Balasaheb Thorat : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीच्या अनेक मातब्बर उमेदवारांना पराभवला सामोरे जावे लागले त्यानंतर या उमेदवारांकडून ईव्हीएम (EVM) तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज दाखल करण्यात आले होते मात्र आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेतले आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी देखील अर्ज मागे घेतला होता.
तनपुरे पाठोपाठ थोरात व कळमकरांची माघार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले तर दुसरीकडे आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. यामधील काही पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम पडताळणी बाबत अर्ज दाखल करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे नगर जिल्ह्यातून अनेक अर्ज दाखल करण्यात आले होते मात्र आता याच बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात तसेच नगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी अर्ज दाखल केले होते. ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करत थोरात यांनी 14 मतदान केंद्रांवरील तर कळमकर यांनी 3 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तपासणी व पडताळणी करण्याची मागणी केली होती. यासाठी थोरातांनी तब्बल 6 लाख 60 हजार 800 रुपये तर कळमकर यांनी 1 लाख 41 हजार 600 रुपये शुल्क भरलेले आहे. मात्र, या दोन्ही उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे मंगळवारी अर्ज सादर केला. ईव्हीएम तपासणी व पडताळणीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेत असल्याचे अर्जात नमूद केले. तसेच तपासणीसाठी भरलेले शुल्क देखील परत मिळावे अशी मागणी केली आहे.
या आठ आमदारांच्या निवडीला आव्हान
नगर शहराचे नवनिर्वाचित आमदार संग्राम जगताप, शेवगाव पथार्डीच्या मोनिका राजळे, राहुरीचे शिवाजी कर्डिले, अकोल्याचे डॉ. किरण लहामटे, पारनेरसीचे काशिनाथ दाते व कोपरगावचे आशुतोष काळे, कर्जत जामखेडचे रोहित पवार, संगमनेरचे अमोल खताळ यांच्या निवडीस त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (छत्रपती संभाजीनगर) याचिका दाखल करुन आव्हान दिले आहे.
फोन खरेदीची सुवर्णसंधी, Redmi देत आहे ‘ह्या’ फोन्सवर बंपर सूट, पहा संपूर्ण लिस्ट
या उमेदवारांना अर्ज दाखल करता येतो
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीत पराभूत झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला संबंधित मतदार संघातील एकूण मतदान केंद्रांच्या 5 टक्के मतदान केंद्रांतील ईव्हीएम अर्थात मतदान यंत्राची तपासणीच्या मागणीस मान्यता आहे. त्यासाठी एका मतदान केंद्रातील ईव्हीएमच्या तपासणीसाठी 47 हजार 200 रुपये फी संबंधित उमेदवाराने आयोगाकडे मागणी अर्जासोबत जमा करणे बंधनकारक आहे.