Download App

शरद पवारांचे विश्वासू सत्यशील शेरकर भाजपच्या वाटेवर? विखे पाटलांसोबत बंददाराआड चर्चा…

Radhakrishna Vikhe Patil Meet Satyashil Sherkar : पुणे (Pune) जिल्ह्यात भाजपने आपली ताकद वाढवण्यासाठी नेत्यांच्या प्रवेशाचा धडाका सुरू केला आहे. भोर, इंदापूर, पुरंदरनंतर आता भाजपने (BJP) आपला मोर्चा जुन्नरकडे वळवला असून, यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेगळं वळण मिळालं आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार असलेले सत्यशील शेरकर (Satyashil Sherkar) यांच्या घरी नुकतीच जलसंपदा मंत्री अन् भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी भेट दिली. यावेळी बंददाराआड झालेल्या चर्चेनंतर शेरकर भाजपमध्ये प्रवेश करणार का? याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.

भाजपकडून डाव टाकला…

शेरकर हे आधी काँग्रेसमध्येच शिवाय त्यांच्या आणि विखे पाटलांच्या घरगुती संबंधांची राजकारणात नेहमीच चर्चा होत राहिली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर शेरकर हे राष्ट्रवादीच्या कोणत्याच कार्यक्रमात सक्रिय दिसले नाहीत. काही दिवसांपूर्वी पक्षातीलच नेत्यांनी आपल्याला तिकीट मिळू नये, म्हणून प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्या नाराजीला उचलून भाजपकडून डाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे.

राहुल गांधींनी सीसीटीव्ही फुटेज मागितले; निवडणूक आयोगाने आया बहिणींचा मुद्दा पुढं केला, अखिलेश यादवांकडून चिरफाड

विखे पाटलांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना शेरकर म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्यांच्या समृद्धीचे लोकाभिमुख नेतृत्व आहे. ते आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या सदिच्छा भेटीत शेतकरी प्रश्न, कुकडी प्रकल्प, साखर कारखानदारी तसेच सामाजिक-राजकीय घडामोडींवर चर्चा झाली, असं स्पष्टीकरण शेरकर यांनी दिलं आहे.

अजित पवार यांचीही भेट

सध्या जुन्नरमध्ये अपक्ष आमदार शरद सोनवणे शिंदे गटासोबत आहेत. 2024 च्या निवडणुकीत शेरकर यांचा पराभव अवघ्या सात हजार मतांनी झाला होता. त्यामुळे 2029 च्या निवडणुकीसाठी भाजपला शेरकर हे तगडे उमेदवार ठरू शकतात, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते याचाच भाग म्हणून भाजपने पाऊल टाकायला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

लग्न करणं अभिनेत्रीला पडलं महागात; आता जगतेय ‘असं’ आयुष्य, कोण आहे ती अभिनेत्री?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेरकर यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली होती. आता विखे पाटलांसोबत झालेली बैठक यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे, मात्र शेरकर वेगळा निर्णय घेणार की पवारांसोबत थांबणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

follow us