“पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंड्या वटवल्या याचे पुरावेही आपल्याकडे आहेत. महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याच अधिकृत पत्र घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खूण व पुरावे देखील आहेत. परमानंदाकडे देखील परवानगी होती.”
अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे हे वक्तव्य सध्या चांगलेच वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या विधानावर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या विधानावार राजकीय वादही उभा राहिलाय. खरंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या अनेक गाथा आपण लहानपणापासून ऐकल्या आहेत. यात मग अफजलखानाचा वध, पावनखिंडीतील लढाई, शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटलेला प्रसंग अशा अनेक कथा ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत.
यातच एक प्रसंग आपल्या मनावर कायमचा कोरला गेला आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी बादशहा औरंगजेबच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून करवन घेतलेली सुटका. भर दरबारात झालेला अपमान, औरंगजेबाने लावलेला कडेकोट पहारा, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले आजारपणाचे नाटक, त्यातून बरे होण्यासाठी वाटलेले मिठाईचे पेठारे आणि एक दिवस यातीलच एका मिठाईच्या पेठाऱ्यातून पसार होणे. पण याच सगळ्या घटनाक्रमाला राहुल सोलापूरकर यांनी खोटे ठरवलं आहे. पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते, असा दावा त्यांनी केलाय.
व्हिडीओच्या सुरुवातीला राहुल सोलापूरकर कोण आहेत हे आधी पाहू. राहुल सोलापूरकर हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ‘नशीबवान’, ‘थरथराट’, ‘पळवा पळवी’, ‘अफलातून’, ‘सूर्योदय’, ‘हम दो बंडलबाज’, ‘भिऊ निकोस मी तुझ्या पाठीशी आहे’,‘तांबव्याचा विष्णू बाळा’ अशा अनेक चित्रपटांद्वारे त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. महेश कोठारे दिग्दर्शित ‘थरथराट’ या चित्रपटामधील त्यांची ‘टकलू हैवान’ ही भूमिका विशेष गाजली.
अशा या सोलापूरकर यांनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनेक दावे केले. यातीलच एक दावा म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. या दाव्याला पाठबळ म्हणून त्यांनी “हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटला की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो,” असेही सांगितले.
राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नक्की काय म्हणाले होते?
#ShivajiMaharaj #maratha #Maharashtra #rahulsolapurkar pic.twitter.com/uQHToeEZ6S— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) February 4, 2025
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटले कसे? याबाबत इतिहास संशोधक आणि अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, राहुल सोलापूरकर यांचा दावा हा पूर्णपणे आक्षेपार्ह आहे. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटून आले आणि यासाठीचे अनेक पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. लाच देऊन, त्याला सांगून, दस्तक घेऊन परत आले असते तर त्यांनी इकडे परत आल्यावर पत्रच लिहिले नसते. महाराजांनी स्वराज्यात आल्यानंतर औरंगजेबाला पत्र लिहिले. ते खूप मिष्कील पत्र आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की, “तुमची परवानगी न घेता मी परत आलो”.
दुसरी गोष्ट, त्यावेळी जो रामसिंग पाहऱ्यावर होता. त्या रामसिंगाच्या बरोबर असणाऱ्या लोकांनी राजस्थानला पत्र पाठवलेले आहेत. तिथे ज्या काही घडामोडी घडल्या त्या सगळ्यांचे वर्णन यात आहे. ही सर्व पत्रे बिकानेरच्या संग्रहालयात जतन करून ठेवलेले आहेत. शिवाजी महाराज कसे निसटून गेले याविषयीच्या नोंदी त्यामध्ये आहेत. त्या समकालीन कथा आहेत. त्यामुळे लाच देऊन आले ते जे काय सांगितलं जातं ते पूर्णपणे खोटे आहे. दस्तक म्हणजे महाराजांनी औरंगजेबाच्या ज्या काही परवानग्या घेतल्या होत्या, त्या महाराजांबरोबर जी सहाशे मंडळी गेलेली होती त्यांच्यासाठीची घेतलेली होती. या दस्तकी महाराजांसाठी नव्हत्या.
औरंगजेबाला महाराजांना ठारच मरायचे होते. त्यासाठी अत्यंत कृर अशा रातंदासखानाच्या हवेलीमध्ये महाराजांना ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महाराज अत्यंत गुप्त मार्गाने, कोणालाही कळू न देता आग्र्याहून स्वराज्यात आले. ते 17 ऑगस्ट रोजी सुटले आणि 21 नोव्हेंबर रोजी स्वराज्यात पोहचले. या नोंदी सगळ्या इतिहासाच्या अस्सल कागदपत्रांमध्ये नोंद आहेत, असेही इंद्रजीत सावंत यांनी सांगितले. याशिवाय लेट्सअप मराठीने इतिहास अभ्यासक पांडूरंग बलकवडे यांनाही संपर्क केला. पण त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून कसे सुटले याबाबत काही पुस्तकांमध्येही लिखाण आहे. “19 ऑगस्ट 1666 रोजी बाहेर तैनात सैनिकांना महाराजांनी संदेश पाठवला. आपण फार आजारी असल्याने अंथरुणात पडून आहोत. त्यामुळे आरामात अडथळा आणू नये. कोणालाही आत पाठवू नये. दुसऱ्या बाजूला त्यांचे कपडे, मोत्याचा हार वगैरे घालून हिरोजी फर्जंद त्यांच्या जागेवर झोपले. शरीर पांघरुणाने झाकून घेतलं. फक्त एक हात बाहेर ठेवला होता. त्या हातात त्यांनी शिवाजी महाराजांचं सोन्याचं कडं घातलं होतं.
शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज फळांच्या पेटाऱ्यात बसले. पहारेकऱ्यांना त्या पेटाऱ्यांची तपासणी करणं आवश्यक वाटलं नाही. हे पेटारे शहराच्या एकाकी भागात नेण्यात आले. तिथं पेटारे वाहून नेणाऱ्या मजुरांना परत पाठवण्यात आलं. शिवाजीराजे आणि संभाजीराजे आग्र्यापासून सहा मैल दूर एका गावात पोहोचले. तिथं त्यांचे मुख्य न्यायाधीश निराजी रावजी त्यांची वाट पाहात होते, असे जदुनाथ सरकार लिखित शिवाजी अँड हिज टाइम्स पुस्तकात म्हंटले आहे.
तर “शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून बाहेर पडले हे गृहित धरून चालता येणार नाही. पेटाऱ्यात बसून पूर्णपणे असहाय्य होणारे ते नव्हते. त्यांचे 9 वर्षांचे पुत्र संभाजी राजे नक्कीच पेटाऱ्यात बसले असतील पण शिवाजी महाराज मजुरांच्या वेशात बाहेर आले असावेत. हिरोजी रात्रभर आणि पुढची दुपार पलंगावर पडून राहिले. सैनिकांनी महाराजांच्या खोलीत डोकावल्यावर त्यांनी त्यांच्या हातातलं कडं पाहिलं आणि जमिनीवर बसलेला एक व्यक्ती त्यांचे पाय दाबतोय असं दिसलं.
तीन वाजण्याच्या सुमारास हिरोजी एका नोकराबरोबर बाहेर पडले. ‘महाराज आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, गोंधळ करू नका’ असं त्यांनी पहारेकऱ्यांना सांगितलं. थोड्या वेळाने महाराजांच्या खोलीतून कसलाच आवाज येत नाहीये, हे लक्षात आल्यावर सैनिकांना शंका आली. त्यांनी आत जाऊन पाहिल्यावर शिवाजी महाराज तिथं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ही बातमी आपले प्रमुख फलाद खानला सांगितली. फलाद खानने छत्रपती शिवाजी महाराज गायब झाल्याची वार्ता औरंगजेबाला दिली असे सेतूमाधवराव पगडी यांनी छत्रपती शिवाजी पुस्तकात लिहिले आहे.
थोडक्यात ऐतिहासिक पुरावे, तथ्य, अभ्यासकांचे मत, पुस्तकातील निरिक्षणे हे सगळे शिवाजी महाराज हे बादशाहच्या हातावर तुरी देऊनच निसटून आले असल्याचे दिसून येते.