खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध आमदार राजू पाटील. मागीच पाच वर्ष या दोघांमधील राजकीय सामना कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी अत्यंत जवळून पाहिला. पाच वर्षांच्या काळात राजू पाटील (Raju Patil) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यात थोडंही जमलं नव्हतं. अगदी माज उतरविण्यापर्यंतची विधाने राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी केलेली. तर “आजी पुढे माजी लावायला लावू नका”, असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांना दिला होता. पण आता हेच राजू पाटील आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्ष महायुतीत येण्याची शक्यता आहे. नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
मनसे महायुतीत आल्यास त्यांना दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई किंवा नाशिक यापैकी एक मतदारसंघ सुटू शकतो अशी चर्चा आहे. यातील एक किंवा दोन मतदारसंघ सुटले तरी भाजप शिवसेना यांना इतर मतदारसंघांमध्ये मनसेच्या मतांचा उपयोग होऊ शकतो अशी समीकरणे मांडली जात आहेत. एका बाजूला हे राजकारण असले तरीही मनसे सोबत आल्याने खरा फायदा होणार आहे तो शिवसेनेचा आणि त्यातही कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना. यातूनच मनसेसोबत असावी म्हणून एकनाथ शिंदेही आग्रही असल्याचे दिसून येत आहे. नेमकी कशी आणि काय आहेत ही गणिते… पाहुया सविस्तर…
श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यातील वादाचे खरे कारण कल्याण लोकसभा मतदारसंघातील आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील स्थानिक गणिते असल्याचे बोलले गेले होते. मागील काही दिवसांपासून राजू पाटील यांनी इथून लोकसभेसाठी तयारी सुरु केली होती. तसे त्यांनी अनेकदा जाहीर बोलूनही दाखविले होते. तर श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांच्या पराभवासाठी डाव टाकायला सुरुवात केली होती. गतवेळी कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांनी शिवसेना उमेदवाराचा केवळ सात हजार मतांनी पराभव केला होता. त्यातही शिवसेनेने सुभाष भोईर यांचे तिकीट ऐनवेळी बदलून रमेश म्हात्रे यांना दिल्याने समीकरणे बिघडली होती, असा दावा करण्यात आला होता.
मात्र आता थोडी आणखी ताकद लावली आणि समीकरणे नीट आखली तर इथून शिवसेनेचा आमदार निवडून येऊ शकतो, असा होरा श्रीकांत शिंदे यांचा आहे. तर श्रीकांत शिंदे विरुद्ध भाजप वादाचा फायदा घेऊन राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांना डॅमेज करायला सुरुवात केल्याचे दिसून येत होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेची चांगली पकड आहे. गत निवडणुकीत त्यांचे नगरसेवकही निवडून आले होते. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देखील पाटील यांनी धोरणे आखायला सुरुवात केली होती.
त्याचवेळी श्रीकांत शिंदे आणि भाजपमधील अंतर्गत धुसफूसही समोर आली होती. श्रीकांत शिंदे यांचे काम न करण्याचा ठरावच मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित स्थानिक कार्यकर्त्यांनी केला होता. तर “नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, लोकसभेला एकत्रित काम करायला हवे. पण, डोंबिवलीतील काही व्यक्ती युतीत मिठाचा खडा टाकत आहेत, मी कल्याणची खासदारकी सोडायला तयार आहे. पण मग त्या जागी तुम्ही तुमचा चांगला उमेदवार सुचवा. मी युतीचे काम करण्यास तयार आहे, अशी आक्रमक श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती. हा वाद शमविण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना मध्यस्थी करावी लागली होती.
अशात यंदा कल्याणमधून ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे किंवा वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा आहे. या तिहेरी अडचणींवर मात करण्यासाठी मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी स्वतः कल्याणमध्ये लक्ष घातले होते. गणपत गायकवाड यांच्या प्रकरणानंतर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सोबतीला घेत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अडचणी दुर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता मनसेला जोडीला घेऊन राजू पाटील यांचा विरोध कमी करण्याचा आणि त्यांच्यासोबत असलेली मनसेची लाखभर मते शिवसेनेकडे वळविण्याची त्यांच्या रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा कळवा विधानसभेचा समावेश आहे. बालाजी किणीकर यांच्या रुपाने अंबरनाथ हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. तर उल्हासनगरमध्ये कुमार आयलानी हे भाजपचे आमदार आहेत. मुंब्रा कळवामध्ये राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत. याच मतदारसंघात मनसेचा महाराष्ट्राताली एकमेव आमदार आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील आमदार आङेत. तर डोंबिवलीमध्ये भाजपचे रविंद्र चव्हाण आणि कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड असे आमदार आहेत. म्हणजे सहापैकी केवळ एक आमदार शिवसेनेचा आहे. तर तीन भाजपचे एक राष्ट्रवादी आणि एक मनसे अशी परिस्थिती आहे.
2014 :
श्रीकांत शिंदे, शिवसेना – 4 लाख 40 हजार 892
आनंद परांजपे, राष्ट्रवादी – 1 लाख 90 हजार 143
प्रमोद पाटील, मनसे – 1 लाख 22 हजार 349
शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे 2 लाख 50 हजार 749 मतांची आघाडी घेत विजयी झाले होते.
2019 :
श्रीकांत शिंदे, शिवसेना – 4 लाख 51 हजार 346
बाबाजी पाटील, राष्ट्रवादी – 1 लाख 24 हजार 925
संजय हेडावू, वंचित बहुजन आघाडी – 52 हजार 360
शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे 3 लाख 26 हजार 421 मतांची आघाडी घेत विजयी झाले होते.
थोडक्यात काय तर आधीच बंडखोरीमुळे असलेली नाराजी, त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेला शिवसेनाच केवळ एक आमदार, त्याचवेळी भाजपचे तीन आमदार, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा तगडा विरोधक आणि सुषमा अंधारे यांच्यासारख्या संभाव्य उमेदवार अशा अडचणीत सापडलेल्या श्रीकांत शिंदे यांना मतदारसंघातील मनसेच्या ताकदीचा फायदा राज ठाकरे युतीमध्ये आल्यास मिळू शकतो. लाख ते दीड लाख मते श्रीकांत शिंदे यांच्याकडे वळू शकतात, त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही मनसेला सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत.