Download App

डबल इंजिन सरकार की काँग्रेस बाजी मारणार? हरियाणाचा 30 वर्षांचा ट्रेंडही खास…

हरियाणाच्या राजकारणात डबल इंजिन सरकारचा ट्रेंड चालत आला आहे. मागील तीन दशकांपासून राज्यात असेच चित्र दिसून येत आहे.

Haryana Assembly Elections : हरियाणाच्या राजकारणात डबल इंजिन सरकारचा (Haryana Assembly Elections) ट्रेंड चालत आला आहे. मागील तीन दशकांपासून असे चित्र राहिले आहे की केंद्रात ज्या पक्षाचे सरकार असेल त्याच पक्षाचे किंवा आघाडीचे सरकार हरयाणात (Haryana Elections) असते. आता राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. केंद्रात सत्ता मिळवलेला पक्षच राज्यात सत्तेत येतो असे दिसून आले आहे. भाजप हीच परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करत आहे तर काँग्रेस मात्र (Congress Party) डबल इंजिन सरकारचा हा रीवाज बदलण्याची तयारी करत आहे. त्यामुळे हरियाणात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात (Lok Sabha Elections) आधी जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका होत आहेत. केंद्रात भाजपने हॅटट्रिक केली आहे. आता राज्यात अशीच कामगिरी करण्याच्या प्रयत्नात पक्ष आहे. या निवडणुकीत जर भाजपाचा पराभव झाला तर देशभरात भाजपचा आलेख घसरू लागल्याचा नरेटिव विरोधक तयार करतील याचा अंदाज भाजपला आहे. त्यामुळे अशी कोणतीच संधी विरोधकांना मिळू नये यासाठी भाजपने पूर्ण ताकद झोकून दिली आहे.

भाजप हॅटट्रिक करणार का?

मागील दोन निवडणुका जिंकणाऱ्या भाजपने तिसऱ्या वेळेसही जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) कुरुक्षेत्र येथील जाहीर सभेत डबल इंजिन सरकार कायम ठेवण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनीही सांगितले होतं की ज्या पक्षाचं सरकार केंद्रात असतं त्याचं पक्षाचं सरकार हरियाणात असतं.

5 लाख घरं, अग्निवीराला नोकरी, महिलांना 2100 रुपये; हरियाणासाठी भाजपानं दिल्या 20 गॅरंटी..

हरियाणाचा राजकीय इतिहास

हरियाणाच्या राजकारणात (Haryana Politics) आतापर्यंत 13 निवडणुका झाल्या आहेत. यापैकी फक्त तीन वेळेसच भाजपला सत्ता मिळाली. 1996 मध्ये भाजपने हरियाणा विकास पार्टीबरोबर आघाडी करून सरकार स्थापन केले होते. यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत हरियाणाच्या जनतेने भाजपला 47 जागा दिल्या होत्या. त्यावेळी भाजपला बहुमत मिळाले होते. यानंतर 2019 मधील निवडणुकीत भाजपने 40 जागा जिंकल्या आणि जनता जननायक पक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. आता तिसऱ्या वेळेस जिंकण्याच्या उद्देशाने भाजप रिंगणात आहे.

हरियाणात डबल इंजिन सरकारचा ट्रेंड

हरियाणात डबल इंजिन सरकारचा सिलसिला मागील तीन दशकांपासून सुरू आहे. 1996 मध्ये भाजपने केंद्रात तेरा दिवसांचे सरकार स्थापन केले होते. मात्र हरियाणात बन्सीलाल यांच्या साथीने भाजप सरकारमध्ये होता. यानंतर 1999 मध्ये भाजप एनडीएच्या साथीने केंद्रात सत्तेत आले होते. पुढे 2000 मध्ये हरियाणात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. भाजप आणि इनेलो यांनी एकत्रित निवडणूक लढवली. यामध्ये आघाडीने 53 जागा जिंकल्या. काँग्रेसला फक्त 21 जागा मिळाल्या. इनेलो प्रमुख ओमप्रकाश चौटाला मुख्यमंत्री बनले.

2005 ते 2015 काँग्रेसचा कब्जा

2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काही पक्षांना सोबत घेत काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. 2005 मध्ये हरियाणात निवडणुका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसने 67 जागा जिंकत सत्तेत वापसी केली. या पद्धतीने हरयाणात डबल इंजिन सरकार अस्तित्वात आलं. यानंतर 2009 मधील लोकसभा निवडणूक जिंकून काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकार केंद्रात आले. यानंतर 2010 मध्ये हरियाणात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं नाही परंतु अपक्ष आणि अन्य पक्षांच्या मदतीने काँग्रेसने सरकार स्थापन केले.

58 वर्षे, 13 निवडणुका अन् 117 आमदार.. अपक्ष ठरलेत हरियाणात किंगमेकर!

हरियाणात दहा वर्षांपासून भाजप सरकार

सन 2014 मध्ये देशातील सत्तापरिवर्तनाचा प्रभाव हरियाणात जाणवला. 2015 मध्ये हरियाणात विधानसभा निवडणूक झाली. यामध्ये भाजपला 47 जागा मिळाल्या. भाजपने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केलं. यानंतर 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारची वापसी झाली. हरियाणातही पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आलं. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपला हरियाणात 40 जागा मिळाल्या. यावेळी बहुमत मिळालं नाही. मात्र अपक्ष आणि जेजेपी पक्षाच्या मदतीने भाजपने दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलं.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला हरियाणात मोठा धक्का बसला आहे. दहा पैकी फक्त पाच जागा जिंकता आल्या. काँग्रेसच्या वाढलेल्या जागा आणि व्होट शेअरमुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच सत्ताविरोधी वातावरण, शेतकरी, पहिलवान आणि जवानांच्या मुद्द्यांवरही भाजपाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे आता भाजप या निवडणुकीत डबल इंजिनचा ट्रेंड कायम राखण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us