पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला; दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग

Parth Pawar Meets Sharad Pawar : सुनील तटकरेंच्या विलिनीकरणाच्या विधानानंतर पार्थ पवार थेट सिल्व्हर ओकवर पोहोचल्याने नवी चर्चा सुरू.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 07T191900.336

Parth Pawar Meets Sharad Pawar : राज्याच्या राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादीच्या (NCP) एकत्रिकरणाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. विशेष म्हणजे, पार्थ पवार यांच्यासोबत इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे विधान केले होते. त्यानंतर पार्थ पवार यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार सिल्व्हर ओकवर पोहोचले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित होते. त्यामुळे या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांच्या भेटीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून पुन्हा राजकीय वाद, रोहित पवारांचा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर निशाणा

दरम्यान, शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कफाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. त्यानंतर पार्थ पवार हे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटायला गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या भेटीची वेळ आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावरून सुरू असलेल्या चर्चांमुळे या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या आणि विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती, असे विधान सुनील तटकरे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकत्रिकरणाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र, त्यानंतर तटकरे यांनी पुन्हा भूमिका स्पष्ट करत विलिनीकरणाचा विषय संपला असून सध्या त्यावर कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे सांगितले. असे असतानाच पार्थ पवार यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणाबाबत पुढे काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

follow us