Download App

हॅपी ‘फिनलंड’मध्ये वाढतोय उदासपणा.. संयुक्त राष्ट्रांचा हॅपीनेस रिपोर्ट किती खरा?

ज्या फिनलंडला सर्वात हॅपी देश म्हणून सांगितलं आहे तोच देश आज निराशेच्या गर्तेत पुरता अडकला आहे.

World Happiness Report : मागील सात वर्षांपासून फिनलंड हा (Finland) जगातील सर्वाधिक आनंदी देश असल्याचं सर्वानाच ठाऊक आहे. जागतिक महासत्ता अमेरिका आणि वेगाने विकसित होणारा भारत हे देश मात्र अस्वस्थ देशांच्या यादीत आहेत. दहशतवादाने ग्रस्त असलेले काही देश मात्र मजेत आहेत. हा दावा युनायटेड नेशन्सच्या (United Nations) सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कचा आहे. ज्या फिनलंडला सर्वात हॅपी देश म्हणून सांगितलं आहे तोच देश आज निराशेच्या गर्तेत पुरता अडकला आहे. यावर मात्र या अहवालात चकार शब्द काढलेला नाही. मग आता असा प्रश्न समोर येतो की हॅपिनेस इंडेक्स रिपोर्ट खरा आहे का? फिनलंड मध्ये काही वेगळं तर घडत नाही ना..

हॅपिनेस इंडेक्स तपासणी का सुरू झाली?

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जगातील मोठे नेते आणि धोरणे तयार करणारे लोक गोंधळात पडले होते. त्यांना वाटत होतं की आपल्या प्रयत्नांमुळे देशाची प्रगती होत आहे. रोजगार उपलब्ध होत आहेत, आर्थिक सुबत्ता येत आहे, मोठे घर आणि कारखानेही तयार होत आहेत पण हे सगळं लोकांसाठी पुरेस आहे का? खरंच लोक आनंदी आहेत का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा विडा युनायटेड नेशन्सने उचलला.

सन 2012 पासून एक अहवाल देण्यास सुरुवात करण्यात आली. वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट असे (World Happiness Report) नावही देण्यात आले. अशी कोणती वस्तू आहे की लोकांना आनंदी ठेवते? जीडीपी की सोशल स्ट्रक्चर? या विचारामागे युएन किंवा अमेरिका नाही तर भारताशेजारील भूतान हा लहानसा देश होता. 1970 च्या दशकात भूतानचे राजे जिग्मे सिंगे वांगचुक यांनी आमच्यासाठी जीडीपी नाही तर ग्रॉस नॅशनल हॅपिनेस जास्त महत्वाचा आहे असे वक्तव्य केले होते. हाच विचार पुढे संयुक्त राष्ट्रापर्यंत पोहोचला.

भारतापेक्षा पाकिस्तान-बांगलादेशचे आनंदी लोक

आता प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या निकषांच्या आधारे विविध देशांत सर्वे होतात. यानंतर नंबरच्या आधारे रँकिंग दिली जाते. या रिपोर्टमध्ये सहा महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये तुमचा खिसा किती भरलेला आहे? संकटाच्या काळात तुमची कुणी मदत करतं का? किती वर्षे जगताल असे वाटते? तुम्ही तुमच्या जीवनातील मोठे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता का? दुसऱ्यांच्या बाबतीत तुम्ही उदार आहात का? तुमच्या देशात भ्रष्टाचार किती कमी आहेत?

सर्वेवर संशय का व्यक्त होतोय?

जवळपास दीडशे देशांत हॅपिनेस इंडेक्स पाहिला जातो. या यादीत मागील सात वर्षांपासून फिनलंड पहिल्या क्रमांकावर कायम आहे. डेन्मार्क, नॉर्वे, आइसलँडसारखे देश सुद्धा आघाडीवर राहिले आहेत पण फिनलंड नेहमीच टॉप राहिला आहे. इथपर्यंत ठीक आहे पण या कहाणीतही ट्विस्ट आहे. हा अभ्यास काही उपयोगाचा नाही असे आता अनेक देश म्हणू लागले आहेत. या रिपोर्टमध्ये भारताला पाकिस्तान आणि बांगलादेशच्या मागे दाखवले आहे.

सन 2023 च्या रिपोर्टमध्ये भारताची रँकिंग 126 होती तर पाकिस्तान आणि बांगलादेश भारताच्या पुढे होते. याआधीही असे काही वेळा घडले होते. अमेरिकी लोकांचे म्हणणे आहे की ते आर्थिकदृष्ट्या पुढे आहेत. अमेरिकेत स्थायिक व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. तरीही अमेरिकीची रँकिंग मागे चालली आहे. असे असले तरी अमेरिकी सरकारने या रिपोर्टला कोणतेही आव्हान दिलेले नाही. पण आश्चर्य आणि संताप मात्र व्यक्त केला आहे. वॉशिंग्टन येथील थिंक टँक देखील या रिपोर्टला वस्तुस्थितीपासून दूर मानतात.

विशेष म्हणजे आजमितीस फिनलंडमध्ये डिप्रेशनचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार फिनलंडच्या एकूण लोकसंख्येच्या 9 टक्के लोक मेजर डिप्रेशनच्या समस्येला तोंड देत आहेत. अशी परिस्थिती असताना फिनलंड हॅपी देश कसा असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

आत्महत्येचा विचार वाढला

युरोपियन युनियननेही एक धक्कादायक अहवाल जारी केला होता. यानुसार फिनलंडमधील लोकांत आत्महत्यांची प्रवृत्ती अन्य युरोपियन देशांच्या तुलनेत जास्त असल्याचं म्हटलं होतं. नव्वदच्या दशकात ही प्रवृत्ती कमी होती. म्हणजे त्यावेळचे लोक जास्त आनंदात असतील. परंतु नंतरच्या काळात ही समस्या पुन्हा वाढली. आता तर अशी परिस्थिती आहे की 14 ते 24 वर्षांच्या वयात होत असलेल्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यूचे कारण आत्महत्या हेच आहे. फिनलंडनेच स्वतःचे मूल्यांकन करून एक अहवाल काढला. इन द शॅडो ऑफ हॅपिनेस असे या अहवालाला नाव दिलं. यानुसार अतिशय कमी वयातील लोक सुद्धा स्वतःला संघर्ष करताना मानत आहेत. त्यांचं स्ट्रगल पुढेही सुरूच राहतं.

अखेर गाझा युद्ध संपलं! लवकरच होणार युद्धविराम; वाचा इस्त्रायल-हमास युद्धाची टाइमलाइन

कोणत्या कारणांमुळे येताहेत अडचणी

या समस्येवर मात करण्यासाठी येथे प्रयत्न सुरू आहेत. अनेक विभाग तयार केले असून हे विभाग लोकांच्या मेंटल हेल्थवर काम करत आहेत. परंतु अनेक समस्या आडकाठी आणत आहेत. येथील सोशल स्ट्रक्चर असे आहे की व्यक्ती कुटुंबात राहण्यापेक्षा एकटाच राहणे पसंत करतो. अशावेळी किरकोळ तणाव सुद्धा निराशेच्या गर्तेत ढकलण्यासाठी पुरेसा ठरतो. फिनलंडचं वातावरण देखील डिप्रेशनसाठी अनुकूल आहे. या देशात दीर्घकाळ टिकणारी थंडी असते. तसेच उन्हाळ्यात तापमान कमी जास्त होत राहते. प्रकाशाची कमतरता कमी वयापासूनच डिप्रेशनच्या सुरुवातीला कारणीभूत ठरते.

तसं पाहिलं तर मानसिक उपचारांसाठी फिनलंडमध्ये मोठी सबसिडी मिळते. शहरातील लोक दवाखान्यात लवकर पोहोचतात. पण दुर्गम भागातील नागरिक अनेक महिने ताटकळत राहतात. यामध्ये काय बदल करता येईल यावरून तेथील राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

follow us