छत्रपती संभाजीनगर : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेला बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य (वय 7) अखेर सुखरूप घरी परतला आहे. जाफ्राबाद-भोकरदन रस्त्यावर झालेल्या एका अपघातग्रस्त गाडीच्या ड्रायव्हरकडे केलेल्या चौकशीनंतर या अपहरण प्रकरणाचा छडा लागला. त्यानंतर चैतन्यला आळंद येथील शेतवस्तीतून ताब्यात घेण्यात आले. अत्यंत फिल्मी स्टाईलनं हे बिंग फुटल्यानंतर या प्रकरणात ड्रायव्हरसह चार आरोपींना अटक केली आहे. (Chaitanya, the son of builder Sunil Tupe, who was kidnapped for a ransom of Rs 2 crore, has finally returned home safely.)
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील तुपे हे शहरातील नामांकित बिल्डर आहेत, तर त्यांचे भाऊ वरिष्ठ शासकीय अधिकारी आहेत. सुनील कुटुंबासह एन-4 मधील सेक्टर एफ-1 मध्ये वास्तव्यास असतात. मंगळवारी रात्री नऊ सुमारास सुनील तुपे दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते. यावेळी चैतन्यचा लहान भाऊ वडिलांसोबत होता. चैतन्य सायकलवरून घरापासून एन-4 च्या रस्त्याच्या दिशेने जात होता.
त्याचवेळी मागून काळ्या रंगाची कार आली. त्याच्या सायकलच्या बाजूलाच अपहरणकर्त्यांनी कार उभी केली. चालकाच्या मागील बाजूने दोघे जण उतरले. एकाने चैतन्यला उचलून चालकाच्या डाव्या बाजूने कारमध्ये कोंबले. दुसऱ्याने सायकल चालवत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन फेकली. त्यानंतर अपहरणकर्ते चैतन्यला घेऊन हनुमान चौकाच्या दिशेने सुसाट निघून गेले.
चैतन्य बराच वेळ घरी परत न आल्याने तो लांब गेला असेल, या शंकेने सुनील तुपे आजूबाजूच्या परिसरात शोध घेत होते. तेवढ्यात त्यांच्या मोबाइलवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉलवरील व्यक्तीने त्यांना आधी मराठी व नंतर हिंदीतून ‘बच्चा चाहिए तो दो करोड देना पडेंगे’ असे धमकावले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांचा विविध पथकांकडून तपास सुरू झाला.
रात्री उशिरापर्यंत परिसरातील बांधकाम साइटव मजूर, तुपे यांच्या बांधकाम साइटवरील कामगार, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिस माहिती घेत होते. सुनील यांना कॉल केल्यानंतर अर्ध्या तासातच अपहरणकर्त्यांचा मोबाइल पाल फाट्याच्या पुढे बंद झाला. त्यामुळे शोध घेणे आव्हानात्मक बनले होते. पोलिसांनी सर्व मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी केली. अशात मध्यरात्री पेट्रोलिंग दरम्यान, जाफ्राबाद-भोकरदन रस्त्यावर आसाई फाट्याजवळ एक अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जावून जखमी प्रणव शेवत्रे याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याला मार लागला होता. पोलिसांना चौकशीदरम्यान, संशय आल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अपहरण केल्याचे कबूल केले. त्यानंतर पथक तयार करून इतर तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तर मुलगा चैतन्य तुपे याला आळंद येथील शेतवस्तीतून सुखरूप सोडवून आणले.