अत्याचार प्रकरणात अभिषेक कळमकरला दिलासा नाही; अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत अभिषेक कळमकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

  • Written By: Published:
Untitled Design 9

No relief for Abhishek Kalamkar in torture case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरोधात एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. यू. जे. मोरे यांनी 12 फेब्रुवारी रोजी फेटाळून लावला.

याप्रकरणी शिरूर (जि. पुणे) येथील 25 वर्षीय विवाहित महिलेने 21 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित महिला खासगी कामानिमित्त अहिल्यानगर येथे आली असताना तिला सोशल मीडियावरून अभिषेक कळमकर यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. नोकरीच्या संदर्भात तिने त्यांच्याशी संपर्क साधला असता कळमकर यांनी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.

यानंतर काही दिवसांनी कळमकर यांनी एमआयडीसी परिसरात आपली शाळा असल्याचे सांगत ती दाखविण्याच्या बहाण्याने महिलेला बोलावले. तिला एका काळ्या रंगाच्या वाहनात बसवून एमआयडीसीकडे घेऊन जात असताना शीतपेय दिले, ज्यामुळे तिला गुंगी आल्यासारखे झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर सुमसाम ठिकाणी वाहन थांबवून जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास नोकरी मिळणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तिने फिर्यादीत नमूद केले आहे.

अजितदादांच्या विमान अपघातावरून दिल्ली दरबारात खळबळ; रोहित पवार यांची राहुल गांधींसोबत अर्धा तास चर्चा

याशिवाय, 18 फेब्रुवारी रोजी शिरूर येथील एका लॉजमध्ये बोलावून पुन्हा अत्याचार केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून अभिषेक कळमकर फरार असून त्यांच्या वतीने अॅड. विकास ढोकळे यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. यू. जे. मोरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान पीडितेचे वकील अॅड. विजय गुंदेचा तसेच सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. मनीषा केळगेंद्र यांनी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे सांगत अटकपूर्व जामीन देण्यास जोरदार विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत अभिषेक कळमकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

follow us