राजस्थानमध्ये मतदारांनी परंपरेप्रमाणे सत्ताबदल करत भाजपला मोठा विजय मिळवून दिला. 199 पैकी 115 जागा जिंकत भाजपने (BJP) पूर्ण बहुमत मिळविले. त्यामुळे आता पाच वर्षे राजस्थानमध्ये भाजप ‘राज’ असणार हे निश्चित झाले आहे. मात्र हे राज कोणाच्या नेतृत्वात असणार या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. (BJP has nine names in the forefront for the post of new Chief Minister in Rajasthan)
पक्षाकडून पुन्हा जुन्या जाणत्या नेत्याला मुख्यमंत्री केलं जाणार की, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. भाजपने प्रचारात ‘मोदी की गॅरेंटी’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याच नावावर मते मागितली. पण आता राजस्थानमध्ये मोदींच्या मनात मुख्यमंत्री म्हणून कोण आहे, मोदींचा गॅरेंटर कोण होणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असणाऱ्या नऊ जणांमध्येच रस्सीखेच आहे. यात काहींचं नाण खणखणीत तर काहींचं कमकुवत असल्याचे चित्र आहे.
प्रशासकीय कामाचा अनुभव आणि स्थानिक राजकारण याचा अभ्यास लक्षात घेता राजस्थानच्या मुख्यमंत्री म्हणून वसुंधराराजे यांचे नाव आघाडीवर आहे. वसुंधराराजे मुख्यमंत्री व्हाव्या यासाठी 60 टक्के आमदारांनी पाठिंबा दिल्याचा दावा समर्थकांनी केला आहे. त्यामुळे जरी पक्षाकडून राजेंना डावलण्यात आले तरी त्यांच्याकडील पाठिंबा बघता बाजू भक्कम दिसून येत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान वसुंधराराजेंनी राजस्थानमध्ये एकूण 50 ठिकणी सभा घेतल्या ज्यात 36 ठिकाणी भाजपचं कमळ फुलण्यास मदत झाली.
दुसऱ्या बाजूला आमदारांच्या पाठिंब्याची संख्यबळ लक्षात घेता वसुंधराराजेंचे पारडे जरी जड दिसत असले तरी, गेल्यावेळच्या सत्तेतील कार्यकाळात राजेंचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्यात खटके उडाल्याच्या चर्चा होत्या. यातूनच मागील 5 वर्षात पक्षाकडून त्यांना फारसं महत्त्व न देता साईड लाईन केल्याचेही चित्र बघायला मिळाले. याचाच परिणाम म्हणजे त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतील उपाध्यक्षपदाशिवाय कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती. याशिवाय 2014 मध्ये मोदींच्या मंत्रिमंडळात राजस्थानला डावलण्यात आल्याचाही मुद्दा गाजला होता.
बाबा बालकनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्तीय मानले जाते. हरियाणा, राजस्थान आणि आसपासच्या भागात रोहतकमधील मठाचा चांगला प्रभाव मानला जातो. हिंदुत्व कार्डात बसते, ध्रुवीकरण भाजपसाठी सोपे होईल. एखाद्या ऋषी किंवा संताला मुख्यमंत्री केल्याने भ्रष्टाचार होणार नाही असा सकारात्मक संदेश जनतेला जाऊ शकतो. निकालाच्या पहिल्या दिवसापासूनच बाबा बालकनाथ यांच्या नावाची दिल्लीपासून राजस्थानच्या गल्लीपर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या नावाची चर्चा सुरु आहे.
दिया कुमारी या महाराजा सवाई सिंह आणि राणी पद्मिनी देवी यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. राजघराण्याची पार्श्वभूमी असणाऱ्या दिया कुमारी यांना वसुंधराजेंचा पर्याय मानले जात आहे. भाजपने महिला कार्ड खेळले तर त्याचा फायदा होईल. केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक आणले आणि भाजप हायकमांडच्या वतीने महिला वर्गाला महत्त्व देण्याचा संदेश देण्यासाठी दिया कुमारी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा विचारही केला जाऊ शकतो. याशिवाय त्या राजकीय कुशाग्रतेसाठीही ओळखल्या जातात. दिया कुमारी सध्या राजस्थान भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी आहेत.
या नावांशिवाय राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अश्विनी वैष्णव, अर्जुन मेघवाल, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, आमदार किरोडीलाल मीणा आणि छत्तीसगडचे निवडणूक प्रभारी ओम माथूर यांच्या नावाचीही चर्चा आहे. यातील एका एका नावावर झटपट नजर टाकूया :
गजेंद्र सिंह शेखावत : केंद्रीय मंत्री आहेत. मोदी आणि शहा यांच्या जवळ आहे. शेखावत यांचा राजकीय प्रभावही आहे. ते प्रदेशाध्यक्षपदाचेही दावेदार राहिले आहेत.
अश्विनी वैष्णव : केंद्रीय मंत्री आहेत. टेक्नोक्रॅट वैष्णव यांचे व्यवस्थापन चांगले मानले जाते. भाजपने मागील निवडणुकीत राजपूत आणि ब्राह्मणांची तिकिटे कमी केली होती. अशा स्थितीत कदाचित शेखावत किंवा वैष्णव यांना मुख्यमंत्रीपदाची नावाची लॉटरी लागू शकते.
ओम माथूर :छत्तीसगडमध्ये त्यांच्यावर निवडणूक प्रभारीची जबाबदारी देण्यात आली होती. इथे भाजपला विजयी होऊ याची शाश्वाती नव्हती तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे छत्तीसगड माथूर यांनी रणनीती आखत विजय खेचून आणला. माथूर यांना संधी दिल्यास मारवाड आणि मेवाडची राजकीय समीकरणे सोडवण्यास भाजपला मदत होईल.
सीपी जोशी : स्वच्छ प्रतिमेच्या जोशी यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने प्रदेशाध्यक्ष बनवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. जोशी संघाशी संबंधित आहेत. जोशी हे यापूर्वी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्याशी संबंधित कोणताही वाद नाही.
अर्जुन मेघवाल : आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा सर्व जागा जिंकण्यासाठी आणि राजस्थानमधील दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी मेघवाल यांचा विचार केला जाऊ शकतो. दुसरी महत्वाची बाब म्हणजे मेघवाल मोदी आणि शहा यांच्या जवळचे आहेत. 2014 मध्ये आयएएस पदाचा राजीनामा देत ते मोदींच्या टीममध्ये आले. मात्र, त्यांचा राजकारणातील अनुभव लक्षात घेता आणि त्यांना आमदारांना मिळणारा पाठिंबा या सर्वांचाही विचार केला जाऊ शकतो.
किरोडीलाल मीणा : मीणा फायर ब्रँड नेते आहेत. मागील चार वर्षांपासून त्यांनी सातत्याने पेपरफुटी आणि इतर मुद्दे समोर आणून गेहलोत यांच्या खेळीने कोमात गेलेल्या भाजपला सक्रिय केले. अनेक मुद्दे उपस्थित केल्याने गेहलोत अडकले. जातीच्या आधारावर पाहिले तर त्यांची एससी आणि एसटी या दोन्ही समाजात प्रतिमा आहे. तळागाळात पकड असल्यामुळे ते निदर्शने आणि आंदोलनांमध्ये सहज समर्थक गोळा करतात. त्यामुळे त्यांच्याही नावाचा विचार केला जाऊ शकतो.