नवी दिल्ली : भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) नवा नारा देत रणशिंग फुंकले आहे. नव्या नाऱ्याच्या माध्यमातून भाजपनं येणाऱ्या निवडणुकांमध्ये गेल्या दोन वेळच्या मिळालेल्या जागांपेक्षा अधिकचा आकडा गाठू असा दावा केला आहे. ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार’ असा नारा काल (दि.2) पार पडलेल्या भाजपच्या बैठक निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजप विजयाचा 400 चा आकडा पार करण्यासही डगमगत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. एवढा मोठा विजय मिळवण्यात भाजपला कुठून विश्वास येतो असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा. (Will BJP Fulfill 400 Seats In 2024 LokSabha Elections)
सुजय विखेंचं टेन्शन वाढलं! तनपुरे, लंके अन् शिंदेंही लोकसभेच्या रिंगणात…
नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या राजवटीने भारतीय जनता पक्षाला उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि पश्चिमेपासून पूर्वेकडे विस्तार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं 303 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजपनं 400 पारचा आकडा पार करत हा विक्रम मोडीत काढण्याचा पण केला आहे.
400 पारचा विश्वास कशाच्या बळावर?
ब्रँड मोदी : 2014 मध्ये भाजपचा नारा ‘अबकी बार मोदी सरकार’ असा होता. त्यानंतर 2019 मध्ये ‘मोदी है तो मुमकीन है’ आणि ‘एक बार फिर मोदी सरकार’ असा नारा देत भाजप लोकसभेच्या मैदानात उतरले होते. त्यानंतर आता 2024 साठी ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार’ अशी विरोधकांच्या पाया खालची जमीन सरकवणारा नारा भाजपनं निवडला आहे.
CM शिंदेंच्या निर्णयापूर्वीच नार्वेकरांचा राजीनामा? भाजपच्या चाणाक्यांच्या डोक्यात राजकीय खेळी
नुकत्याच पार पडलेल्या विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं मोदी ब्रँडच्या नावाखालीच विजय पताका फडकवली आहे. सरकारी योजना आणि पक्षाच्या कार्यक्रमांतून मोदींची ब्रँड इमेज समाजातील प्रत्येक घटकावर उमटल्याचे वेळोवेळी पक्षाला मिळालेल्या विजयातून अधोरेखित होत आहे. हम सपने नहीं हकीगत बुनते है इसी लिए हम मोदी को चुनते है ही घोषणा मोदींवरील जनतेचा विश्वास दर्शवते. ‘जेव्हा पंतप्रधान मोदी म्हणतात की ही ‘मोदीची हमी’ आहे, तेव्हा लोकांमध्ये एक वेगळाच विश्वास निर्माण होतो. यामुळेच जनतेला मोदींनी वचन दिल्यास ते प्रत्यक्षात उतरले याची हमी निर्माण झाली आहे.
मूळ मतदारांचा पाठिंबा : गेल्या 10 वर्षात भाजप हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने आपले मूळ मतदार टिकवण्यात, जनाधार वाढवण्यात आणि नवीन मतदार जोडण्यात यश मिळवले आहे. 2014 मध्ये भाजपने लोकसभेत 31% मते आणि 282 जागा मिळवल्या. तर, 2019 मध्ये मतांची टक्केवारी वाढत 37% टक्के झाली. यामुळे भाजपला 303 जागांवर विजय मिळवणे सोपे झाले. या सर्व विजयात पक्षाच्या विचारसरणीला मानणाऱ्या भाजपच्या मूळ मतदारांचा मोलाचा वाटा आहे. त्यानंतर आता 2024 च्या लोकसभांसाठी भाजपनं 50 टक्के मतांचे लक्ष्य गाठण्याचा निश्चय केला आहे.
कशी गाठणार 50 टक्क्यांची आकडेवारी? : पक्षाने 2024 साठी 50% मतांचे लक्ष्य ठेवले आहे. ही आकडेवारी गाठण्यासाठी पक्षाला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणे, वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर, उज्जैनमधील महाकाल लोकांच्या जीर्णोद्धारापासून ते अयोध्येतील राम मंदिराची उभारणी ही सर्व दिलेली आश्वासनं भाजपनं पूर्णत्वास नेली आहे. त्याचा थेट फायदा 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजपला होऊ शकतो. याशिवाय भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला शहरी मतदार आणि देशाच्या विकासावर विश्वास असलेल्या ग्रामीण तरुणांचा पाठिंबा मिळत आहे.
शिंदेंची खुर्ची जाणार? हे आहेत राहुल नार्वेकर यांच्यासमोरचे चार पर्याय
शहरी मतदार जवळपास दोन दशकांपासून भाजपसोबत असून, तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे. तरूणांमध्ये ‘रिफॉर्म, परफॉर्म अँड ट्रान्सफॉर्म’, ‘मेक इन इंडिया’ या मोदी सरकारच्या घोषणा तरुणांच्या पसंतीस उतरल्या आहेत. याशिवाय G-20 आणि चांद्रयान सारख्या यशस्वी मोहिमांमुळेदेखील तरूणांचा भाजप आणि मोदींवरील विश्वास वाढल्याचे चित्र आहे. याशिवाय ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून मोदी सरकार तरुणांना विकसित भारताचे ब्रँड अॅम्बेसेडर होण्यासाठी आमंत्रित करत आहे. यामुळे 2024 मध्ये पक्षाची मजबूत व्होट बँक तयार होण्यास आणि 400 पारचा आकडा पार करण्यास पक्षाला फायदा होईल असे बोलले जात आहे.
योजनांच्या माध्यमातून वाढवली व्होट बँक : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारने अनेक योजना राबवून खालच्या वर्गातील मोठ्या वर्गाचे व्होट बँकेत रूपांतरित केले आहे. सरकारी भाषेत अशा नागरिकांना ‘लाभार्थी’ असे संबोधले जाते. सरकारने राबवेलेल्या सर्व योजनांपैकी एकातरी योजनेचा फायदा 80 कोटी जनतेला झाला आहे. त्यामुळे लोकाभिमुख योजना राबवत मोदींनी आणि भाजपनं अशा योजनांच्या माध्यमातून व्होट बँक वाढवली आहे. हीच व्होट बँक 2024 साठी भाजप आणि मोदींसाठी गेमचेंजर ठरू शकते.
आयारामांना चाप अन् नव्या चेहऱ्यांचा शोध; भाजपने विनोद तावडेंवर सोपविली मोठी जबाबदारी
उत्तरेत ताकद तर, दक्षिणेत कठोर परिश्रम : भाजपने उत्तर, ईशान्य आणि मध्य भारतात आपली स्थिती मजबूत केली आहे. परंतु 2024 च्या निवडणुकीसाठी अनेक राज्यांमधील बदललेली राजकीय समीकरणे आणि दक्षिणेत काँग्रेसची वाढती ताकद भाजपसाठी मोठे आव्हान बनले आहे. दक्षिणेत जिंकणे भाजपसाठी नेहमीच कठीण राहिले आहे.
2019 मध्ये भाजपनं सर्वोत्कृष्ट कामगिरी करत कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील 130 पैकी 29 लोकसभा जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी 25 जागा कर्नाटकातील आणि 4 जागा तेलंगणातील होत्या. मात्र, नुकत्याच तेलंगणातील विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळाल्याने काँग्रेसला दक्षिणेत आणखी बळ मिळाले आहे. या विजयाच्या जोरावर आगामी लोकसभेच्या जागांबाबत काँग्रेसने भाजपला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.
दक्षिणेच्या विजयासाठी भाजपची रणनीती काय? : भाजपला दक्षिणेकडे विजय मिळवणे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कठीण राहिल्याचा इतिहास आहे. वेळोवेळी येथे सत्ता मिळावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापतरी भाजपला त्यात यश मिळालेले नाही. आगामी लोकसभेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तेलंगणामध्ये लोकसभेच्या 17 पैकी 10 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच भाजप तामिळनाडूमधील AIADMK च्या दोन गटांना एकत्र करत युती करण्याची योजना आखत आहे.
Jan Man Survey : 10 वर्षातील भारताच्या विविध क्षेत्रातील प्रगतीबद्दल काय वाटते? PM मोदींचा सवाल
महाराष्ट्रात वाढती आव्हाने : 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटलेल्या गटांसोबत युती करून सध्या भाजप महाराष्ट्रात सत्तेवर आहे. यापूर्वी 2019 मध्ये भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या तर, तेव्हाचा मित्रपक्षाने (शिवसेना ठाकरे गट) 18 जागा जिंकत 41 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजप असे तीन पक्ष एकत्र सत्तेत असल्याने कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याबाबत मतमतांतर आहे.
तिन्ही पक्षांचे नेते वेगवेगळ्या आकड्यांवर दावा करत आहेत मात्र, अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून, तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील असे पक्षांच्या वरिष्ठांकडून सांगितले जात आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दादेखील गाजत आहे. आरक्षणाचा हा तिढा सोडवण्यास अद्यापतरी महायुतीच्या सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे या समाजातील मतांचा फटका भाजपला बसू शकतो असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.