Download App

जिंतूरमध्ये तिसऱ्या भिडूची एन्ट्री; बोर्डीकर-भांबळे लढाईत नवा ट्विस्ट

जिंतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजय भांबळे विरुद्ध भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्यात लढत होणार?

मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण येलदरी, प्रसिद्ध असं नेमगिरी दिगंबर जैन गुफा मंदिर, चारठाण्यातील प्राचीन हेमाडपंथी मंदिर, भोगाव देवी मंदिर ही वैशिष्ट्ये असलेला आणि परभणी जिल्ह्यातील प्रचंड विस्तारलेला मतदारसंघ म्हणजे जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचे जेवढे भौगोलिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे तेवढेच राजकीय देखील.  एखादा दुसरा अपवाद वगळता हा मतदारसंघ कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. रामप्रसाद बोर्डीकर यांनी इथे हे वर्चस्व राखले. बोर्डीकरांनी इथून काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळेस तर एक वेळेस अपक्ष म्हणून विजय मिळवला.

सध्या जिंतूर मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यासमोर पारंपरिक विरोधक म्हणून राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांचे आव्हान असणार आहे. आता आगामी विधानसभा निवडणूक बोर्डीकर विरुद्ध भांबळे या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार की अजून कोणी तिसरा भिडू निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? (Will there be a fight in Jintur Assembly Constituency between NCP Sharad Chandra Pawar’s Vijay Bhamble and BJP’s Meghna Bordikar?)

याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात लेट्सअप मराठीच्या निवडणूक स्पेशल ग्राउंड झिरो या सिरीजमधून…

जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 1972 साली शेषराव देशमुख आणि 1978 साली गुलाबचंद राठी यांच्या रूपाने इथून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार निवडून आले. 1980 मध्ये माणिकराव भांबळे हे काँग्रेस आय पक्षाकडून निवडून आले. 1985 मध्ये गणेशराव दुधगावकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर येथून विजय मिळवला. त्यानंतर 1999 चा अपवाद वगळता 1990 ते 2009 पर्यंत रामप्रसाद बोर्डीकर यांनीच इथून काँग्रेसचा गड राखला. 1999 सालक कुंडलिकराव नागरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा गाठली आणि बोर्डीकर यांच्या आमदारकीला ब्रेक लागला. 2004 च्या निवडणुकीत बोर्डीकर हे अपक्ष रिंगणात उतरले आणि निवडूनही आले.

2009 ला मतदारसंघांची पुनर्रचना झाली. तेव्हा जिंतूर मतदारसंघात सेलूचाही समावेश झाला. जिंतूर-सेलू नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यावेळी काँग्रेसकडून रामप्रसाद बोर्डीकर हे काँग्रेसकडून मैदानात होते. तर राष्ट्रवादीच्या भांबळे यांनी बोर्डीकरांविरोधात अपक्ष दंड थोपटले होते. यात बोर्डीकर यांनीच बाजी मारली. शिवसेनेचे हरीभाऊ लहाने तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सगळेच पक्ष हे स्वतंत्र लढले होते. तेव्हा या मतदारसंघातून काँग्रेसच्या रामप्रसाद बोर्डीकर विरुद्ध राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांच्यात लढत झाली. यात भांबळे यांनी तब्बल 27 हजार 358 मतांनी रामप्रसाद बोर्डीकर यांचा पराभव केला आणि पहिल्यांदाच आमदार झाले. या निवडणुकीत विजय भांबळेंना 1 लाख 6 हजार 912 मते मिळाली तर बोर्डीकरांना 79 हजार 554 मते मिळाली.

Ground Zero : बांगरांच्या आमदारकीवर नांगर फिरणार? ठाकरेंकडे चार तगडे पर्याय

2019 च्या निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना युतीचं वारं वाहू लागलं. तेव्हा रामप्रसाद बोर्डीकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आपली कन्या मेघना बोर्डीकर यांना भाजपचे तिकीट मिळवून दिले. त्यांच्या रूपाने भाजपाने पहिल्यांदाच जिंतूर मतदारसंघ जिंकता आला. मेघना बोर्डीकरांना एक लाख 16 हजार 913 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात उभे असणारे माजी आमदार विजय भांबळे यांना एक लाख 13 हजार 196 मत मिळाली होती.

आता आगामी विधानसभेला ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा या सूत्रानुसार माहितीत ही जागा भाजपला सुटणार आणि मेघना बोर्डीकर याच उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटेल आणि माजी आमदार विजय भांबळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. त्यामुळे मुख्य लढत ही बोर्डीकर विरुद्ध भांबळे अशीच होणार. पण यातही तिसऱ्या भिडूची एन्ट्री होऊ शकते. ते म्हणजे ओबीसी समाजातून येणारे सुरेश नागरे. माजी आमदार कुंडलिकराव नागरे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक परभणी मतदार संघातून लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला.

सध्या सुरेश नागरे हे काँग्रेसचे प्रदेश सचिव असून ते जिंतूर मतदारसंघातून तयारी करत आहेत. मात्र ही जागा शरद पवार यांच्याच पक्षाला सुटणार हे निश्चित असल्याने सुरेश नागरे वेळप्रसंगी अपक्ष ही रिंगणात उतरू शकतात. जिंतूर मतदारसंघात मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाचा प्रभाव दिसून येतो. इथे वंजारी समाजाचं मोठं प्राबल्य आहे. भाजपकडून इथे पंकजा मुंडे यांच्या प्रामुख्याने सभा घेतल्या जातात. शिवाय मराठा समाजाचे मतदान इथे मोठ आहे. मुस्लिम आणि दलित मतदानही निर्णायक ठरते. अशा परिस्थितीत नागरे यांनी उमेदवारी दोन मराठा आणि एक ओबीसी उमेदवार अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळू शकते.

Ground Zero : बीडमध्ये ‘क्षीरसागर बंधू’ भिडणार; मराठा मतांवर ज्योती मेटेंची नजर

जिंतूर शहराचा आपण विचार केला तर हे शहर अतिशय अस्वच्छ आहे. औद्योगिक वसाहत नाही. रेल्वे सेवा नाही. बस स्टॅन्डचा प्रश्न अजूनही निकाली लागलेला नाही. शिवाय रस्ते, नाले हे बेसिक प्रश्न ही ऐरणीवर आहेत. येलदरी धरण उशाला असूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मासेमारी व्यवसाय ठप्प आहे. पर्यटनालाही ही चालना नाही. जिंतूर तालुक्यातही आजूबाजूच्या खेडोपाड्यांमध्ये जाण्यास अजूनही पक्क्या रस्त्यांची इथल्या जनतेला प्रतिक्षा आहे. यावर्षी झालेल्या पावसाचा फटका जिंतूर सेलू या दोन्ही तालुक्यांना बसला आहे. येलदरी धरणाच्या बॅक वॉटरचा फटकाही शेतकऱ्यांना बसलेला आहे. या मतदारसंघात एकही साखर कारखाना नाही.

याच्या अगदी उलट चित्र सेलू शहरात आहे. इथे शिक्षण उत्तम आहे. तिथे रेल्वेची कनेक्टिव्हिटी, औद्योगिक वसाहत, ॲग्री कॉलेज आहे. डी.एड, बी.एड, पॉलीटेक्निक कॉलेज, नूतन शिक्षण संस्था आहेत. शिवाय सेलू शहरे अतिशय स्वच्छ आहे. सेलूमध्ये बोर्डीकरांचे स्वतःचे ॲग्रीकल्चर कॉलेज आहे. तर विजय भांबळे यांच्याकडे स्वतःच्या शिक्षण संस्था नाहीत. त्यामुळे आता बोर्डीकर विरुद्ध भांबळे या पारंपारिक लढतील कोण बाजी मारणार की तिसऱ्या भिडूमुळे जिंतूरची निवडणूक रंगतदार होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे… आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं….

follow us