राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात तिघांना दिलासा, 25 हजारांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर

प्रकरणातील आरोपी लता हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 06T150322.317

Bail granted to three individuals in the Vaishnavi Hagwane case : राज्यभर गाजलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महत्वाची न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी लता हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने सासह्रत जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, जामीन मंजूर करताना न्यायालयाने तिघांवर काही महत्वाच्या अटी घातल्या आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार, तिन्ही आरोपींना प्रकरणातील साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकता येणार नाही. तसेच खटल्याशी संबंधित पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. याशिवाय पुढील सहा महिने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी बावधन पोलीस ठाण्यात हजेरी लावणे तिघांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर या आदेशाला तीन आठवड्यांची स्थगिती द्यावी, अशी मागणी तक्रारदाराच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. त्याचवेळी जामीन मंजूर होणे म्हणजे आरोपींची निर्दोष मुक्तता नव्हे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तिघांना जामीन मिळाला असला, तरी त्यांच्यावरील आरोप आणि मुख्य खटल्याची सुनावणी कायम राहणार आहे.

वैष्णवी शशांक हगवणे यांचा विवाह 28 एप्रिल 2023 रोजी झाला होता. लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला होता. या छळाला कंटाळून वैष्णवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप देखील सासरच्या मंडळींवर करण्यात आला होता.

गोकुळच्या अध्यक्षपदावरून हसन मुश्रीफांची सतेज पाटलांना थेट ऑफर, शासननियुक्त संचालकांमुळे सत्तासंघर्षाला नवे वळण

16 मे 2025 रोजी मुळाशी तालुक्यातील भूगाव येथील सासरच्या घरात वैष्णवी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. वैष्णवी यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात वैष्णवी यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्याचे समोर आले होते. त्यामुळे हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांचे गांभीर्य अधिक वाढले होते.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचा तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आला. जुलै 2025 मध्ये पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर सत्र न्यायालयात आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आणि फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. आता नोव्हेंबर 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने लता हगवणे, सुशील हगवणे आणि नीलेश चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील न्यायालयीन घडामोडींना पुन्हा वेग आला आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तिन्ही आरोपींना दिलासा मिळाला असला, तरी प्रकरणातील न्यायालयीन लढाई संपलेली नाही. साक्षीदारांवर दबाव न टाकणे, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप न करणे आणि नियमित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे या अटींचे पालन करणे आरोपींना बंधनकारक असेल. जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याने आता मुख्य खटल्याच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वैष्णवी हगवणे यांना न्याय कधी मिळणार आणि या प्रकरणात पुढे काय निकाल लागणार, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

follow us