एका बाजूला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेसवर कुरघोडी करत, दादागिरी करत सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतलेत. दुसऱ्या बाजूला तेच ठाकरे हातकणंगलेमध्ये आमचा पाठिंबा घ्या म्हणून महिन्याभरापासून राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या मागे लागले आहेत. त्यांना अक्षरशः पायघड्या घातल्या आहेत. पण शेट्टींनी अजूनही होकार दिलेला नाही. एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत एका पक्षाचा, व्यक्तीचा पाठिंबा मिळाला तरी समाधान असते, इथे तर तीन पाठिंबा घ्या म्हणून शेट्टींच्या दारात उभे आहेत. तरीही शेट्टी फटकून वागत आहेत. अनेकांना त्यांच्या या वागण्याचे कोडे उलगडेना झाले आहे. या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
खरंतर शेट्टींच्या या फटकवून वागण्याच्या भूमिकेमागे त्यांचा खरा राग ना राष्ट्रवादीवर आहे, ना शिवसेनेवर आहे. शेट्टींचा खरा राग आहे काँग्रेसवर आणि् गत लोकसभा निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यावर. त्यामुळेच ते कोणाचाही पाठिंबा नको, या मानसिकतेमध्ये आले आहेत. 2009 चाच प्रयोग पुन्हा करण्याच्या तयारीला ते लागले आहेत. (Raju Shetty has started preparing to fight on his own from Hatkanangle constituency without taking any support from anyone.)
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेस विचारांचा. काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांनी 1977 ते 1991 या काळात पाचवेळा संसद गाठली. त्यानंतर काँग्रेसकडून कल्लाप्पा आवाडे यांनी दोनदा विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर निवेदिता माने दोनवेळा खासदार झाल्या. 2009 मध्ये राजू शेट्टी यांनी मैदानात उडी घेतली आणि बाजीही मारली. त्यावेळी ते ना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर होते, ना भाजप-शिवसेनेच्या. पण ते निवडून आले होते. इस्लामपूर आणि शिराळा हे सांगलीतील दोन विधानसभा मतदारसंघ वगळता त्यांना कोल्हापूरमधील शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ या चारही विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली होती.
मराठा, जैन आणि लिंगायत या तीन समूहांचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वर्चस्व आहे. जैन समाजाचे सुमारे दीड लाख मतदान या मतदारसंघात आहे. स्वतः जैन असलेल्या शेट्टींनी या मतपेढीसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मते मोठ्या प्रमाणावर मिळवत आपले बस्तान बसवले. प्रामाणिक प्रतिमा तयार केलेल्या शेट्टींना सामान्य ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून चांगले पाठबळ मिळाले. रस्त्यावरची आंदोलने आणि सरकारसोबतची बंद दाराआडची चर्चा या दोन्हीतही ते तरजेब होते. त्याच आधारे अवघ्या दहा वर्षात त्यांनी जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार अशी मजल मारली होती.
2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी शेट्टींना भाजप, शिवसेनेच्या महायुतीमध्ये आणले. त्यांना सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात चांगली आघाडी मिळाली. काँग्रेसच्या कलाप्पा आवाडे यांना एक लाख 77 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. 2019 मध्ये मात्र शेट्टींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील नसल्याचे म्हणत महायुतीपासून फारकत घेतली. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणे पसंत केले. पण याच निर्णयाने त्यांचा घात केला आणि धैर्यशील मानेंचा फायदा झाला. तो कसा ते पाहण्यासाठी आपल्याला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पक्षीय रचना समजून घ्यावी लागेल.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना यापेक्षा राजू शेट्टी या नावाची ताकद आहे. कारण जिथे लोकसभेला राजू शेट्टी यांना चार ते पाच लाख मते मिळतात, तिथे विधानसभेला हातकणंगले आणि शिरोळ या पक्षाची ताकद असलेल्या दोन मतदारसंघात मिळून स्वाभिमानीला लाखभर मतेही मिळत नाहीत. महायुती आणि आघाडीमध्ये शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ या तीन मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. या तिन्ही जागेंवर 2014 मध्ये आमदारही निवडून आले होते. तर इचलकरंजी, शिराळ्यामध्ये भाजपची ताकद आहे. त्याचवेळी हातकणंगले, इचलकरंजी या मतदारसंघामध्ये काँग्रेसची तर इस्लामपूर आणि शिराळा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे.
2014 मध्ये शेट्टींना मोदी लाटेचा आणि भाजप-शिवसेना युतीच्या ताकदीचा फायदा मिळाला. 2019 मध्ये शिवसेना-भाजपच्या धैर्यशील मानेंना पराभूत करायचे तर शेट्टींना काँग्रेस, राष्ट्रवादीची मदत लागणार होती. पण शेट्टींना याच हातकणंगले आणि इचलकरंजीमध्ये आघाडी मिळाली नाही. तिथे त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या यंत्रणेवर अवलंबून रहावे लागण्याचा फटका बसला होता. हातकणंगलेमधून धैर्यशील मानेंना 45 हजारांचे तर इचलकरंजीमधून तब्बल 75 हजारांचे मताधिक्य घेतले. हेच मताधिक्य त्यांच्या विजयात महत्वपूर्ण ठरले. त्यामुळे काँग्रेसने आपले काम केले नाही, मदत केली नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला.
शाहूवाडीमधूनही मानेंना 24 हजारांचे लीड मिळाले होते. तिथे विनय कोरे यांच्याशी असलेले विळ्या-भोपळ्याचे वैर शेट्टींना महागात पडले होते. शिरोळ, इस्लामपूर आणि शिराळा या मतदारसंघांमधून मात्र शेट्टींना अनुक्रमे सात हजार, 19 हजार आणि 21 हजार असे लीड मिळाले. पण त्यांना ते विजयासाठी उपयोगात आले नाही. इचलकंरजी आणि हातकणंगलेमधून मानेंना मिळालेले लीड शेट्टींना शेवटपर्यंत तोडता आले नाही. यंदा इचलकरंजी आमदार प्रकाश आवाडे काँग्रेससोबत नाहीत. तिथे काँग्रेस म्हणजे आवाडे आणि आवाडे म्हणजे काँग्रेस असे गणित होते. ते आवाडे आता भाजपच्या वळचणीला गेले आहेत. त्यामुळे एकदा काँग्रेसकडून तोंड पोळल्यानंतर आता शेट्टी पुन्हा रिस्क घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत…कदाचित म्हणूनच शेट्टींनी 2009 मधील स्वबळाचा प्रयोग पुन्हा एकदा करण्याचे धोरण अवलंबले असल्याचे दिसून येते आहे.