नवी दिल्ली : यंदाचे वर्ष हे जगभरात ‘मतदार राजाचे’ वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. कारण यावर्षी भारतासह (India) जगभरातील तब्बल 78 देशांमध्ये निवडणुकांचे वारे वाहत आहेत. भारतात येत्या वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याशिवाय भारताचे शेजारी बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तानमध्येही (Pakistan) यावर्षी निवडणुका होणार आहेत. परंतु हे निवडणुकीचे वारे केवळ आशियापुरतेच मर्यादित नाही. आशियासोबतच आफ्रिका, युरोप आणि अमेरिका खंडातही निवडणुका पार पडणार आहेत. (Elections are going to be held in as many as 78 countries around the world including India.)
यात आशिया खंडात यावर्षी सर्वाधिक मतदार मतदान करणार आहेत. शिवाय भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही देशांच्या निकालांचे इथल्या जनतेवर दुरगामी परिणाम होणार आहेत. शिवाय इथल्या निकालांचा जगाच्या भू-राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरही परिणाम होऊ शकतो. अमेरिकेची निवडणुकही त्यातलीच आहे. तर काही देशांमध्ये निवडणुका ही केवळ औपचारिकता आहे. तिथे बदलाची फारशी आशा नाही. यात रशियाचे नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे. व्लादिमीर पुतिन यांचे रशियात पुनरागमन निश्चित मानले जात आहे.
वॉशिंग्टनस्थित थिंक टँक अटलांटिक कौन्सिलच्या मते, 2024 नंतर पुढील तब्बल 24 वर्षांनी पुन्हा एकदा असा योगायोग जुळून येऊ शकतो. म्हणजे 2048 मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वर्षात निवडणुका पार पडतील.
2024 च्या पहिल्या महिन्यात 7 जानेवारी रोजी बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकांसह या मोठ्या निवडणूक वर्षाची सुरुवात होईल. तिथे विद्यमान पंतप्रधान शेख हसीना पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यानंतर, फेब्रुवारीमध्ये, जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या पाकिस्तान आणि इंडोनेशिया या दोन देशांमध्ये एका आठवड्याच्या अंतराने निवडणुका होणार आहेत. पाकिस्तानमध्ये पीपीपी, पीएमएलएन आणि पीटीआय यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी इंडोनेशियातील विद्यमान सरकार परत येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
दक्षिण आफ्रिकेत मे महिन्यात निवडणुका होणार आहेत, 1994 मध्ये वर्णभेद संपल्यानंतर या निवडणुका सर्वात महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. याशिवाय आफ्रिका खंडात अल्जेरिया, बोत्सवाना, चाड, कोमोरोस, घाना, मॉरिटानिया, मॉरिशस मोझांबिक, नामिबिया, रवांडा, सेनेगल, सोमालीलँड, दक्षिण सुदान, ट्युनिशिया आणि टोगो या देशांमध्येही निवडणुका होणार आहेत. 2024 मध्ये या खंडात सर्वाधिक निवडणुका होणार आहेत.
युरोपातही येत्या वर्षभरात अनेक देशांत सत्तेसाठी संघर्ष होणार आहे. 2024 मध्ये युरोपमधील 10 हून अधिक संसदीय आणि अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. यात युकेसह फिनलंड, बेलारूस, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, लिथुआनिया, आइसलँड, बेल्जियम, युरोपियन संसद, क्रोएशिया, ऑस्ट्रिया, जॉर्जिया, मोल्दोव्हा आणि रोमानिया यांचा समावेश आहे.
2024 मध्ये अमेरिकेतही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. प्रथेप्रमाणे 8 नोव्हेंबर रोजी या निवडणुकाचा निकाल जाहीर होणार आहे. वर्षअखेरीस होणाऱ्या या निवडणुकांसाठी आतापासूनच मोठी चुरस सुरू आहे. यात डेमोक्रॅट पक्षाचे अध्यक्ष जो बिडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट लढत होऊ शकते, असे मानले जात आहे. या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर आणि पर्यायाने जगातील अनेक देशांवरही याचा परिणाम होणार आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हटल्या जाणार्या भारतात लोकसभेसाठी मार्च-एप्रिलमध्ये देशभरात मतदान अपेक्षित आहे. भारतातील 60 कोटींहून अधिक मतदार नवीन सरकार ठरवतील. 2014 पासून भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. तिसऱ्या टर्मसाठी नरेंद्र मोदींना काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांकडून निवडणुकीत आव्हान असणार आहे. भारतात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला तोंड देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘इंडिया अलायन्स’ स्थापन केली आहे.