“पार्थ पवारच नेते, सर्वांना त्यांच्यासोबतच काम करावं लागेल…” संजय राऊतांचे मोठे विधान!
Sanjay Raut On Parth Pawar पार्थ पवार पक्षाला नेणार नव्या दिशेने; संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Sanjay Raut On Parth Pawar NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाची सर्व सूत्रे आता पार्थ पवार यांच्याकडे आहेत. ते पक्षाचे नेते असून, त्यांच्याच पद्धतीने आणि नेतृत्वाखाली सर्वांना काम करावे लागेल, असे मोठे विधान ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राऊतांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकार परिषदेत पार्थ पवार यांच्या भूमिकेवर स्पष्ट शब्दांत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “पक्षाची सर्व सूत्रे आता पार्थ पवार यांच्याकडे आहेत. ते पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत सर्वांना काम करावे लागेल.” पार्थ पवार सध्या अत्यंत आक्रमक आणि सुनियोजित पद्धतीने पक्ष पुढे नेत आहेत, असे नमूद करत राऊतांनी पुढे सांगितले की, पक्षात जर काही नवीन बदल किंवा गोष्टी करायच्या असतील, तर त्या आता त्यांच्याच पद्धतीने आणि निर्णयानुसार होतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षात पार्थ पवारांचे महत्त्व झपाट्याने वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे, अजित पवार गट आणि पक्ष विलिनीकरणाच्या चर्चांवर बोलताना राऊतांनी स्पष्ट केले की, अजित पवार गट काय बोलतो याला काहीही महत्त्व नाही, ते स्वतःच अडचणीत आहेत. शरद पवार हे इंडिया आघाडीचे मोठे स्तंभ असून, ते कधीही सत्तेत जाणार नाहीत. अजित पवार गटाने पुन्हा एकत्र यायचे की नाही, याचा अंतिम निर्णय खुद्द शरद पवारच घेतील, असे सांगत राऊतांनी महायुतीमधील फुटीच्या दाव्यांना बळ दिले.
डिलिमिटेशन विधेयकावरून सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. “होय, राजकीय कवायती सुरू आहेत आणि जाळीही फेकली जात आहेत; पण या जाळ्यात छोटा असो वा मोठा, कोणताही मासा सापडणार नाही. त्यांचा अपेक्षेप्रमाणे आकडा अजिबात पूर्ण होणार नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
सुनील तटकरेंवर सवाल आणि ईडीच्या कारवाईवर बोट
सुनील तटकरे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राऊत म्हणाले की, त्यांना अशी वक्तव्ये का करावी लागत आहेत? याचवेळी त्यांनी हसन मुश्रीफ आणि प्रफुल्ल पटेल यांच्या ईडीच्या केसेस निकालात निघाल्यावरून सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर उपरोधिक टीका केली. काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या 500 कोटींच्या क्लिप प्रकरणावर बोलताना राऊतांनी आरोप केला की, भाजप आणि शिंदेसेना मिळून एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. या संपूर्ण प्रकरणातून मनोज जरांगे काय भूमिका घेतात आणि कोणता मार्ग काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे ते म्हणाले.
अश्विनी भिडे यांचे पत्र आणि मुंबईतील ‘बिल्डर राज’
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत, बिल्डर्सच्या बेकायदेशीर दबावावरून राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांना जाब विचारत “मुंबईत मुख्यमंत्री नेमके कोणते राक्षस वाढवत आहेत?” असा संतप्त सवाल केला. याप्रकरणी आपण लवकरच पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.