सिंघानिया आणि गोदरेज कुटुंबानंतर, देशातील आणखी एक उद्योगपती कुटुंब प्रॉपर्टीच्या वादातून चर्चेत आले आहे. प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी Baba Kalyani) यांच्या कुटुंबातील हा वाद आहे. कल्याणी कुटुंबाच्या व्यवसाय साम्राज्यात भारत फोर्ज सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. जवळपास 75 हजार कोटींची ही संपत्ती असल्याचे सांगितले जाते. दोन भावांकडे असलेल्या परस्पर विरोधी मृत्युपत्रांचा हा वाद आहे. पण ही दोन्ही मृत्युपत्रे चुकीची असल्याचा दावा करत या मृत्युपत्रांना बहीण सुगंधा हिरेमठ यांनी आव्हान दिले आहे. या दोन्ही मृत्युपत्रांवर आता दिवाणी खटला चालवला जाणार आहे. (Dispute over property in the family of famous industrialist Baba Kalyani)
डॉ. नीलकंठ अनुप्पा कल्याणी व त्यांच्या पत्नी सुलोचना कल्याणी यांच्या निधनानंतर हा वाद सुरू झाला. 2012 मध्ये बाबा कल्याणी व 2022 मध्ये त्यांचे बंधू गौरीशंकर कल्याणी यांनी मृत्यूपत्र दाखल केली. ही दोन्ही मृत्युपत्रे परस्पर विरोधी आहेत. पहिले मृत्यूपत्र हे बाबा कल्याणी यांना फायदा पोहचविणारे आहे तर दुसरे मृत्यूपत्र गौरीशंकर कल्याणी यांना फायदा देणारे आहे. पण ही दोन्ही मृत्युपत्रे चुकीची असल्याचा दावा करत बहीण सुगंधा हिरेमठ यांनी या न्यायालयात आव्हान दिले.
न्यायालयाने या मृत्युपत्रांना थेट दाखल करून न घेता हा खटला दिवाणी न्यायालयाकडे सुनावणीसाठी वर्ग केला. आता दाखल करण्यात आलेल्या दोन परस्पर विरोधी मृत्युपत्रांवर आता दिवाणी खटला चालविला जाणार आहे. या मृत्युपत्रांच्या सत्य-असत्यतेवर उहापोह केला जाणार आहे.
बाबा कल्याणी आणि गौरीशंकर कल्याणी यांनी दाखल केलेली ही मृत्युपत्रे जबरदस्तीने तयार केली असल्याचा आरोप सुगंधा हिरेमठ यांनी केला आहे. सुगंधा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे आहे की, दोन्ही भावांनी वेगवेगळ्या वेळेस आपल्या आईवर दबाव टाकून मृत्यूपत्रे तयार केली. पहिले मृत्यूपत्र बनविण्यात आले त्यावेळी आई बाबा कल्याणी यांच्यासोबत राहत होती. त्यावेळी तिचे गौरीशंकर यांच्याशी संबंध बिघडले होते. तर दुसऱ्यांदा सही केलेल्या मृत्युपत्रावेळी आई गौरीशंकर यांच्यासोबत राहत होती.
यावरून हे स्पष्ट आहे की, कुटुंबाच्या संपत्तीवर त्यांचा संपूर्ण ताबा राहील यासाठी बाबा कल्याणी आणि गौरीशंकर यांनी आईच्या देखभालीच्या काळात तिच्यावर दबाव टाकून, तिचे शोषण करून मृत्युपत्रे बनवली. त्यामुळे दोन्ही मृत्युपत्रे वैध नाहीत. म्हणूनच मालमत्ता वारसाहक्काने वारसदारांमध्ये विभागली गेली पाहिजे. त्यातून एक तृतीयांश वाटा त्यांनाही मिळू शकेल. याशिवाय मृत्युपत्रांमध्ये काही मालमत्तांचा समावेश करण्यासाठी त्यांचा आक्षेप आहे. वडिलांनी आणि आजोबांनी कमावलेल्या संयुक्त कल्याणी कुटुंबाच्या मालमत्ता आहेत. त्यामुळे त्या कायदेशीररित्या मृत्युपत्राद्वारे दिल्या जाऊ शकत नाहीत.
आता पुणे न्यायालयाने या प्रकरणातील मृत्युपत्रांच्या अर्जांना दिवाणी खटल्यात रूपांतरित केले आहे. यामुळे या अर्जावर आता सुनावणी होणार असून, सर्व पक्षांना आपल्या हरकती नोंदवता येणार आहेत. मृत्युपत्रांचे हे प्रकरण दिवाणी न्यायालयात पोहोचल्याने कल्याणी कुटुंबाच्या सर्व संपत्तीवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यताही अधिक बळकट झाली आहे. आज घडीला कल्याणी ग्रुपमध्ये भारत फोर्ज लिमिटेडसह आठ सूचीबद्ध कंपन्या आहेत. आठ सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 75 हजार 600 कोटी रुपये आहे. एकट्या भारत फोर्जचे मार्केट कॅप 58, 105 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये कल्याणी कुटुंबाचा 45.25 टक्के हिस्सा आहे. शिवाय सोने, चांदी, हिऱ्यांचे किमती दागिने, संपूर्ण महाराष्ट्रातील स्थावर संपत्तीचा समावेश आहे.
कल्याणी कुटुंब आणि हिरेमठ कुटुंबात गेल्या वर्षापासून हा वाद सुरू आहे. हिकल या रासायनिक कंपनीच्या नियंत्रणावरून वादाला सुरूवात झाली. 1993 आणि 1994 च्या कौटुंबिक करारानुसार कंपन्यांच्या शेअर्सचे (भारत फोर्ज, कल्याणी स्टील आणि कल्याणी फोर्जसह) वितरण आणि बाबा कल्याणी यांच्याकडे असलेले हिकलचे शेअर्स त्यांची बहीण सुगंधा यांना हस्तांतरित करण्याशी संबंधित हा वाद आहे. बाबा कल्याणी यांनी या करारांचे उल्लंघन केल्याचा कुटुंबाच्या मालमत्तेबद्दल त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. आता नेमका हा वाद आगामी काळात कोणत्या दिशेने जाणार? संपत्ती कोणाला मिळणार? न्यायालय कोणाचा पक्ष ऐकून घेणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.