Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीचे जागावाट अजूनही अंतिम झालेले नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का, याचाही निर्णय अजून झालेला नाही. नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांना (Prakash Ambedkar) पत्र पाठवत काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. वंचित मविआबरोबर राहण्याची शक्यता नाही असेही त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) उत्तर दिले आहे. कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो. राजकारणात प्रस्तावांवर चर्चा होतच असतात. उद्या आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत पुन्हा चर्चा करू, असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : ‘देणग्या देणारे ठेकेदार हाच मोदींचा परिवार’ इलेक्टोरल बाँडवरून राऊतांचा घणाघात
संजय राऊत यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीतील जागावाटप मुद्द्यावर ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचे राज्यात दौरे सुरू आहेत. आज संध्याकाळी बुलढाणा, उद्या कोल्हापूरला जाणार आहोत. नंतर सांगलीला जाणार आहोत. मिरज येथे जाहीर सभा होणार आहे. दौरे सुरुच आहेत आम्ही थांबलेलो नाही.
या दौऱ्यानंतर महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत. यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. उमेदवारांची यादी येईल. राज्यातील 48 जागा आम्ही लढत आहोत. आमची भूमिका आहे की यामध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावं. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सहभागी व्हावं अशी आमची भूमिका आहे. यासाठी आम्ही सकारात्मक चर्चा सुद्धा केली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत त्यासंदर्भात निर्णय घेतले जातील. कुणाचाही आडमुठेपणा नाही. सगळं व्यवस्थित सुरू आहे.
आम्ही प्रकाश आंबेडकरांचा कायम सन्मान केला. यापुढेही करत राहू. आमच्यामध्ये हुकूमशाही विरुद्ध लढण्याची एकवाक्यता आहे. आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला. उद्या आमची शरद पवारांबरोबर बैठक आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा येणार आहेत. त्यावर पुन्हा एकदा चर्चा करू. कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो. राजकारणात प्रस्तावावर चर्चा होत असते, असे संजय राऊत म्हणाले.
वंचितशिवाय जागावाटप होणारच नाही; संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं
राज ठाकरेंच्या मनातील खंत मलाच माहित
राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार आहेत. उत्तम कलाकार आहेत. त्यांच्या मनातल्या संवेदना आणि खंत इतर कुणापेक्षा मला जास्त माहिती असतात. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे व्यंगचित्र त्यांनी मधल्या काळात काढल होतं. ते मला खूप आवडलं होतं.
राज ठाकरे यांनी पुलवामा येथील घटनेवर भाष्य केलं. त्यात त्यांनी पुलवामा हल्ल्याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पाकिस्तान सल्लागार यांच्यात गुप्त बैठक झाली आणि नंतर हल्ला झाला का? असा प्रश्न उपस्थित केला होता. तर मला असं वाटतं की, कालच्या भेटीनंतर अमित शाह यांनी त्यांना त्यांचं उत्तर दिलं असेल, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.