सिंहासन चित्रपटातील एक सिन आहे. मुख्यमंत्र्यांना घालवून विश्वासराव दाभाडे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. त्यासाठी ते फिल्डिंग लावत असतात. याच फिल्डिंगचा एक भाग म्हणून ते कामगार नेते डिकास्टा यांना भेटायला बोलवतात. दोघांची भेट होते, त्यावेळी दोघांमधील एक डायलॉग त्यावेळी प्रचंड गाजला होता. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मी नव्या मुख्यमंत्र्यांना सचिवालयासमोर चपलेने मारेन… कोणतीही आर्थिक ताकद नाही. सोबत आमदार-खासदार नाहीत. तरीही एका साध्या कामगार नेत्याचे एका मुख्यमंत्री होऊ पाहणाऱ्या मंत्र्यांला अशा भाषेत बोलण्याचे धाडस झाले होते. याचे कारण होते डिकास्टा यांचे असणारे उपद्रव मुल्य.
राजकारणात आपल्यासोबत आमदार-खासदार नसले तरी उपद्रव मूल्याच्या आधारे तुम्ही किंगमेकर ठरु शकता. उपद्रव मूल्य म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला, संस्थेला, सरकारला अडचणीत आणणारी कृती. इतिहासात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, दत्ता सामंत, बाबा आढाव, एन.डी. पाटील शेतकरी नेते शरद जोशी अशा नेत्यांची संसदेत किंवा विधानसभेत जास्ती ताकद नव्हती. पण या नेत्यांचे उपद्रव मुल्य होते. हे नेते आपल्या एका हाकेवर आंदोलन उभे करु शकत होते, आपल्या एका इशाऱ्यावर आमदार आणि खासदार निवडून आणू शकत होते. त्यामुळे अशा नेत्यांना राजकारणी आणि सरकारही घाबरुन असायचे. या नेत्यांनी ताणून धरले तर सरकारही गुडघ्यावर यायचे.
नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाविकास आघाडीने असाच धसका घेतला आहे तो वंचित बहुजन आघाडीचा. आजच्या घडीला प्रकाश आंबेडकरांकडे एकही आमदार नाही की खासदार नाही. तरीही ते राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. काही दिवसांपूर्वी आंबेडकर (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) सहभागी झाले, पण जागा वाटपाची बोलणी फिस्कटताच तडक वेगळेही झाले. त्यांच्या या भुमिकेनंतरही महाविकास आघाडीचे नेते आंबेडकरांसाठी आशादायी आहेत. ते परत येऊ शकतात, त्यांनी परत यावे असे नेते म्हणत आहेत. आंबेडकर मात्र या नेत्यांना फारसे भाव देताना दिसले नाहीत. त्यांनी त्यांचे उमेदवारही जाहीर करुन टाकले. त्यांच्या याच आक्रमकतेचे कारण आहे कारण ते त्यांना माहिती असलेले त्यांचे उपद्रव मुल्य. याच उपद्रव मुल्याचा धसका महाविकास आघाडीला आहे.
2019 मध्ये आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु होती. पण यंदाप्रमाणे त्यावेळीही अशीच चर्चा फिस्कटली आणि आंबेडकरांनी एमआयएमसोबत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. आघाडीला या न जुळलेल्या मैत्रीचा मोठा फटका बसला. लोकसभेला साधारण 15 वंचितच्या उमेदवारांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरची मते घेतली होती. ही मते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बहुजन मतदारांनी दिल्यामुळेच विभागल्याचे बोलले गेले. आकडेवारीतही जेवढी मते वंचितया उमेदवारांनी घेतली होती, तेवढ्या किंवा त्याहुन कमी मतांच्या फरकाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. याशिवाय औरंगाबादची जागाही काबीज केली होती.
1. नांदेड – मुख्य लढत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्यामध्ये झाली होती. या सामन्यात अशोक चव्हाण यांचा फक्त 40 हजार मतांनी पराभव झाला होता. इथे वंचितच्या यशपाल भिंगे यांनी तब्बल एक लाख 66 हजार 196 मते घेतली होती.
2. बुलढाणा – मुख्य लढत शिवसेनेचे प्रतापराव जाधव विरुद्ध राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये झाली होती. शिंगणे यांचा एक लाख 33 हजार 287 मतांनी पराभव झाला होता. या मतदारसंघात वंचितच्या बळीराम सिरस्कारांनी पावणे दोन लाख मते घेतली होती.
3. गडचिरोली-चिमूर – मुख्य लढत भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसच्या डॉ. नामदेव उसेंडी यांच्यामध्ये झाली होती. यात उसेंडी यांचा 77 हजार 526 मतांना पराभव झाला होता. इथे वंचितचे उमेदवार रमेश गजबेंनी एक लाख 11 हजार 468 मते मिळाली होती.
4. परभणी – मुख्य लढत शिवसेनेचे संजय जाधव विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांच्यामध्ये झाली होती. विटेकर यांचा केवळ 42 हजार 199 मतांनी पराभव झाला होता. इथे वंचितच्या आलमगीर खान यांनी दीड लाख मते घेतली होती.
5. सोलापूर – मुख्य लढत भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी विरुद्ध काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यामध्ये झाली होती. यात शिंदे यांचा 1 लाख 58 हजार 608 मतांनी पराभव झाला होता. तर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी एक लाख 70 हजार मते मिळवली होती.
6. हातकणंगले – मुख्य लढत शिवसेनेचे धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यामध्ये झाला होता. यात शेट्टी यांचा 95 हजार मतांनी पराभव झाला होता. तर वंचितच्या अस्लम सय्यद यांनी सव्वा लाख मते घेतली होती.
7. सांगली – मुख्य लढत भाजपच्या संजयकाका पाटील विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विशाल पाटील यांच्यामध्ये झाली होती. यात विशाल पाटील यांचा एक लाख 64 हजार मतांनी पराभव झाला होता. वंचितच्या गोपीचंद पडळकर यांनी तब्बल तीन लाख मते मिळाली होती.
8. यवतमाळ – मुख्य लढत शिवसेनेच्या भावना गवळी विरुद्ध काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. इथे ठाकरे यांचा 55 हजार मतांनी पराभव झाला होता. तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवीण पवार यांनी 65 हजार मते घेतली होती.
9. अकोला – मुख्य लढत भाजपचे संजय धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे हिदायतुल्लाह पटेल यांच्यामध्ये झाली होती. पटेल यांचा दोन लाख 75 हजार मतांनी पराभव झाला होता. तर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी दोन लाख 78 हजार मते घेतली होती.
10. हिंगोली – मुख्य लढत शिवसेनेचे हेमंत पाटील विरुद्ध काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यामध्ये झाली होती. वानखेडे यांचा दोन लाख 77 हजार मांनी पराभव झाला होता. इथे वंचित बहुजन आघाडीच्या मोहन राठोड यांचा एक लाख 74 हजार मतांनी पराभव झाला होता.
11. उस्मानाबाद – मुख्य लढत शिवसेनेच्या ओमप्रकाश राजेनिंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्यामध्ये झाली होती. पाटील यांचा एक लाख 27 हजार मतांनी पराभव झाला होता. तर वंचितच्या अर्जुन सलगर यांनी 98 हजार मते घेतली होती.
12. बीड – मुख्य लढत भाजपच्या प्रीतम गोपीनाथ मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांच्यामध्ये झाली होती. सोनावणे यांचा एक लाख 68 हजार मतांनी पराभव झाला होता. त्याचवेळी वंचितच्या विष्णु जाधव यांनी 92 हजार मते घेतली होती.
13. औरंगाबाद – मुख्य लढत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विरुद्ध काँग्रेसच्या सुभाष झांबड यांच्यामध्ये झाली होती. तर वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील यांनी तीन लाख 89 हजार मते घेतली होती. इथे अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनीही 2 लाख 84 हजार मते घेतली होती. या मतांचा फटका शिवसेनेला बसला होता. तर वंचित बहुनज आघाडीने राज्यातील एकमेव जागा जिंकली होती.
थोडक्यात काय तर राज्यातील किमान 15 जागांवर तरी वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर महत्वाचा ठरला होता. याचा थेट फायदा भाजप आणि शिवसेनेला झाला होता. आता यंदा आता ही एक गठ्ठा मते पुन्हा वंचित बहुजन आघाडीलाच मिळणार का? की वंचितची हवा वारऱ्यात विरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे?