Download App

चव्हाण, भुजबळांचा पत्ता कट; फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्तारात दडलेले 6 संदेश

रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते डोंबिवलीतून 77106 मतांनी विजयी झाले.

  • Written By: Last Updated:

मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जवळपास 21 दिवसांनंतर काल (दि.15) महायुती सरकारचा मंत्रिमंडळ (Mahayut Government Cabinet Expansion) विस्तार पार पडला. यात फडणवीस सरकारमध्ये 39 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला 19, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9 मंत्रीपदे देण्यात आली आहे. यात 33 आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर सहा आमदारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून, या मंत्रिमंडळात काही माजी मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्तारात काही संदेश दडलेले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. (6 Hide Message From CM Devendra Fadnavis Cabinet Expansion)

भरत गोगावले सर्वात कमी शिकलेले मंत्री, तर 23 मंत्र्यांवर गुन्हे नोंद; मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक वाचा एका क्लिकवर

सर्व समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून महायुतीने सर्व समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबई विभागाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.

फडणवीसांना फ्री हँड मिळाला नाही का?

रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते डोंबिवलीतून 77106 मतांनी विजयी झाले. त्यामुळे चव्हाणांना मंत्रिमंडळात निश्चित स्थान मिळेल, अशी चर्चा होती. विधानसभा निवडणुकीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये भाजपच्या विजयाचे श्रेय रवींद्र चव्हाण यांना दिले जात आहे. मात्र अखेरच्या क्षणी त्यांचे नाव मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या हायकमांडने फ्री हँड दिला नाही का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

“..तर मी सुद्धा अडीच महिन्यांसाठी CM होऊ शकतो” ; फडणवीसांसमोरच अजितदादांचं वक्तव्य

मित्रपक्षांना आकर्षित करण्याचे प्रयत्न

भाजपने शिवसेनेपेक्षा दुप्पट आणि राष्ट्रवादीपेक्षा तिप्पट जागा जिंकल्या आहेत. जागांनुसार सरकारमधील सहभागाचा वाटा पाहिला तर भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीला जास्त मंत्रिपदे दिली आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागा 132, 57 आणि 41 आहेत तर या तीन पक्षांकडे अनुक्रमे 19, 11 आणि 9 मंत्रीपदे आहेत. आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बेरीज केली तर ही संख्या 20, 12 आणि 10 होईल. मात्र, भाजपने मंत्रिमंडळ विस्तारात युतीचे तत्त्व पाळत ‘मोठ्या भावाची’ भूमिका बजावत मित्रपक्षांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

दबाव निर्माण करणाऱ्या दिग्गजांचा पत्त कट

महायुतीच्या मंत्रिंडळ विस्तारात काही माजी दिग्गज मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील, भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. छगन भुजबळ हे केवळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाहीत, तर ते महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) सर्वात ज्येष्ठ नेते मानले जातात. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. 1995 मध्ये पहिल्यांदा स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये, त्यानंतर 2014 मध्ये फडणवीस सरकारमध्ये आणि 2022 मध्ये शिंदे सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. तर, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजपचे रवींद्र चव्हाण यांनाही मंत्री करण्यात आलेले नाही. याशिवाय अर्जुन खोतकर यांच्यासह तानाजी सावंत यांचाही पत्ता करण्यात आला आहे. मात्र, सत्तार, भुजबळ यांसारख्या दबाव निर्माण करणाऱ्या मंत्र्यांचाच पत्ता कट करण्यात आल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.

बावनकुळे, सरनाईक अन् शिरसाट फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 3 रिक्षाचालक झाले मंत्री!

परफॉर्मंन्स पहिली अट

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये 25 नवीन चेहऱ्यांना स्थान मिळाले असून त्यात चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, मकरंद पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशिष जैस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक अशोक उईके, आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या 12 कॅबिनेट मंत्र्यांना फडणवीस यांच्या सरकारमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. यामागे प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचे करण्यात आलेले ऑडिट हा निष्कर्ष ठेवण्यात आल्याचा स्पष्ट संदेश CM फडणवीसांनी दिला आहे.

संघटनेची ताकद आणि विजय मिळवून देणाऱ्यांवर नजर

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पक्षाला संघटनात्मक पातळीवर मदत करणाऱ्या आणि अधिकाधिक जागांवर विजय मिळवून देणाऱ्या नेत्यांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे असे करताना भाजपकडून अनेक ज्येष्ठ नेत्यांची नाराजी पक्षाने ओढावून घेतली आहे. यवतमाळ वाशीममधून निवडणुकीत विजयी झालेले युवा नेते अशोक उईके यांना पक्षाने संधी दिली आहे. भुसावळ मतदारसंघातून विजयी झालेले संजय सावकारे हेही मंत्री झाले आहेत. या दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या विजयासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी मेहनत घेतल्याने त्यांना संधी देण्यात आली आहे.

follow us