तुफान प्रतिसादात पु. ल. कला महोत्सव 2026 चा दिमाखदार शुभारंभ, ‘ती दोघं’ अभिवाचनाने जिंकली प्रेक्षकांची मने!

‘पु. ल. कला महोत्सव 2026’ चा शुभारंभ गुरुवार प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 06T151910.812

Grand Inauguration of the P. L. Arts Festival 2026 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि कलाविश्वातील विविध कलाप्रकारांचा उत्सव असलेल्या ‘पु. ल. कला महोत्सव 2026’ चा शुभारंभ गुरुवारी (5 नोव्हेंबर) प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत या सांस्कृतिक सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसरात कला आणि संस्कृतीचा उत्साह अनुभवायला मिळाला.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी किरण कुलकर्णी सांस्कृतिक कार्य विभाग आणि मराठी भाषा विभागाचे सचिव, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर, पु.ल अकादमीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक करंजीकर, निधी चौधरी संचालक – नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित मान्यवर आणि रसिकांना दीपावली तसेच मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा, तिची प्रयोगशीलता आणि भारतीय रंगभूमीतील महत्त्व अधोरेखित केले. पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्राच्या साहित्य, संगीत आणि नाट्यक्षेत्राला दिलेले योगदान जतन व संवर्धन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बदलत्या काळात कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अकादमीमध्ये स्क्रीन अॅक्टिंग, संगीत-नाटक-परफॉर्मन्स आणि अॅप्रिसिएशन व क्युरेटिंग या तीन नवीन अभ्यासक्रमांची घोषणा केली. पुलोत्सव 2026 च्या आयोजनाचे कौतुक करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात तिघांना दिलासा, 25 हजारांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर

संचालिका मीनल जोगळेकर – आज मा. श्री. आशिष शेलार साहेबांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि आम्हाला प्रोत्साहन दिले, त्याबद्दल त्यांचे विशेष मनःपूर्वक आभार. आमच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक करंजीकर तसेच, सचिव किरण कुलकर्णी साहेबांचे आणि उपस्थित सर्व रसिकांचेही मनःपूर्वक आभार…. आपण सर्वांनी या महोत्सवाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल – सचिव किरण कुलकर्णी – महाराष्ट्राची मराठी रंगभूमी ही देशातील समृद्ध रंगभूमींपैकी एक असून, तिची परंपरा आणि लोकप्रियता मोठी आहे. मराठी कला, नाटक आणि संस्कृतीचा वारसा जतन करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून कलाकारांना प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि दर्जेदार सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्याचे काम सुरू आहे. हे उपक्रम महाराष्ट्राबरोबरच देश-विदेशात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. केवळ उत्सव साजरे न करता आपला सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करूया, असे आवाहन करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो.

महोत्सवातील पहिल्याच दिवसाचे खास आकर्षण ठरले ते ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी लिखित ‘ती दोघं’ हे अभिवाचन. विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. साहित्यकृतीतील आशय, भावभावना आणि नाट्यमयता अभिवाचनाच्या प्रभावी माध्यमातून रसिकांसमोर उलगडण्यात आली. कलाकारांच्या दमदार आवाजातील अभिव्यक्ती, संवादफेक आणि सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. या अभिवाचनात विद्याधर जोशी, सुप्रिया मतकरी विनोद, हृदया बोरकर, आदित्य कदम, योगेश उतरेकर, दीप्ती दांडेकर आणि विजय केंकरे यांनी सहभाग घेतला. सर्व कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे ‘ती दोघं’ या साहित्यकृतीचा अनुभव अधिक जिवंत झाला. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात रसिक प्रेक्षक पूर्णपणे रमून गेले. अभिवाचनाच्या प्रत्येक पैलूला मिळालेला प्रतिसाद कलाकारांचा उत्साह वाढवणारा ठरला.

Maharashtra Politics : मोदींचा फोन ते पटेलांना 10 तारीख; पडद्यामागचा खेळ पवारांचा तर नाही?

शुक्रवार, 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत दिव्यांग कलाकारांचा ‘नमो भारत! वंदे मातरम्’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. कांचन सोनटक्के यांची निर्मिती संकल्पना असून, भारत मोरे यांनी या प्रयोगाचे दिग्दर्शन केले आहे. रोटरी संस्कारधाम अंधकेंद्राचे 27 दिव्यांग कलाकार या प्रयोगात सहभागी होणार आहेत. त्याच दिवशी रात्री 8 ते 10 या वेळेत ‘हसता-हसवता’ या काव्य, शब्द आणि नाट्याची हासरी मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमात वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, अधोक्षज क-हाडे, श्रीरंग भावे आणि दीपाली देसाई सहभागी होणार असून, मुकेश माचकर यांनी या कार्यक्रमाची संहिता लिहिली आहे.

महाराष्ट्राच्या कलाविश्वातील नामवंत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच नव्या कलाविष्कारांची ओळख करून देण्याचा उद्देश या महोत्सवातून साध्य होत आहे. पहिल्याच दिवशी मिळालेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद पाहता आगामी कार्यक्रमांबाबतही रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. एकूणच, ‘पु. ल. कला महोत्सव 2026’ ची सुरुवात संस्मरणीय ठरली असून, ‘ती दोघं’ या अभिवाचनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाला विशेष रंगत आणली. विशेष म्हणजे, ‘पु. ल. कला महोत्सव’ आणि ‘ती दोघं’ या अभिवाचनाला लाभलेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्रातील समृद्ध कला-साहित्य परंपरेवरील प्रेक्षकांच्या प्रेमाची साक्ष देणारा ठरला. विविध कलाप्रकार, साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा संगम घडवून आणणाऱ्या या महोत्सवाने पहिल्याच दिवशी वातावरणात सांस्कृतिक रंग भरले.

follow us