महादेव जानकर (Mahadev Jankar) कोणासोबत जाणार याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. आपण माढा (Madha) आणि परभणी (Parbhani) या मतदारसंघांमधून लढणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे. पण या दोन्ही जागा महायुतीत त्यांच्या वाट्याला येतील याची शक्यता जवळपासही नाही. कारण माढ्यात भाजपचा विद्यमान खासदार आहे, तर परभणीमध्ये शिवसेनेचे. तिथे राष्ट्रवादीनेही दावा ठोकला आहे. अशात जानकर सोबत आल्यास त्यांना माढ्याची जागा देऊ असे सांगत पवार यांनी राजकीय डाव टाकल्याचे बोलले जात आहे. जानकरांना सोबत घेत पवार आणि ठाकरे यांनी पाच गणिते डोक्यात ठेवल्याचे बोलले जात आहे. (if Mahadev Jankar, comes with us he will be given the Madha Lok Sabha constituency.)
यातील पहिले तर राज्यातील धनगर मतांवर डोळा :
महादेव जानकर सोबत आल्यास राज्यातील मोठ्या प्रमाणात धनगर मते महाविकास आघाडीच्या बाजून येतील असे कयास बांधले जात आहेत. राज्यातील 30 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक मते आहेत. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धुळे, सांगली, अकोला, परभणी, लातूर, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात बऱ्यापैकी धनगर समाजाची लोकसंख्या आहे. 2014 च्या निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता विराजमान करण्यात धनगर समाजाचा मोठा वाटा होता. आता याच मोठ्या प्रमाणातील धनगर समाजाच्या मतांवर पवार यांचा डोळा असल्याचे दिसून येते.
भाजपपासून धनगर नेता बाजूला करणे :
महादेव जानकर गेल्या दहा वर्षांपासून भाजपसोबत आहेत. यातील केवळ पशुसंवर्धन सारख्या दुय्यम खात्याचे तीन वर्षांचे मंत्रिपद त्यांच्या वाट्याला आले. आता ठाकरे भाजपपासून दुरावले आहेत. शेट्टींनी भाजपपासून फारकत घेतली आहे. जानकर यांनाही भाजपपासून दुर केले तर गोपीनाथ मुंडे यांनी 2014 मध्ये जी महायुती आकारला आणली होती त्यावर एक मोठा घाव बसू शकतो. त्यातच फडणवीस यांनी विरोधात असताना ज्या पद्धतीने धनगर आरक्षणाचा मु्द्दा त्या पद्धतीने सत्तेत आल्यानंतर त्यांना सोडविण्यात यश आलेले नाही. पवार जानकर यांना सोबत घेऊन धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रचाराचा तापवू करु शकतात.
माढ्यात निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार :
माढा मतदारसंघ शरद पवार यांच्याकडे असला तरी पवारांकडे सध्या तिथे सक्षम उमेदवार नाही. तिथे विजयसिंह मोहिते पाटलांनी पवारांची साथ सोडल्यानंतरच या मतदारसंघावरुन राष्ट्रवादीचा होल्ड गेला. अशात अजित पवार राज्यातील सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे हे उघडपणे रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा देत आहेत. 2019 मध्ये ज्या संजय शिंदे यांनी निंबाळकरांविरोधात निवडणूक लढविली होती त्या शिंदेंनींह निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची घोषणा केली आहे.
फलटणचे रामराजे निंबाळकर अजितदादांसोबत आहेत. माण खटावचे जयकुमार गोरे आधी काँग्रेससोबत होते आता ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे माढ्यात शरद पवार यांच्याकडे एकही सक्षम चेहरा नाही. अशात जानकर सोबत आले तर माढ्यात पवार यांना निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार मिळू शकतो. सध्या ठाकरे गटाच्या लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवण्याची चर्चा सुरु आहे. पण हाके यांना 2019 च्या विधानसभेला एक हजार मतेही मिळविता आली नव्हती. त्या तुलनेत जानकर यांनी 2019 मध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय अवघड केला होता.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना सेफ करणे :
पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर मतांचा आपल्याला फायदा होऊ शकतो अशी शक्यता पवारांना वाटत आहे. माढ्याची जागा जानकरांना दिल्यानंतर बारामती लोकसभेची गणितही सोपे होतील, या तालुक्यांमधील धनगर मतदार हे सुप्रिया सुळे यांना साथ देतील, असा राजकीय कयास त्यामागे दिसून येत आहे. जानकर यांचाही बारामती मतदारसंघात मोठा संपर्क आहे. त्याचाही वापर सुळे यांच्यासाठी करुन घेता येईल अशी आशा पवारांना आहे.
परभणीत संजय जाधवांना सेफ करणे :
परभणी मध्ये सध्या संजय जाधव खासदार आहेत. ते ठाकरे गटाचे असून त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. अशात जानकर यांना माढ्याची जागा सोडल्यास ते परभणीतून आपला दावा मागे घेतील आणि जावध यांच्यासाठी परभणीचा सामना सोपा होऊ शकतो, अशीही समीकरणे मांडली जात आहेत. त्यामुळेच पवार आणि ठाकरे यांच्यासाठी जानकर सोबत येण्याची अपेक्षा वाटत आहे. आता पवार यांच्या या दाव्याबाबत जानकर कसा आणि काय विचार करतात, ते सोबत येतात का, महाविकास आघाडीची ऑफर स्वीकारणार का? या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरणार आहे.