Download App

झिरो टू हिरो : आमदारकीचे तिकिट न मिळालेल्या तावडेंनी मोदींसह लोकसभेचे १९५ उमेदवार जाहीर केले…

  • Written By: Last Updated:

(Vinod Tawde political journy)  भाजपमध्ये हवेत उडणाऱ्या नेत्याचा फुगा कधी फुटेल, याच नेम नसतो. फुटलेला फुगा पुन्हा हवेत उडण्यासाठी हवा असतो संयम आणि सोबत निष्ठा. पक्षाने शिक्षा दिली तर ती आनंदाने स्वीकारायची. बंडाची भाषा करायची नाही. इतर पक्षांत जाण्याच तर विचारही करायचा नाही. मग तुमचा राजकीय वनवास संपण्याची जास्त शक्यता असते. असाच वनवास भोगलेले एक नाव भाजपच्या नेत्यांमध्ये प्रभावीपणे दिसून येत आहे. हे नाव तुमच्या लक्षात आले असेलच. हे नाव म्हणजे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे. राजकीय वनवासातून पुन्हा  केंद्रस्थानी पोहोचलेला महाराष्ट्रातील नेता म्हणून तावडे यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. याच तावडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारली होती.  त्याच तावडे यांनी साडेचार वर्षानंतर भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह तब्बल १९५ उमेदवारांची तावडे यांनी वाचून दाखवली.

फडणवीस आणि तावडे यांच्यात स्पर्धा

तावडेंसाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. राजकीय चढउतार त्यांनी भोगले. आपली राजकीय गाडी उताराला का लागली, याचा शोधही त्यांनी घेतला नाही. त्याचाच फायदा त्यांना मिळाला. विनोद तावडे यांचे नशीब २०१४ मध्ये जोरावर होते. त्या आधी ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरल्यानंतर तावडे यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले गेले होते. पण ती संधी देवेंद्र फडणवीस यांना मिळाली. फडणवीस हे तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते.  तावडे आणि फडणवीस यांच्यामध्ये सुप्त स्पर्धा असल्याचे तेव्हा बोलले जात होते. त्याचे प्रत्यंतरही येत होते. फडणवीस सरकारमध्ये  तावडे यांच्याकडे सुरवातीला शिक्षण खाते होते. यात शालेय, उच्च, वैद्यकीय, तंत्रशिक्षण अशा तीनही प्रमुख खात्यांचा समावेश होता. तावडेंचा तेव्हा रूबाब होता. त्यांच्या देहबोलीवरून तो सहज दिसत होता. त्यानंतर काही गणिते बिघडत गेली.

तावडे यांच्याकडील एकएक खाते नंतर कमी करण्यात आले. त्यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण खाते फडणविसांनी आपले मित्र गिरीश महाजन यांना दिले. फडणवीस सरकारच्या अखेरच्या काही दिवसांत त्यांच्याकडील शालेय शिक्षण हा विभाग देखील काढून घेण्यात आला. हा विभाग नंतर मुंबईच्या आशिष शेलार यांना देण्यात आला. तावडे आणि शेलार दोघेही मुंबईचे. शेलारांना पुढे करून तावडेंचे पंख आणखी छाटण्यात आले.  या पंख छाटण्यावरती तावडे यांनी कधी आपली प्रतिक्रिया दिली नाही.  फडणवीस आणि तावडे यांच्यातील संघर्ष असणे स्वाभाविक होते. पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचीही त्यांच्यावर खप्पा मर्जी असल्याचे पुढे स्पष्ट झाले.

तावडेंवर नाराजीचे कारण काय?

या नाराजीची कारणे काहींनी २०१७ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शोधून काढली.  ही निवडणूक भाजप एकहाती जिंकेल, असा फडणवीस यांना विश्वास होता. पण मुंबईचे नेते असलेल्या तावडे यांच्या गटाने ऐन वेळी शिवसेनेला मदत केली, असा त्यांच्यावर आक्षेप घेतला गेला. अर्थात ही कुजबूज होती. त्याला कुठे पुरावा मिळत नाही. पण त्यामुळे फडणवीस आणि तावडे यांच्यातील संबंध आणखी ताणले. त्यांच्या खात्यासंदर्भात फडणवीस लक्ष ठेवून होते. त्यातील बाबी त्यांना कळाल्या होत्या का, अशीही तेव्हा चर्चा होती.

तरीही तावडे यांचे मंत्रीपद टिकून होते. भाजपचे तत्कालीन वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे त्यांचा थेट फडणवीस यांच्याशी पंगा नव्हता. फडणवीस यांच्याशी वादाची मोठी किंमत खडसे यांना पुढे मोजावी लागली. त्यात त्यांचे मंत्रीपद गेलेच. पुढे भाजपही सोडावा लागला आणि त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. तरीही तावडे हे  फडणवीस सरकारमध्ये असून नसल्यासारखे होते. त्यांना खरा धक्का बसला तो २०१९ च्या सप्टेंबरमध्ये. भाजपने विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. पण तावडे यांना बोरीवली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा दिली गेली नाही. तेव्हा ऊर्जामंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पक्षश्रेष्ठींच्या नाराजीचा तेव्हा फटका बसला. फडणवीस सरकारमधील तावडे आणि बावनकुळे अशा दोन दिग्गज मंत्र्यांचे तिकिट कापण्याचा कठोर निर्णय पक्षाने घेतला होता.

नड्डा अध्यक्ष झाले आणि नशीब फिरले…

दोन्ही नेत्यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली नव्हती. तावडे यांना उमेदवारी का नाकारली, याचे गूढ तेव्हा अनेक मोठ्या नेत्यांना वाटले. राज ठाकरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी त्यावर तावडे यांना फोन करून याबाबत विचारणा केली. पण तावडे शांत राहिले. पक्षाच्या कोणत्याही कार्य़क्रमात किंवा मेळाव्यात ते कधी सहभागी झाले नाहीत. दुरूनच ते सारे पाहत होते. हे सारे घडत होते तेव्हा अमित शहा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

लोकसभा निवडणुकीनंतर अमित शहा हे गृहमंत्री झाले. जे. पी. नड्डा यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद आले. नड्डा यांचे राष्ट्रीय अध्यक्ष होणे हा तावडेंसाठी शुभशकुन होता. नड्डा आणि तावडे हे दोघेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून पुढे आलेले नेते आहेत. तावडे आणि नड्डा यांनी एकत्र त्या संघटनेत काम केले होते. तावडे यांच्या पुनर्वसनात नड्डा यांनी महत्वाची भूमिका बजावली. २०१९ नंतर वर्षभर  अडगळीत पडलेल्या तावडे यांना राष्ट्रीय चिटणीस म्हणून संधी नड्डा यांनी दिली. त्यांना पहिल्यांदा हरियाणाचे प्रभारी करण्यत आले. त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून तावडे यांना बढती मिळाली. बिहारसारख्या मोठ्य राज्याची जबाबदारी त्यांना मिळाली. भाजपमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केलेले दोनच नेते आतापर्यंत झाले आहेत. पहिले प्रमोद महाजन आणि त्यानंतर विनोद तावडे. यावरून या पदाचे महत्व लक्षात येईल.

तावडे यांना संयमाचे आणि निष्ठेचे फळ मिळाले. २०१९ मध्ये उमेदवारी न मिळाल्याने आमदारही होऊ न शकलेले तावडे यांनी पक्षाच्य लोकसभा उमेदवारांची घोषणा केली. त्यांनी किती मोठा पल्ला गाठलाय याचेच दृश्य अनेकांनी टिव्हीवर पाहिले.  तावडे यांच्याशी पक्षाने २०१९ मध्ये क्रूर विनोद केला होता. पण तावडे हे आता देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही वर्षे गंभीरपणे नाव घेणाऱ्या नेत्यांच्या लीगमध्ये समाविष्ट झाले आहेत.

follow us

वेब स्टोरीज