साई बाबांचे जन्मस्थान, जायकवाडी डावा कालवा आणि गोदावरीवरील बंधाऱ्यांमुळे परिपूर्ण अशी सिंचन व्यवस्था. थोडक्यात शेती, शेती आधारित उद्योग आणि पर्यटन या तिन्ही आघाड्यांवर विकासासाठी पूरक परिस्थिती. त्यानंतर देखील विकासापासून कोसो दूर राहिलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे परभणी जिल्ह्यातील पाथरी. काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP), अपक्ष कम भाजप, अशा सर्व पक्षांना संधी देऊनही इथली परिस्थिती बदलेली नाही. यात अनेक वर्ष सत्ताधारी पक्षातीलच आमदार होते. पण पाथरीच्या (Pathari Assembly) विकासावर कोणालाही ठोस उत्तरच सापडले नाही. थोडक्यात दूरदृष्टीच्या नेत्याचाच अभाव असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे यंदा या मतदारसंघातील जनता कोणाला साथ देणार हे बघणे औत्सुक्याचे आहे. (Competition for candidacy between Babajani Durrani and Suresh Varpudkar in Pathari Assembly Constituency)
पाथरी मतदारसंघाचा आपण इतिहास पाहिल्यास तर या मतदारसंघावर कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व होते. 1967, 1972 आणि 1978 च्या निवडणुकीत काँग्रेसचे सखाराम नखाते निवडून आले होते. 1980 मध्ये ‘काँग्रेस यु’कडून दगडूबा झोडगावकर तर 1985 च्या निवडणुकीत समाजवादी काँग्रेसचे दिगंबरराव वाडीकर निवडून आले. पण 1990 च्या मराठवाड्यातील भगव्या लाटेत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेला. 1990, 1995 आणि 1999 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मात देत शिवसेनेचे हरिभाऊ लहाने निवडून आले. 2004 च्या निवडणुकीत बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेच्या या वर्चस्वाला धक्का दिला. त्यांनी हरिभाऊ लहाने यांचा पराभव केला.
2009 ला मतदारसंघाच्या पुनर्रचनेत सिंगणापूर मतदारसंघ पाथरीला जोडण्यात आला. पाथरी मतदारसंघात पाथरी, मानवत, सोनपेठ हे तालुके आणि परभणी तालुक्यातील पेडगांव, सिंगणापूर आणि दैठणा या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी मीरा कल्याणराव रेंगे यांच्या रूपाने मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आला. मीरा रेंगे यांना 89 हजार मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या बाबाजानी दुर्राणी यांनी 70 हजार मते घेतली. मीरा रेंगे यांनी 11 हजार मतांनी विजय मिळवला.
2014 मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. या साठमारीत लॉटरी लागली ती अपक्ष मोहन फड यांना. फड यांच्याविरोधात काँग्रेसकडून सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादीकडून बाबाजाणी दुर्राणी, शिवसेनेकडून मीरा रेंगे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विजयराव सिताफळे यांना तिकीट देण्यात आले. मुख्य लढत ही मोहन फड आणि सुरेश वरपूडकर यांच्यात झाली. यात वरपूडकरांचा 13 हजार 499 मतांनी पराभव झाला. निवडून आलेल्या मोहन फड यांना 69 हजार मते होती तर पराभूत झालेल्या वरपूडकर यांना 55 हजार 632 मते होती.
फड यांनी लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन आपला पाठिंबा दर्शवला. पण काही दिवसातच त्यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. तिथे ते फार काळ टिकले नाही. त्यांनी पुन्हा भाजपसोबत जाणे पसंत केले. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार संजय जाधव यांच्याविरोधात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांना प्रचार केला. त्यामुळे शिवसैनिक चांगलेच नाराज झाले होते. हीच नाराजी मोहन फड यांना विधानसभेच्या निवडणुकीत महागात पडली. त्यांचा 14 हजार 774 मतांनी पराभव झाला. काँग्रेसचे सुरेश वरपूडकर निवडून आले. वरपुडकर यांच्या रूपाने काँग्रेसने पुन्हा आपल्याकडे खेचून आणला.
मागच्या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहुन गेलं आहे. मोहन फड सध्या भाजपमध्ये असून तिथे ते स्थिरावले आहेत. शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. राष्ट्रवादी दोन गटात विभागली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते होते. एक राजेश विटेकर आणि दुसरे बाबाजाणी दुर्राणी. दुर्राणी म्हणजे राष्ट्रवादीचा जुना अल्पसंख्यांक चेहरा. तर राजेश विटेकर म्हणजे अजितदादांनी उभा केलेला आणि तयार केलेला नेता. दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक पण राष्ट्रवादीतील बंडानंतर दोघांनी अजिदादांची साथ दिली.
2012 आणि 2018 मध्ये शरद पवार यांनी बाबाजाणी दुर्राणी यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. जुलै 2024 मध्ये दुर्राणींचा विधान परिषदेचा कार्यकाल संपला. या जागेवर आपल्याला पुन्हा संधी द्यावी अशी मागणी दुर्राणी यांनी अजितदादांकडे केली होती. मात्र लोकसभेवेळी महायुतीच्या समीकरणात थांबावे लागलेल्या राजेश विटेकर यांना अजितदादांनी संधी दिली. त्यामुळे दुर्राणी यांनी अजितदादांना रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याचवेळी त्यांनी पवारांकडून पाथरीच्या उमेदवारीचाही शब्द घेतला आहे.
मात्र सध्या ज्याचा आमदार त्याची जागा या सूत्रानुसार महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटू शकते. यात सुरेश वरपूडकर हेच पुन्हा उमेदवार असू शकतात. तर पाथरी, मानवत, सोनपेठ इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे महायुतीत जागा आपल्याकडे मागून घेण्याचा एकनाथ शिंदेंनी शब्द दिला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून इथं सईद खान हे इच्छुक आहेत. तर मोहन फड हेही इच्छुक असून मतदारसंघ भाजपकडे येऊ शकतो या आशेवर ते आहेत.
मराठवाड्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणे खूप महत्वाची ठरली होती. ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण उघडपणे तयार झाले होते. त्याच आधारे मतदान झाल्याचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी लेट्सअप मराठीच्या मुलाखतीमध्ये मान्य केले होते. त्यातच पाथरी मतदारसंघात मराठा समाजाचे सर्वाधिक मतदान आहे. शिवाय मुस्लिम मतदारांचीही संख्या जास्त आहे. आता या विधानसभा निवडणुकीत काय होणार? मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार? मुस्लीम समाज कोणाच्या बाजूने झुकणार? हे महत्वाचे ठरणार आहे.
पाथरी मतदारसंघातील पायाभूत सुविधांबद्दल बोलायचे झाल्यास इथे उच्च शिक्षणासाठी शिक्षण संस्थांची कमतरता आहे. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांचा कल लातूर किंवा नांदेड या जिल्ह्यांमध्ये असतो. इथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 548 B अद्यापही रखडलेला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला तर दळणवळण सुधारून नागरिकांचे होणारे हाल थांबू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी येथील मतदारांची आहे. पाथरी मतदारसंघात सर्वात जास्त दुर्लक्षित राहिलेला तालुका आहे सोनपेठ. इथे तर दळणवळणाच्या दृष्टीने केवळ एकच राज्य रस्ता चांगला आहे. बाकी सर्व रस्ते वाहतूक सोडा पायानेही चालता येत नाही असे आहेत.
त्यामुळे या प्रश्नांना न्याय देणारा, सगळ्या गोष्टींचा विकासासाठी योग्य वापर करणारा एक दुरदृष्टीचा नेता पाथरीकरांना हवा आहे. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून विद्यमान आमदार सुरेश वडपुरकर किंवा बाबाजानी दुर्राणी यांच्यापैकी कोण उमेदवार असणार? वरपूडकर आणि दुर्राणी यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून तोडगा निघणार की महाविकास आघाडीत बिघाडी होणार? महायुतीत जागा कोणाला जाणार? मोहन फड यांच्या रुपाने भाजप लढणार की शिवसेना सईद खान यांना तिकीट देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.