Nashik Dindori Lok Sabha Election 2024 : नाशिक आणि दिंडोरी, दोन्ही मतदारसंघ महायुतीसाठी प्रतिष्ठेचेच. काही करून इथं बाजी मारायची अशी तयारी नेत्यांनी केली होती. यासाठी भाजपाची यंत्रणाही कामाला लागली होती. संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन येथे तळ ठोकून होते. जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी त्यांनी झोकून देऊन काम केलं. तरीदेखील नाशिक आणि दिंडोरीमध्ये काही ठिकाणी कमी मतदान झालं. त्यामुळे आता महाजनांनी बूथनिहाय मतदानाच्या टक्केवारीचा अहवाल मागवला आहे. त्यांच्या या निर्णयाने येथील स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
Ground Report : नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचं वजन वाढलं, त्यांची मतेच ठरवणार ‘नाशिकचा’ खासदार!
नाशिकमध्ये भाजपने जोर लावला होता. अजित पवार गटानेही या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण शिंदेगटाने अखेरपर्यंत दावा सोडला नाही. त्यामुळे दिल्लीतून नाव पुढे आलेलं असताना छगन भुजबळांना माघार घ्यावी लागली. हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात आले. दिंडोरीतही नाराजी असताना केंद्रीय मंत्री भारती पवार यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. कांद्याच्या मुद्द्यावर भारती पवार आणि एकूणच महायुतीच्या नेत्यांना येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.
त्यामुळे महायुतीला येथे प्रतिकूल वातावरणात जागा जिंकण्याचा इरादा महायुतीचा होता. यासाठी गिरीश महाजन येथे तळ ठोकून होते. मतदान वाढविण्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखली. मात्र तरीही नाशिकमधील तीन मतदारसंघांसह दिंडोरीत अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ज्या भागात भाजपाची ताकद आहे तिथेच कमी मतदान झाले. या प्रकाराची गंभीर दखल महाजन यांनी घेतली.
प्रत्येक नाशिककरांना गोडसेंचा परिचय; उमेदवारी जाहीर होताच भुजबळांनी सांगितलं पुढचं प्लॅनिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या मतदारसंघात सभा झाली होती. यानंतर येथील प्रचाराची सर्व सूत्रे महाजनांनी आपल्या हाती घेतली. रणनिती ठरवली. नाराजांशी वन टू वन चर्चा केली. त्यांची नाराजी घालवण्यात यश मिळवले. प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन त्याला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले. इतके सगळे केल्यानंतरही मतदान कमी झाले. त्यामुळे गिरीश महाजन यांनी ज्याठिकाणी कमी मतदान झाले तेथील बूथनिहाय अहवाल मागवला आहे.
ग्रामीण भागातील तीन मतदारसंघांपेक्षा नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाले आहे. या तिन्ही ठिकाणी भाजपचेच आमदार आहेत. जिल्हा परिषदेत भाजपचीच ताकद आहे. तसेच शहरात महायुतीचे माजी नगरसेवक आहेत. नाशिक मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार आणि दिंडोरी महायुतीचे सर्व सहा आमदार आहेत. इतकी मोठी राजकीय ताकद असतानाही कमी मतदान झालं आहे. त्यामुळे येथील बूथनिहाय अहवाल गिरीश महाजन यांनी मागवला आहे. महाजनांच्या या कार्यवाहीने पदाधिकारी, नेते आणि आमदारांची धाकधूक मात्र वाढली आहे.