10 नोव्हेंबरनंतर शरद पवार काय करणार? जयंत पाटलांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर स्पष्टच सांगितलं
NCP Merger : प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर शरद पवारांच्या पुढील भूमिकेबाबत चर्चा सुरू असतानाच जयंत पाटलांनी महत्वाची माहिती दिली.
NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (NCP) यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे. पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. पटेल आणि पवार यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून, त्यात दोघांमधील संवादात ’10 तारखेनंतर बोलू’ असा उल्लेख ऐकायला मिळत आहे. त्यामुळे 10 नोव्हेंबरनंतर शरद पवार कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार का, अशा चर्चांना सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांची प्रकृती ठीक असून, पटेल यांच्यासोबत त्यांची सुमारे 10 मिनिटं चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं. तसेच 10 नोव्हेंबरनंतर शरद पवार अलीबाग येथे एका कार्यक्रमासाठी जाणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
Maharashtra Politics : मोदींचा फोन ते पटेलांना 10 तारीख; पडद्यामागचा खेळ पवारांचा तर नाही?
विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नसल्याचं स्पष्ट केलं. याबाबत शरद पवार यांनी यापूर्वीच आपली भूमिका मांडली असून, सध्या केवळ अफवा पसरवल्या जात आहेत, असं ते म्हणाले. याशिवाय गोकुळ दूध संघातील निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. गोकुळमध्ये घेतलेला निर्णय लोकशाहीला अपेक्षित नसून कायद्याचा दुरुपयोग असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात दिवाळीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असं सांगतानाच महाविकास आघाडीचं भविष्य उज्ज्वल असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, शरद पवार यांना उद्यापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णालयातील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील व्यक्ती त्यांच्या भेटीसाठी पोहोचत आहेत. शुक्रवारी सकाळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी त्यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनीही भेट घेतली होती. आता उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यादेखील शरद पवार यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार असल्याची माहिती आहे.