सुप्रिया अन् आम्ही देश सांभाळू, तुम्ही आशिर्वाद द्या…PM मोदींचा शरद पवारांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना फोन करुन तब्येतीची विचारपूस केली आहे. फोनमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा.
PM Narendra Modi On Sharad Pawar : देश पातळीवरील राजकारणातून मोठी बातमी समोर आलीयं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना फोन करुन तब्येतीची विचारपूस केली आहे. तुम्ही काळजी करु नका, सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही आशिर्वाद द्या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना म्हटलंय. मोदी यांनी शरदद पवार यांना फोन करुन तब्येतीची विचारपूस केल्याने राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत. PM मोदींच्या या एका फोनमुळे शरद पवार एनडीएसोबत जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.
शरद पवारांचे विश्वासू सहकारी विठ्ठल मणियार यांनी माध्यमांसमोर ही प्रतिक्रिया दिलीयं. मणियार म्हणाले, शरद पवार यांना पंतप्रधान मोदींचा फोन आला होता, अत्यंत काळजीने प्रेमाने पवारांनी प्रकृतीची चौकशी केली. शरद पवार यांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला मोदींनी दिला. तुम्ही देशासाठी आतापर्यंत काम करत आला आहात. सुप्रियाताईही चांगलं काम करत आहे. तुम्ही आता आराम करा. सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू. तब्येतीची काळजी घ्या आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठणठणीत राहा, असं मोदी पवारांना म्हणाल्याचं विठ्ठल मणियार याांनी सांगितलं. त्यावर मी तब्येतीची काळजी घेत आहे. तुम्ही सर्व असल्याने मला काही चिंता नाहीये. मी तब्येतीची काळजी घेतो, असं पवारांनी मोदींना सांगितल्याचंही मणियार यांनी सांगितलंय.