Prajakt Tanpure On Nagar Manmad road : नगर-मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांचे होणारे मृत्यू यावरून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आक्रमक झाले आहेत. राहुरी येथे रास्ता रोको आंदोलन करत तनपुरे यांनी प्रशासनाला जाब विचारला. जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. जनतेच्या पैशांची लूट सुरू असून, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांसोबतच तपासणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असा थेट इशारा त्यांनी दिला.
यावेळी बोलताना तनपुरे (Prajakt Tanpure) म्हणाले, या रस्त्यावर दररोज अपघातांची (Accident) संख्या वाढली आहे. नागरिकांचे जीव जात आहे. त्यांच्या जीवाची काही किंमत आहे की नाही? वाहनधारकांच्या मृत्यूला हे अधिकारी वर्ग कारणीभूत असून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले (Nagar Manmad road) पाहिजे. नवीन टेंडर झाले असून खासदार निलेश लंके यांनी या रस्त्यासाठी दोनदा उपोषण केले आहे. आता रस्त्याचे काम होईल. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मागणी करत असतो. मात्र, काम मंजूर झाल्यानंतर अधिकारी म्हणून त्यांचे काम आहे की, ते काम योग्य झाले पाहिजे. याची काळजी घेतली पाहिजे, अशा शब्दांत तनपुरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
नगर मनमाड रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला, या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, एका पावसात ते खड्डे पुन्हा एकदा उघडे पडले. रस्ते व्यवस्थित राहिले नाही, याची जबाबदारी कोणाची आहे. जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. त्याचबरोबर खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे जीव जात आहे.
रस्त्याचे काम ज्या ठेकदाराने निकृष्ट केले. त्याचबरोबर या कामांची तपासणी ह्या अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने केली नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी प्राजक्त तनपुरे यांनी केली. गेल्या वर्षभरात हजारो नागरिकांचे जीव या निकृष्ट रस्त्यांमुळे जात आहे. एखाद्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा. जेणेकरून इतर यांचा धाक घेतील अन् कामे व्यवस्थित करतील.