Sanjay Shirsat : शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटाने भाजपाशी हातमिळवणी केली. तेव्हा शिंदे गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदे मिळाली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही. अजूनही शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदाची प्रतिक्षा आहे. त्यातच आता मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राजकीय चर्चा सुरू आहेत. यानंतर आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असा आरोप शिरसाट यांनी केला.
Sanjay Shirsath : स्वाभिमान गाडला गेला, आता लोकांची पालखी वाहावी; शिंदेंच्या आमदाराचा ठाकरेंना टोला
संजय शिरसाट यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, जयंत पाटील अजित पवारांसोबत येणार होते त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता. तेच शरद पवारांनाही सांगणार होते. जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे असून मनाने इकडेच आहेत. ते आले तर येतील पण त्यांच्यामुळेच मंत्रिमंडाळाचा विस्तार रखडला होता असे शिरसाट म्हणाले.
जयंत पाटील हे भाजपसोबत येणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता. भाजपासोबत जाण्याचा प्रस्तावच त्यांनी मांडला होता. आमदार आणि आपण सर्व सोबत जाऊन शरद पवारांना सांगू अशी चर्चाही केली होती. आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत. त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणूनच ते तिकडे थांबले असतील, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
जाणीवपूर्वक विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे दाखल, जयंत पाटील धावले ठाकरेंच्या मदतीला
तसं पाहिलं तर मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाट आणि भरत गोगावले, बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. अजित पवार गटाची एन्ट्री होण्याआधी या चर्चा सुरू होत्या. अजित पवार गट सत्तेत आल्यानंतर त्यांच्याबरोबरील आमदारांना मंत्रिपदे मिळाली. त्यामुळे शिरसाटांची मंत्रिपदाची संधी हुकली. यानंतर निवडणुका जवळ आल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर आता संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तार रखडण्यासाठी जयंत पाटलांनाच जबाबदार धरले आहे. त्यामुळे यावर आता जयंत पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.