‘शिंदेंच्या शिवसेनेत तीन एकनाथ शिंदे’; संजय राऊतांचा दावा, फडणवीस-अमित शाहांवरही साधला निशाणा
Sanjay Raut Three Eknath Shinde Claim: एकनाथ शिंदेंच्या पक्षातच तीन 'एकनाथ शिंदे' असल्याचे सांगत राऊतांनी राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले.
Sanjay Raut Three Eknath Shinde Claim: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील अंतर्गत घडामोडींवरून मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातच तीन ‘एकनाथ शिंदे’ सक्रिय असल्याचे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले. यातील दोन नेते आपल्या संपर्कात आल्याचा दावाही राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटावरही टीका केली.
‘आमच्याकडे एकच एकनाथ शिंदे होते, आता तिथे तीन’
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या पक्षात तीन एकनाथ शिंदे आहेत. थोडी चौकशी केली तर हे कोण आहेत, हे समोर येईल. आमच्याकडे एकच एकनाथ शिंदे होते, पण आता तिथे तीन एकनाथ शिंदे निर्माण झाले आहेत.”
या तीन नेत्यांपैकी दोघे आपल्या गटाच्या संपर्कात आल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यांनी आपली व्यथा मांडत पाठिंबा मागितल्याचेही राऊत म्हणाले. “राजकीय परिस्थिती बदलली आहे आणि आमच्याकडून चूक झाली,” अशी कबुली या नेत्यांनी दिल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या नेत्यांची नावे राऊत यांनी स्पष्ट केली नाहीत.
फडणवीस आणि अमित शाहांवर आरोप
शिंदे गटातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत यांनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. कोणाला अधिकार द्यायचे, पक्षातील निर्णय कसे घ्यायचे, हे दोघे ठरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Sugarcane Agitation : 30 तास उलटले तरी तोडगा नाही; ऊस आंदोलनाची धग वाढली..आता पर्यायी मार्गही रोखले!
“देवेंद्र फडणवीस एका शिंदेंना पाठिंबा देत आहेत, तर अमित शाह दुसऱ्या शिंदेंना साथ देत आहेत,” असा दावा राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ताळमेळ नसल्याचेही ते म्हणाले. सार्वजनिक कार्यक्रमांत दोघे एकत्र दिसत असले, तरी पडद्यामागे एकमेकांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
‘सुनेत्रा पवार यांचा गटही विखुरू शकतो’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, हा आणि शिंदे गट हे स्वतंत्र विचारधारेवर उभे नसलेले पक्ष आहेत. अमित शाह यांनी तयार केलेले हे गट असून, त्यांचे अस्तित्व केंद्र सरकारच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटही लवकरच विखुरला जाऊ शकतो, असा दावा राऊत यांनी केला.
कायदा-सुव्यवस्थेवरून फडणवीसांना लक्ष्य
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरूनही संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. अभिनेता तुषार कपूरला मिळालेल्या कथित खंडणीच्या धमकीचा आणि बिश्नोई गँगच्या धमकीनंतर अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महानायकाला बुलेटफ्रुप कांचांमध्ये फिरावे लागत आहे. हे गृहमंत्री म्हणून फडणवीसांचे अपयश आहे. ते कुचकामी झाले आहेत, असे राऊत म्हणाले.
बुलडोझर चालला, पण पगार मिळणार का? आयुक्त अश्वीनी भिडे यांच्या अडचणी संपल्या की वाढल्या?
राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत राऊत म्हणाले की, सामान्य नागरिक आणि कलाकारांना असुरक्षित वाटत असताना व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. हे गृहमंत्री म्हणून फडणवीसांचं अपयश आहे, असा आरोपही त्यांनी केला.