदार झाली असती. गेवराईतून तुतारीवर कोणीही उभा असता तरी आमदार झाला असता असे मतदारसंघात बोलले जाते.


माजलगाव मतदारसंघात आडसकरांची बंडखोरी नडणार?

माजलगाव मतदारसंघात भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यांना माजलगावातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता; गेल्यावेळी त्यांचा केवळ दहा हजार मतांनी पराभव झाला होता. परंतु ऐनवेळी मोहन जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मोहन जगताप भाजपमध्येच होते. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे काम केले होते. आता आडसकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केला असून विधानसभेच्या मैदानात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीस ‘हाबाडा’ देण्याची तयारी केलीय.


मस्के हे संदीप क्षीरसागरांचे काम करणार का ?

बीड विधानसभा मतदारसंघात सोनवणे यांना 61 हजार 681 मतांची आघाडी होती. यामध्ये जरांगे फॅक्टरचा मोठा हात होता. विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालेल, या आशेने मराठा चेहरा म्हणून राजेंद्र मस्के यांनाच उमेदवारी मिळेल, असे संकेत होते. परंतु शेवटी संदीप क्षीरसागर यांचेच नाव जाहीर केले. त्यामुळे मस्के नाराज झाले. आता त्यांनी बीड मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यावतीने हा अर्ज असल्याचे सांगण्यात आले. परंतु जरी अर्ज मागे घेतला तरी मस्के हे संदीप क्षीरसागर यांचे काम करणार का? हा प्रश्न आहे. कारण, काही दिवसांपूर्वी याच मस्केंनी क्षीरसागर मुक्त बीड करण्याचे आवाहन केले होते.


आष्टीत निष्ठावंत मेहबुब शेख पण निवडणुकीचे गणित बसेना?

आष्टी विधानसभा जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना उमेदवारी दिली आहे. एका निष्ठावंतांला उमेदवारी दिली यापेक्षा त्याला महत्त्व नाही. निवडणुकीचे गणित शेख यांच्या विरोधातच दिसत आहे. कारण तेथून भाजपने अनेक आमदार राहिलेले व मंत्री राहिलेले सुरेश धस यांच्यासारखा मराठा चेहरा मैदानात उतरविलाय. धससारख्या तगडा राजकारणासमोर शेख हे कसे निभाव धरतील हा प्रश्न आहे. कारण तसे मताचे समीकरणही बसत नाही.


परळीत मुंडे भाऊ-बहिणसमोर देशमुखांची निभाव लागेल का ?

परळी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे लीड मिळाले. राजेसाहेब देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने डाव लावला आहे. पण येथे लढत होईल की नाही हीच शंका आहे. बजरंग सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीत अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवला. पण विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सोनवणे यांनी उमेदवारी वाटपात हलगर्जीपणा केलाय हे दिसून येत आहे. त्यामुळे मुंडेंचा गड काबीज केल्याचा पवारांचा आनंद काही दिवस टिकेल. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मुंडे बंधू भगिनी बीड जिल्ह्यावर वर्चस्व मिळतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

follow us