ब्रेकिंग : चाकणकरांची रिक्त जागा भरली; वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी नाव जोडले गेल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय दबावामुळे त्यांनी हा राजीनामा दिला होता.
Vaishali Nagvade Appointed As NCP’s State Women’s Wing President : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्या वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी नागवडे यांना नियुक्तीपत्र देत नव्या जबाबदारीची घोषणा केली. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले होते. अखेर त्या जागी पक्षाने पुणे जिल्ह्यात मजबूत संघटनात्मक पकड असलेल्या वैशाली नागवडे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
अजित पवार यांच्या विश्वासातील नेत्या
मुळच्या दौंड तालुक्यातील वैशाली नागवडे या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. पुणे ग्रामीण भागात महिला संघटन उभारण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते. त्या अजित पवार यांच्या विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांच्याकडे महानंदा दूध महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पक्ष संघटनेत त्यांनी प्रभावी काम केल्यामुळे महिला आघाडीची धुरा त्यांच्याकडे देण्यात आल्याचे मानले जात आहे.
१९९९ मध्ये कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या कामानिमित्त राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नागवडे कुटुंबीयांची परिचय झाला. त्यानंतर वैशाली नलावडे यांची २००२ मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. २००५ मध्ये महानंदाच्या संचालिका ,२००७ मध्ये पंचायत समिती दौंडच्या सदस्यपदी, २००९ मध्ये राष्ट्रवादी पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा ,याच वर्षी महाराष्ट्र पंचायत राज महिला समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. २०१० मध्ये दुसऱ्यांदा महानंदाच्या संचालकपदी निवड झाली व २०१३ मध्ये राज्याच्या महानंदाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. याच वर्षी IVRI – बरेली , उत्तर प्रदेश या संस्थेच्या डायरेक्टर झाल्या.
रुपाली चाकणकर यांचे पद का गेले?
रुपाली चाकणकर यांनी २७ मार्च २०२६ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी नाव जोडले गेल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय दबावामुळे त्यांनी हा राजीनामा दिला होता. याआधी, याच कारणामुळे त्यांनी २० मार्च २०२६ रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा देखील राजीनामा सोपवला होता. मात्र, त्यांनी स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळत या प्रकरणाशी कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचा दावा केला आहे.
पक्षांतर्गत समीकरणांकडे लक्ष
वैशाली नागवडे या यापूर्वीही काही मुद्द्यांवर रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेला विरोध करत असल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. आता त्यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याने राष्ट्रवादीच्या महिला संघटनेत नव्या नेतृत्वाखाली संघटनबांधणीला गती देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.