नवी दिल्ली : मागील 10 वर्षांमध्ये भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटते? असा सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘जन मन सर्वे’ची सुरुवात केली आहे. देशावासियांना नमो ॲपवरती या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. नमो ॲप’ (Namo App) हे पंतप्रधान मोदींचे जनतेशी थेट संवाद साधण्याचे आणि जनतेचा सल्ला ऐकण्याचे एक चांगले माध्यम असल्याचा दावा भाजपने केला आहे. (Prime Minister Narendra Modi has started ‘Jan Mana Survey’ on Namo app.)
दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांशी ‘मन की बात’ करत असतात. अगदी त्याचप्रमाणे आता त्यांच्या नावाने असलेल्या नरेंद्र मोदी ॲपच्या (नमो ॲप) माध्यमातून ते जनतेच्याही मनात काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी ‘जन मन सर्वे’ची सुरुवात करण्यात आली आहे. भाजपने काही दिवसांपूर्वीच याबाबतची घोषणा केली होती.
‘जन मन सर्वे’ हे अत्यंत वेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण असून अत्यंत सोप्या आणि आकर्षक पद्धतीने नागरिकांना आपले म्हणणे मांडता येत आहे, असा दावा केला जात आहे. 2024 हे वर्ष निवडणुकांचे आहे. मार्च महिन्यात लोकसभेतच्या तर ऑक्टोबर महिन्यात राज्य विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर लोकांचे म्हणणे ऐकून घेत जनतेचा कल जाणून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून ‘नमो अॅप’च्या माध्यमातून ‘जनमन’ या नावाने हे सर्वेक्षण घेतले जात आहे.
या सर्वेक्षणात उत्तरे देण्यास अत्यंत सोपे असणारे 14 प्रश्न विचारले गेले आहेत. यातून सरकारच्या नेतृत्वाबद्दल आणि प्रशासनाबद्दल जनतेचे असलेले मत जात आहे. प्रश्न केवळ केंद्रीय नेतृत्वाबद्दल नसून आपल्या मतदारसंघाबाबत, लोकप्रतिनिधीबद्दल नागरिक मत सांगू शकतात. सरकारी योजनांचा उपयोग होतो का, प्रकल्प उपयुक्त आहेत का, याबाबतही नागरिकांची मते समजून घेतली जात आहेत. मत देताना नागरिकांना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, याचाही आढावा याद्वारे घेतला जात आहे.
या सर्वेक्षणात स्थानिक नेत्यांबाबतची मतेही जाणून घेतली जात आहेत. तुमच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीचे काम समाधानकारक आहे का, त्यांचा लोकांशी संपर्क आहे का, असे प्रश्न विचारून नागरिकांचा कल लक्षात घेतला जात आहे. तसेच, सर्वेक्षणाच्या अखेरीस ‘तुमच्या मतदारसंघातील तीन लोकप्रिय भाजप नेत्यांची नावे सांगा’ असा प्रश्न विचारून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची तयारीही भाजपकडून केली जात असल्याचे मानले जात आहे.