सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ईश्वरी चिठ्ठीचा कौल; सुनील माने विजयी, सुनील खत्रींचा निसटता पराभव
Satara District Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या कोरेगाव मतदारसंघातील लढतीत मतांची बरोबरी झाल्यानंतर निकालासाठी ईश्वरी चिठ्ठी.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Bank) कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघातील लढतीचा निकाल अखेर ईश्वरी चिठ्ठीने ठरवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने आणि भाजपचे सुनील खत्री यांना मतमोजणीनंतर प्रत्येकी 44 मते मिळाली होती. एका मतपत्रिकेच्या वैधतेवरून निर्माण झालेल्या वादामुळे निकालाला अनपेक्षित वळण मिळालं आणि दोन्ही उमेदवारांमध्ये बरोबरी झाली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ईश्वरी चिठ्ठी टाकून निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 9 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 12 जागांसाठी रविवारी 1 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. सोमवारी झालेल्या मतमोजणीत कोरेगाव सोसायटी मतदारसंघातील निकालाकडे विशेष लक्ष लागलं होतं. कारण या मतदारसंघातून एकमेकांचे जिवलग मित्र असलेले सुनील माने आणि सुनील खत्री आमनेसामने आले होते. त्यामुळे या दोघांपैकी मतदार कोणाला पसंती देतात, याची उत्सुकता होती.
सांगली जिल्हा बँकेच्या निकालात रोहित पाटील गटाला दोन धक्के; सुमनताईंचा पराभव, घोरपडे विजयी
मतमोजणीच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने यांना 45, तर भाजपचे सुनील खत्री यांना 44 मते मिळाली होती. मात्र, माने यांच्या एका मतपत्रिकेवर आक्षेप घेण्यात आला. संबंधित मतपत्रिका फाटलेली असल्याने विरोधकांनी तिच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ते मत बाद ठरवलं. त्यामुळे माने यांची मतसंख्या 44 वर आली आणि दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने निकालाचा पेच निर्माण झाला.
मतांची बरोबरी झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ईश्वरी चिठ्ठीच्या माध्यमातून विजयी उमेदवार निश्चित केला. या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने यांच्या बाजूने कौल लागला आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे कोरेगाव सोसायटी मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली, तर भाजपचे सुनील खत्री यांना पराभव स्वीकारावा लागला.