Ahilyanagar News : मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व विभागाचे अधिकारी समन्वयाने कार्य करत कोणीही पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सर्वोतोपरी सज्ज राहावे. पूरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी सुरक्षित निवाऱ्यांची पाहणी करून त्याचे सूक्ष्म नियोजन करावे. त्या ठिकाणी अन्नधान्य, पाणी, औषधांची पुरेशी व्यवस्था असावी. जिल्ह्यातील विविध पाणी साठवण प्रकल्प, साठवण तलाव, पाझरतलाव यांची पाहणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करावी. आपत्तीच्या काळात विद्युत पुरवठा व दूरध्वनी सेवा अखंडित सुरू राहील, यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. पूरप्रवण व तलाव क्षेत्रामध्ये गाव-शोध व बचाव पथकांची व्यवस्था चोख ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
मराठवाड्याला वळवाच्या पावसाचा तडाखा; 27 जण दगावले, तर 392 जनावरांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पुलांचे सर्वेक्षण करावे. धोकादायक पुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कारवाई करावी. दरड कोसळणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून तेथे चेतावणी फलक लावावेत. झाडे रस्त्यावर उन्मळून पडून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. पुरामुळे पाणीपुरवठा योजना बाधित होणार नाहीत, याची दक्षता घेण्याबरोबरच पूरपरिस्थितीत सातत्याने पाण्याचे नमुने तपासावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या.
मान्सून कालावधीत पसरणाऱ्या साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी तसेच रोगराई पसरल्यास निदानासाठी उपाययोजना आखून ठेवाव्यात. प्रत्येक शासकीय रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असावा. शोध व बचाव साहित्यांची तपासणी करून काही बिघाड असल्यास ते तातडीने दुरुस्त करावे. जिल्ह्यातील धोकादायक शाळा खोल्या व अंगणवाड्यांचा वापर होऊ नये. आपत्तीच्या काळात २४x७ नियंत्रण कक्ष सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी. शहरांमध्ये ड्रेनेज अडथळ्यांमुळे अनेक वेळा पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.