Download App

नितीश कुमार यांना पुन्हा भाजपसोबत आणण्याची स्क्रिप्ट लिहिणारे ‘सात’ अदृश्य हात…

पाटणा : चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज (28 जानेवारी) एनडीएच्या विधिमंडळ नेतेपदीही निवड करण्यात आली. गेल्या 10 वर्षात नितीशकुमार भाजपसोबत येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी 2014 मध्ये भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलासोबत (RJD) सरकार स्थापन केले होते. त्यानंतर 2017 मध्ये ते पुन्हा भाजपसोबत सत्तेत आले होते. पण 2022 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी पलटी मारली आहे. (Nitish Kumar has decided to go with BJP. He was also elected as the legislative leader of NDA.)

यावेळी नितीश कुमार यांना भाजपसोबत आणण्याची स्क्रिप्ट थेट दिल्लीवरुन लिहिल्याची चर्चा आहे. या स्क्रिप्टनुसार राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह यांना संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते आणि पक्षाची सारी सुत्रे नितीश कुमार यांनी स्वतःच्या हातात घेतली होती. तिथेच नितीश कुमार मोठा निर्णय घेऊ शकतात अशा चर्चांना सुरुवात झाली होती. नितीश कुमार यांना पुन्हा भाजपसोबत आणण्यासाठी भाजप आणि संयु्क्त जनता दलाकजून सात नेत्यांची कोअर कमिटी बनविण्यात आली होती. याच कोअर कमिटीने चर्चांनी नाव किनाऱ्यावर लावली आहे.

नेमके कोण होते हे सात नेते, पाहुया…

1. नित्यानंद राय – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे अमित शाह यांचे विश्वासू मानले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या बाजूने नित्यानंद राय हेच या अभियानाचे नेतृत्व करत होते. गुरुवारी नितीश कुमार भाजपमध्ये सामील झाल्याची बातमी बाहेर आली तेव्हा नित्यानंद राय यांनी मित्रपक्षांची समजूत काढण्यास सुरुवात केली होती. रात्री उशिरा राय माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या निवासस्थानीही दिसले होते. नित्यानंद राय हे बिहार भाजपचे अध्यक्षही राहिले आहेत आणि सध्या ते उजियारपूरचे खासदार आहेत.

अखेर नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा होणार शपथविधी

58 वर्षीय राय यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2000 मध्ये राय पहिल्यांदा हाजीपूर मतदारसंघातून आमदार झाले. 2014 मध्ये त्यांना उजियारपूर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले. नितीश कुमार यांच्या नव्या सरकारमध्ये राय यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते, असे बोलले जात आहे.

2. सुशील मोदी – नितीश कुमार यांना भाजपमध्ये आणण्यात माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. मोदी हे नितीश कुमार यांच्या खूप जवळचे आहेत आणि नितीश वेळोवेळी त्यांचे कौतुक करत असतात. नितीश कुमार यांना भाजपमध्ये आणण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या स्क्रिप्टमागे सुशील मोदींचा हात असल्याचे बोलले जाते. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राजकारण हा शक्यतांचा खेळ असून त्यात कायमची दारे कधीच बंद होत नाहीत.नितीश कुमार यांना सुशील मोदींना उपमुख्यमंत्री बनवायचे आहे. मात्र, भाजप हायकमांडकडून याला ग्रीन सिग्नल दिला जात नसल्याचे सांगितले जात आहे.

3. संजय कुमार झा – युतीबाबत संयुक्त जनता दलाच्यावतीने संजय कुमार झा सर्वात अवघड अशी चर्चेची कामगिरी पार पाडत होते. झा सध्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि नितीश सरकारमध्ये मंत्री आहेत. नितीश कुमार यांच्यानंतर संजय झा हे एकमेव नेते आहेत ज्यांनी संघटना आणि सरकार या दोन्ही पदांवर काम केले आहे. 2017 मध्येही नितीश कुमार यांना भाजपसोबत जाण्यात झा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2022 मध्ये संयुक्त जनता दलाचे खासदार लालन सिंह यांनी हा खुलासा केला होता.

यावेळीही नितीशकुमार भाजपसोबत जाणार असल्याची बातमी समोर येताच झा यांना सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, संजय झा या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीला गेले होते, तिथे त्यांनी नितीश कुमार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या स्क्रिप्टवर काम केले होते. मात्र, दिल्लीहून परतल्यानंतर झा यांनी नितीश यांच्या इंडिया आघाडीतच राहण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला.

झा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला भाजपमधून सुरुवात केली, पण 2012 मध्ये ते संयुक्त जनता दलात दाखल झाले. 2014 मध्ये नितीश कुमार यांनी त्यांना दरभंगा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती, पण त्यांचा पराभव झाला. संजय झा यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवून राज्य मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले. सध्या झा यांच्याकडे जलसंपदा आणि जनसंपर्क ही खाती आहेत. झा हे नितीश यांच्या किचन कॅबिनेटचे सदस्यही मानले जातात.

लालू-तेजस्वींवर दुहेरी संकट, ईडीकडून पुन्हा समन्स, 9 फेब्रुवारीला हजर राहण्याचे निर्देश

4. हरिवंश – राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनीही स्क्रिप्ट लिहिण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हरिवंश हे नितीशकुमार यांच्या जवळचे मानले जातात. नितीश जेव्हा भाजप सोडून राजदमध्ये दाखल झाले तेव्हा हरिवंश यांनीही हे पद सोडल्याची चर्चा होती. मात्र, नितीश यांनी त्यांना पदावरून हटवले नाही. हरिवंश यांनीच भाजप हायकमांडला नितीश कुमार यांच्यासोबत एकत्र येण्यास तयार केल्याचे म्हटले जाते.

2017 मध्येही हरिवंश यांच्या सांगण्यावरूनच नितीश यांनी राजदला सोडली आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या हरिवंश यांना नितीश कुमार यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर पाठवले होते. 2018 मध्ये हरिवंश राज्यसभेचे उपसभापती झाले, तेव्हापासून ते या पदावर आहेत.

5. विनोद तावडे – विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी आहेत. गुरुवारी नितीशकुमार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असताना तावडे यांनी स्वत: बड्या नेत्यांची बैठक घेऊन या चर्चांना अंतिम स्वरुप दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा नितीश भाजपमध्ये सामील झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या, तेव्हा तावडे यांनीच नितीशकुमार यांच्या विरोधात बडे नेते काहीही बोलणार नाहीत याची काळजी घेतली होती.तावडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात आणि 2022 मध्ये त्यांना बिहारचे सरचिटणीस आणि प्रभारी बनवण्यात आले होते.

6. केसी त्यागी – संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते आणि नितीश कुमार यांचे सल्लागार केसी त्यागी यांचाही या मोहिमेत प्रामुख्याने सहभाग आहे. त्यागी यांची भूमिका मीडिया मॅनेजमेंट आणि मेसेंजरची असल्याचे सांगितले जाते. त्यागी नितीश यांचा भाजपपर्यंत आणि भाजपचा संदेश नितीशपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होते. त्यागी यांनी नितीशकुमार भाजपमध्ये येण्याचे पहिले संकेतही दिले होते. 30 डिसेंबर 2023 रोजी त्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो. हापूरचे लोकसभेचे खासदार असलेले केसी त्यागी हे नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जातात. त्यागी यांचा मुलगा अमरीश त्यागी सध्या भाजपमध्ये आहे.

7. विजय चौधरी – संयुक्त जनता दलाच्या वतीने नितीश कुमारांच्या या मोहिमेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विजय चौधरी यांच्यावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम लालन सिंह यांना संयुक्त जनता दलाच्या अध्यक्षपदावरून हटवावे लागले, त्यासाठी चौधरी यांना पुढे करण्यात आले. त्यांनी लालन सिंह यांच्याशी बोलून अध्यक्षपदाची निवड सुरळीतपणे पार पडेल याची खात्री केली. 22 जानेवारीला नितीश कुमार राज्यपालांना भेटायला गेले तेव्हा विजय चौधरीही त्यांच्यासोबत होते.

चौधरी हे वित्त आणि संसदीय विभागाचे मंत्री आहेत आणि ते नितीश कुमार यांच्या किचन कॅबिनेटमधील सदस्य मानले जातात. काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे चौधरी 2005 मध्ये नितीश यांच्यासोबत आले. 2010 मध्ये त्यांना बिहारचे संयुक्त जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष देखील बनवण्यात आले होते. चौधरी यांनी जलसंपदा, गृह, शिक्षण, अर्थ या मोठ्या खात्यांचे मंत्रीपद भूषवले आहे.

भाजपसाठी नितीश महत्त्वाचे आणि नितीशसाठी भाजप महत्त्वाचे का?

1. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. 2019 मध्ये नितीश कुमार यांच्यासोबत भाजपने 39 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी पक्षाची स्थिती नाजूक आहे. बिहारबाबत आतापर्यंत आलेल्या सर्व जनमत चाचण्यांमध्ये निकराची लढत दिसून आली आहे. त्यामुळेच भाजप हायकमांड नितीश यांना सोबत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

2. नितीश कुमार यांच्याकडे फार मोठा जनाधार नाही, पण वातावरण निर्माण करण्यात नितीश माहीर आहेत. नितीश यांच्या प्रयत्नांमुळेच भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी निर्माण झाली. अशा परिस्थितीत भाजपला 2024 साठी कोणताही धोका पत्करायचा नाही.

3. नितीशकुमार यांनाही भाजपचा पाठिंबा आवश्यक आहे. नितीशकुमार यांच्या पक्षातील अनेक बडे नेते आणि त्यांचे निकटवर्तीय ईडी, आयटी आणि सीबीआयच्या रडारवर आहेत. यामध्ये आमदार राधाचरण सेठ, विजय चौधरी यांचा मेहुणा अजय सिंग उर्फ ​​कारू आणि लालन सिंग यांचे निकटवर्तीय गब्बू सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.

follow us

वेब स्टोरीज