कोणीही असू दे, संतोष देशमुखांच्या प्रत्येक मारेकऱ्यावर कारवाई होणार! CM फडणवीसांचा बीडमध्ये जाऊन इशारा
बीड : स्वर्गीय संतोष देशमुख यांचा अतिशय निघृण खून झाला. पण मी आपल्याला सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होईल, हा विश्वास मी तुम्हाला देतो असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बीडमध्ये जाऊन गुन्हेगारांना इशारा दिला. ते आष्टी उपसा सिंचन क्र.३ शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन कामाची पाहणी, बोगदा कामाचे भूमिपूजन समारंभात बोलत होते. (Chief Minister Devendra Fadnavis went to Beed and warned that Santosh Deshmukh’s killers will not be spared.)
फडणवीस म्हणाले, आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते. त्यांनी माझ्याकडे अनेक मागण्या केल्या. पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्याबाबतची मागणी केली. मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो.
वाल्मिक कराडला ‘उच्च’ दिलासा! ईडी चौकशी होणार नाही…
माझी बीडच्या जनतेला विनंती आहे, आपण सगळे सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली. आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे नांदायचं आहे. एक नवीन बीड आपण तयार करू. सुरेश धस, पंकजा मुंडे यांनी बीडचा जो इतिहास सांगितला तोच इतिहास आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. यासाठी आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नात मी खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे, असा विश्वासही त्यांनी दिला.
सुरेश धस मागे लागले की डोकं खावून टाकतात :
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशासमोर आणले. या घटनेतील मारेकऱ्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी त्यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरले, अनेक मोर्चे देखील काढले होते. धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनाही या प्रकरणात लक्ष्य केले आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. सहकारी पक्षातील आमदारामुळेच मंत्री अडचणीत येत असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरेश धस यांना थांबवावे अशी मागणी करण्यात येत होती. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलताना सुरेश धस यांचे जोरदार कौतुक केले. तसेच बोलता बोलता कोपरखळीही मारली.
धक्कादायक! संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या
आमदार सुरेश धस हे मागे लागले की डोकं खाऊन टाकतात. आजच्या या कामासाठी धस यांनी माझंही डोकं खाल्ल होतं. त्यामुळे 2022 मध्ये सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला 11 हजार कोटींची सगळ्यात पहिल्यांदा सुप्रमा दिली. त्यांच्यामुळे आता हे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. धाराशिव जिल्हा आणि आष्टी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत. या भागातला दुष्काळ आता भूतकाळ होणार आहे, संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल. या कामामुळे त्यांना आधुनिक भगीरथ म्हणून ओळखले जाईल, असे फडणवीस म्हणाले.