भावनिक बारामतीत आज निकालाचा दिवस; मतमोजणीला सुरुवात पण विजय जल्लोष टळणार

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला यंदा केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिक पातळीवरही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 8

Today is the day of the verdict in emotional Baramati : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला यंदा केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिक पातळीवरही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. बारामतीच्या राजकीय इतिहासाला दिशा देणाऱ्या नेत्याच्या जाण्यामुळे ही निवडणूक आता एक औपचारिक प्रक्रिया न राहता, जनतेच्या भावना, आठवणी आणि अपेक्षा यांचा कस पाहणारी ठरली आहे.

आज होणाऱ्या मतमोजणीकडे बारामतीसह संपूर्ण तालुक्याचं आणि राज्याचं लक्ष लागलं आहे. बारामती शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून, त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे.

या मतमोजणीत बारामती तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणांमधील उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. जिल्हा परिषदेसाठी एकूण 31 उमेदवार, तर पंचायत समितीसाठी 43 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, निकालाकडे सर्व उमेदवारांसह समर्थकांचीही उत्सुक नजर लागून आहे. जिल्हा परिषद गटांमध्ये पणदरे गटात सर्वाधिक 9 उमेदवार रिंगणात असल्याने तेथे अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. निंबूत गटात 6, वडगाव निंबाळकर आणि नीरावागज गटात प्रत्येकी 5, तर सुपा आणि गुणवडी गटात प्रत्येकी 3 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

12 जिल्हे, 125 पंचायत समित्या आणि एकचं प्रश्न, सत्ता कोणाची, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

पंचायत समितीच्या गणांमध्येही चुरस कायम असून, वडगाव निंबाळकर आणि निंबूत गणांमध्ये प्रत्येकी 7 उमेदवार असल्यामुळे निकाल शेवटच्या फेरीपर्यंत रंगतदार ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पणदरे गणात 6, गुणवडी गणात 4, तर उर्वरित गणांमध्ये 2 ते 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली, तरी निकालाच्या दिवशी संभाव्य तणाव लक्षात घेता प्रशासनाने अतिरिक्त खबरदारी घेतली आहे. मतमोजणी केंद्रात केवळ अधिकृत प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार असून, निकाल जाहीर होताच सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर, बारामतीतून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बारामतीमध्ये कोणतीही विजयी मिरवणूक काढली जाणार नाही. विजय उत्सव साजरा न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे शहर आणि तालुक्यात सध्या शोकाकुल आणि भावनिक वातावरण असून, त्या पार्श्वभूमीवर विजय मिरवणूक, गुलाल उधळणे, फटाक्यांची आतिषबाजी किंवा कोणत्याही प्रकारचा जल्लोष होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. निकाल कितीही महत्त्वाचा असला, तरी संयम आणि शोकभावनेचा सन्मान राखण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.

एकूणच, आजचा दिवस बारामतीच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार का, हे निकालातून स्पष्ट होणार असून, भावनांचा सन्मान राखत शांततेत निकाल स्वीकारले जाणार आहेत.

follow us