शिवसेना सुनावणीवरून आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला; खोक्यांचं राजकारण जनतेने पाहिलंय

Aaditya Thackeray : शिवसेना वादावर न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 04T161504.239

Aaditya Thackeray : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर (Shivsena) उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी न्यायालयात आपली बाजू मांडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. दिवाळीनंतर ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत न्यायालयात दोन्ही बाजूंनी मांडलेली भूमिका जनतेपर्यंत पोहोचली असल्याचंही ते म्हणाले.

न्यायालयातील सुनावणीसोबतच या प्रकरणाचा निकाल जनतेच्या दरबारातही लागणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. जनतेने दोन्ही बाजूंचे म्हणणं ऐकलं आहे आणि आपला निर्णय जनता देईल, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आमदारांच्या पक्षांतरावरून शिंदे गटाला लक्ष्य केलं. खोके देऊन आमदार कसे विकत घेतले गेले आणि राज्यात खोक्यांचं राजकारण कसं झालं, हे जनतेने पाहिलं असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी सुरू; समितीकडून क्लिपची मागणी, जरांगेंनी घातली अट

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. या संभाषणादरम्यान सुप्रिया सुळे आणि आपण मिळून देश चालवू, असं मोदी यांनी म्हटल्याची चर्चा आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारलं असता, आपण दोघांमधील संभाषण ऐकलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या चर्चेवर भाष्य करण्याऐवजी त्यांनी आपली भूमिका मर्यादित ठेवली.

शरद पवार यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात चांगल्या भावना आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र, फोनवरील नेमकं संभाषण काय झालं, याची आपल्याला माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, दुसरीकडे मोदी आणि पवार यांच्या फोनवरील चर्चेमुळेही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

follow us