उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली आहे. (Bhujbal) राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवारांच्या उपस्थितीत रात्री हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली. या बैठकीत अजित पवार विरुद्ध छगन भुजबळांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालं.
काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत हे पक्षाची प्रतिमा चूकीची करते. पक्षाला किंमत मोजावी लागते, असं म्हणत अजित पवारांनी छगन भुजबळांच्या समोरच नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळ यांनी आझाद मैदान येथे मराठा जीआरबाबत मांडलेली भूमिका यावरून अजित पवार यांनी आमदारांच्या झालेल्या बैठकीत थेट नाराजी व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या, असा सूर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत पाहायला मिळाला. सध्या राज्याची आर्थिक स्थिती फार भक्कम नाही. तरी शेतकरी दिलासा देण्यासाठी पॅकेज दिले. त्यावरून विरोधकांनी आरोप केले तरी आपले सरकार काम करते हे जनतेला आवर्जुन सांगा, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या.
आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही; भुजबळांचा थेट अजित पवारांवर निशाणा
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत पुढील आठवड्यात जिल्हाध्यक्ष बैठक घेऊन अधिक चर्चा करणार असल्याचं देखील अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवार यांनी आमदार समवेत संवाद साधला. यावेळी कॅबिनेट बैठकीत नेमकं काय झालं, याची माहितीही दिली. सरकारकडून मराठवाड्याचा 8 जिल्ह्यातील नोंदी शोधण्याबाबत सांगितलं जात आहे. मराठा आरक्षणासाठी जो जीआर काढण्यात आला आहे, तो दाबाखाली काढण्यात आला आहे.
सरकारने ओबीसी समाजाची जी समिती निर्माण केलीय त्याबाबत देखील कोणतीही चर्चा झालेली नाही. हा जीआर काढण्यापूर्वी हरकती सूचना घेणं अपेक्षित होतं. मात्र, सरकारकडून ते देखील झालं नाही. हे मुद्दे आम्ही दिलेल्या पत्रात लिहिलेलं आहेत. या सोबतच हा जीआर रद्द करा, अशी मागणी छगन भुजबळांकडून करण्यात येतेय.
जीआरमध्ये तुम्ही कुणबी मराठा, मराठा कुणबी असं म्हणायला पाहिजे होतं. मात्र, तुम्ही जीआरमधे मराठा समाज असा उल्लेख केला आहे. एसईबीसी कायद्यानुसार आधीच 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले आहे, मराठा समाज शैक्षणिक आर्थिक मागास यासाठी हे आरक्षण दिलं आहे. पण, मराठा हा सामाजिक मागास नाही, अशीही छगन भुजबळांनी भूमिका स्पष्ट केली आहे.