मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे 16 आमदार अपात्र ठरणार की नाही? अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रश्नाचा अखेर खटका पडणार आहे. येत्या 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) या संबंधीचा निर्णय देणार आहेत. जर शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरले तर राजकीय संकेतांनुसार त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे एक तर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर होईलच, याशिवाय शिंदे चुकीचे होते आणि ठाकरे बरोबर होते, हा संदेशही लोकांपर्यंत जाईल. (Will Speaker Rahul Narvekar resign before the verdict on the disqualification petition of Chief Minister Eknath Shinde and 16 MLAs)
एकूणच शिंदेंच्या विरोधात निर्णय गेल्यास आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाजपला ही गोष्ट चांगलीच महागात पडू शकते. या सर्व शक्यता लक्षात घेऊन दुसऱ्या बाजूला भाजपच्या काही राजकीय चाणाक्यांच्या डोक्यात एक राजकीय खेळी आल्याची चर्चा आहे. भाजपच्या या खेळीमुळे आत्ता शिंदेंची खुर्ची तर वाचेलच पण आगामी निवडणुकांपर्यंत अपात्रतेसंदर्भात कोणताही निर्णय लागणार याचीही सोयही होऊ शकते.
मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र झाल्यास सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवाय भाजपलाही हा निर्णय डोकेदुखीचा ठरु शकतो. कारण मुख्यमंत्र्यांसह 16आमदार अपात्र झाल्यास सर्वांचे पुनर्वसन कसे करायचे? हा मोठा प्रश्न असणार आहे. याशिवाय शिंदे चुकीचे होते आणि ठाकरे बरोबर होते, हा संदेशही लोकांपर्यंत जाईल. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिंदेंचे बंड चुकीचे होते, अनैतिक होते असा संदेश गेल्यास भाजपला फटका बसू शकतो. याच सगळ्या शक्यता लक्षात घेऊन येत्या दोन ते तीन दिवसांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राजीनामा देण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईतून भाजपकडून राहुल नार्वेकरांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे कारण पुढे करुन नार्वेकर राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. हे कारण एक तर नैतिकही ठरले आणि शिंदेंचाही निर्णय लांबणीवर टाकणारा ठरेल. राहुल नार्वेकर यांनीच राजीनामा दिल्यास नवीन येणाऱ्या अध्यक्षांना सुनावणीची प्रक्रिया नव्याने राबवावी लागेल, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा वेळ वाढवून घेणे आणि निर्णय लांबणीवर टाकणे हे कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे, असे सांगितले जात आहे.
राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्या जागी कोण? याबाबत चाचपणी सुरु असल्याचे बोलले जाते. कारण उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याच विरोधात सध्या अपात्रतेची याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे संविधानिक नियमानुसार त्यांच्याकडे सुनावणीसाठी हे प्रकरण येणार नाही. अशावेळी सभागृहातील ज्येष्ठ सदस्य भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्याकडे ही जबाबदारी येऊ शकते. किंवा भाजप आपल्याच पक्षातील दुसऱ्या आमदाराची अध्यक्ष म्हणून नेमणूक करेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे, लता सोनावणे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, चिमणराव पाटील, महेश शिंदे. यातील एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, हे आमदार मंत्रीपदी आहेत.