अहमदनगर : राज्यासह देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. मात्र महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेली अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक वेगळीच राहिली. राजकारणातील प्रस्थापित विखे कुटुंबियांना धक्का देत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी विजयाचा गुलाल उधळला. यानंतर आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून लंके विखेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत असे चित्र सध्या दिसतेय. खासदार झाल्यानंतर लंके यांनी सर्वप्रथम कांदा व दूध दराचे आंदोलन हाती घेत एक प्रकारे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधातच आंदोलन उभे केले. त्यामुळे आगामी काळामध्ये पुन्हा एकदा विखे विरुद्ध लंके हा संघर्ष पाहायला मिळणार हे मात्र नक्की.
लोकसभा निवडणुकीमध्ये लंके विरुद्ध विखे हा थेट सामना झाला. सुजय विखेंच्या पराभवासाठी त्यातील उत्तरेतून यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ताकद लावली होती. यातच विखे-पवार हा संघर्ष काही राजकारणात लपलेला नाही. यामुळे तुझे विखे यांना मात देण्यासाठी खुद्द शरद पवार देखील रिंगणात उतरले होते. शरद पवारांनी लंकेना तिकीट दिले. पवारांचा डाव यशस्वी झाला व सुजय विखेंचा पराभव झाला. खासदार बनताच लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे जिल्हा प्रशासनावर असलेली पकड सैल करण्यासाठी लोक भावनेच्या माध्यमातून विविध आंदोलने सुरू केली आहेत.
पुणेकरांनो घाबरू नका, वेळ प्रसंगी नागरिकांना एअरलिफ्ट करू; CM शिंदेंची ग्वाही
खासदार निलेश लंके यांनी कांदा आणि दूध दराच्या प्रश्नावरून जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी महसूल विभागाला लक्ष्य केले. आंदोलना दरम्यान त्यांनी गौण खनिज उत्खनानावरून महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईचा प्रश्न उपस्थित केला. दुग्धविकास मंत्री हे आपल्या जिल्ह्याचे आहे तरी मात्र दूध उत्पादकांना न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त केली. अखेर मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आश्वासनानंतर लंके यांचे आंदोलन स्थगित झाले. लंके विरुद्ध विखे संघर्षाचा हा पहिला अध्याय होता.
कांदा व दूध दराच्या आंदोलनानंतर लंके यांनी मनपाकडे आपला मोर्चा वळविला. लंके यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीतून देखील लंके यांनी विखेंवर निशाणा साधला. यांच्या विखे फाउंडेशनला दिलेल्या तीन कोटी रुपयांच्या करमाफीबद्दल हरकत घेतली तसेच आयुक्तांना त्या निर्णयाचा ठराव मनपाच्या आर्थिक हिताला बाधा आणणारा असल्याचे निदर्शनास आणून दिले. संबंधित प्रस्ताव रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा असे त्यांनी आयुक्तांना निर्देश दिले. यानंतर लंकेंनी पोलीस प्रशासनातील सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे.
लोकसभेमध्ये सुजय विखे यांना पराभूत करणाऱ्या लंके यांनी विधानसभेच्या अनुषंगाने कंबर कसली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता मतदारसंघाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात यावी. राहात्यात जाऊन ठाण मांडून बसतो असे म्हटले आहे. दरम्यान निवडणुकीनंतर सुजय विखे हे नगर दक्षिणेमधून जणू गायबच झाले आहे. त्यांनी उत्तरेकडे आपला वावर वाढवला असून उत्तरेतील नागरिकांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. लंके यांच्यावर थेट टीका करणे सध्या विखे पितापुत्रांनी टाळले आहे.
अर्थसंकल्पात बेदखल; नीती आयोगाच्या बैठकीवर चार मुख्यमंत्र्यांचा बहिष्कार, सीएम शिंदेंचं काय ठरलं?
नगर दक्षिणमध्ये निवडणुकीच्या निकालावरून लंके विरुद्ध विखे वाद सुरूच आहे. सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. तसेच 40 मतदान केंद्रावरील फेर पडताळणीचा अर्ज देखील त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केला आहे. लंके यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयात 31 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
आंदोलने उपोषणाच्या माध्यमातून विखेंवर निशाणा साधणाऱ्या लंके यांना महाविकास आघाडीचे नेत्यांचे पाठबळ मिळत आहे. लंके यांच्या आंदोलन उपोषण असेल तर त्यांच्या व्यासपीठावर आघाडीचे नेते आवर्जून असतात. स्थानिक पदाधिकारी देखील यांच्या समर्थनार्थ उतरतात. मात्र दुसरीकडे महायुतीमधूनच विखे यांना धक्का बसतोय. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केलेले वक्तव्य देखील चांगलेच चर्चेत होते. लंके महायुतीकडून लढण्यास तयार होते मात्र भाजपने नगरची जागा सोडली नाही. एकीकडे लंके यांना पाठबळ मिळत आहे दुसरीकडे लंकेविरोधातील लढाईत विखे यांच्या बाजूने महायुतीतच नव्हे तर भाजपकडूनही कुणी पुढे येण्यास तयार नसल्याचे वारंवार समोर येते.