देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीवेळी सर्वात अवघड गोष्ट कुठली ठरली असेल तर ‘अजित पवार (Ajit Pawar) यांना नेमके कशासाठी सोबत घेतले’ हे भाजपच्या (BJP) मतदारांना पटवून देणे. स्वतः फडणवीस यांनीही अनेक मुलाखतींमध्ये ही गोष्ट मान्य केली. अजित पवार महायुतीमध्ये आल्यानंतर भाजपच्या मतदारांना ही गोष्टच पचनी पडली नाही. पण नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी अजितदादांना सोबत घेतले आहे, असे उत्तर ते देत राहिले. शिवसेनेशी आपली भावनिक युती आहे तर अजित पवार यांच्यासोबतची राजकीय युती आहे, असे ते सांगत राहिले. आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पण ज्या मोदींचे हात बळकट करण्यासाठी फडणवीसांना सगळा आटापीटा केला, त्याच लोकसभा निवडणुकीत अजितदादांसह त्यांच्या आमदारांनी महायुतीची निराशा केल्याचे दिसून येते. (In 26 out of 39 MLA constituencies of NCP, Mahayuti candidates remained behind.)
जुलै 2023 मध्ये अजित पवार महायुतीमध्ये आले. त्यांच्यासोबत 40 आमदारही आले. आल्यानंतर दादा उपमुख्यमंत्री झाले, अर्थमंत्री झाले. सोबत आठ जणांना मंत्रिपदेही देण्यात आली. एवढ्या पाहुणचारानंतरही 40 पैकी केवळ आठच आमदार भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी उपयोगी ठरले. निलेश लंके यांनी साथ सोडल्यानंतर अजितदादांकडे 39 आमदार राहिले. यापैकी तब्बल 26 आमदारांच्या मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार पिछाडीवर राहिले. खुद्द अजित पवार यांनाही त्यांच्या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळवून देता आली नाही. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना 48 हजारांचे मताधिक्य मिळाले. याशिवाय दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ असे मंत्रीही महायुतीच्या उमेदवारांसाठी उपयोग शून्य ठरले. चार आमदार अगदीच काठावर पास झाले.
सुरुवात बारामतीपासूनच करु. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन आमदार येतात. यात स्वतः अजित पवार आणि दुसरे दत्तात्रय भरणे. अजित पवार यांना त्यांच्या बारामती मतदारसंघातून विधानसभेला एक लाख 81 हजार मतांची ऐतिहासिक आघाडी मिळाली होती. पण तेच अजित पवार स्वतःच्या बायकोला आघाडी मिळवून देऊ शकले नाहीत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना 48 हजारांचे मताधिक्य मिळाले. इंदापूरमध्येही दत्तामामा भरणे, भाजपचे हर्षवर्धन पाटील असे दिग्गज नेते असताना सुप्रिया सुळेंनी 25 हजारांचे लीड घेतले.
दुसरा मतदारसंघ शिरुर. इथे राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. यात आंबेगावचे वळसे पाटील मंत्री आहेत. तर जुन्नरमध्ये अतुल बेनके, खेड-आळंदीमध्ये दिलीप मोहिते, हडपसरमध्ये चेतन तुपे असे आमदार आहेत. पण या चारही मतदारसंघात अमोल कोल्हे यांना मोठी आघाडी मिळाली. राष्ट्रवादीच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभवाचे तोंड बघावे लागले. तिसरा मतदारसंघ मावळ. मावळमध्ये सुनील शेळके अगदीच काठावर पास झाले. ते शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना केवळ चार हजारांचेच लीड मिळवून देऊ शकले.
राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यात सहा आमदार आहेत. त्यानंतरही नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघातून शिवसेना, भाजपच्या उमदेवरांचा पराभव झाला. नाशिकच्या राजाभाऊ वाजे यांना सिन्नरमधून तब्बल एक लाख 27 हजारांचे लीड मिळाले. इथे राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आमदार आहेत. तर देवळालीमध्ये सरोज अहिरे यांनाही छाप पाडता नाही. दिंडोरीमध्ये भारती पवार यांना भाजपचे आमदार राहुल आहेर चांदवड आणि नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघातून आघाडी मिळाली. तर येवला, निफाड, दिंडोरी आणि कळवण इथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. इथूनच भारती पवार पिछाडीवर राहिल्या आणि राष्ट्रवादीचे भास्कर भगरे पुढे निघून गेले.
दिंडोरी आणि नाशिक मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या भूमिकेची बरीच चर्चा झाली. खरंतर छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघावर होल्ड असलेले बडे नेते. पण छगन भुजबळ भाजप आणि शिवसेनेच्या प्रचारात दिसत नाहीत, प्रचारात येत नाहीत, असा दावा महायुतीचे कार्यकर्ते करत होते. महायुतीसाठी भुजबळ यांनी या दोन्ही मतदारसंघात एकही जाहीर सभा घेतली नाही. येवल्यामध्ये भारती पवार प्रचाराला असतानाही भुजबळ येवल्यामध्ये नसायचे. लेट्सअप मराठीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भुजबळांना याबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते चिडले होते. त्यांनी याबाबत उत्तरही दिले नव्हते. आता येवल्यामधूनच भास्कर भगरे यांनी 13 ते 14 हजार मतांची आघाडी घेतली.
बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी राष्ट्रवादीची आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे आणि परळीमध्ये धनंजय मुंडे यांनी मोठी मदत झाली. पण माजलगावमध्ये पंकजा मुंडे यांना अगदीच काठावरची आघाडी मिळाली. तिथे प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मराठवाड्यात अन्य ठिकाणीही हीच अवस्था राहिली. लातूरमधील उदगीरमध्ये मंत्री संजय बनसोड हे भाजप उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना केवळ पाच हजारांची आघाडी मिळवून देऊ शकले. अहमदपूर मतदारसंघातही सुधाकर श्रृंगारे यांना आमदार बाबासाहेब पाटील यांची मदत झाली नाही. काँग्रेसच्या शिवाजीराव कळगे यांनी इथून अगदी सहज आघाडी घेतली. हिंगोलीतील राजू नवघरे यांच्या वसमत मतदारसंघातून बाबुराव कोहळीकर हे मायनसमध्ये राहिले.
विदर्भामध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. पण भंडारा-गोंदिया मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या राजू कारेमोरे आणि मनोहर चंद्रिकापुरे या आमदारांच्या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील मेंढे मोठ्या मतांनी पिछाडीवर पडले. गडचिरोलीमध्ये मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांच्या अहेरी मतदारसंघातून काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर राहिले. बुलढाण्यात राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा यांच्या मतदारसंघातून तर अपक्ष रविकांत तुपकर यांनी आघाडी घेतली. इकडे पश्चिम महाराष्ट्रात चंदगडमध्ये राजेश पाटील यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे शाहू महाराज पुढे राहिले. वाईमध्ये मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले सात हजारांनी मायनसमध्ये गेले. कोकणात शेखर निकम हेही भाजपच्या नारायण राणे यांना आघाडी मिळून देण्यात अपयशी ठरले.
पुसदमध्ये इंद्रनील नाईक, परळीमध्ये मंत्री धनंजय मुंडे, अंमळनेरमध्ये मंत्री अनिल भाईदास पाटील, अहमदनगरमध्ये संग्राम जगताप, वडगाव-शेरीमध्ये सुनील टिंगरे, पिंपरीमध्ये आण्णा बनसोडे, श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे, कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ असे काही मोजकेच आमदार आणि मंत्री महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळवून देण्यात उपयोगी ठरले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जो आटापीटा करुन, भाजपच्या मतदारांना नाराज करुन अजित पवार आणि त्यांच्या कंपूचा एवढा पाहुणचार केला, त्यांचा लोकसभा निवडणुकीत मात्र उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट होते. आता विधानसभेलाही राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. तिथे कसा निकाल राहणार हे लवकरच कळून येईल.