Saawan Aaya Hai : आयुष्यमान खुराना अन् शर्वरीच्या’सावन आया है’मधून पावसाळी प्रेमाची जादू…
पावसाळी प्रेमाची जादू असलेलं सूरज बडजात्या निर्मित 'सावन आया है' रोमॅंटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Saawan Aaya Hai : पाऊस आणि प्रेम यांचे नाते हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच खास राहिले आहे. या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम पडद्यावर साकारण्याची कला फार कमी दिग्दर्शकांना अवगत आहे आणि सूरज आर. बडजात्या हे त्यापैकी एक आहेत. हम आपके हैं कौन..! चित्रपटातील ‘ये मौसम का जादू है मितवा’ या गाण्यापासून ते हम साथ साथ हैं चित्रपटातील ‘म्हारे हिवड़ा में नाचे मोर’ या गाण्यातील पावसाळी दृश्यांपर्यंत, त्यांच्या चित्रपटांमध्ये संगीत आणि प्रेम यांना नेहमीच विशेष महत्त्व राहिले आहे. आता आपल्या आगामी ये प्रेम मोल लिया या चित्रपटातील ‘सावन आया है’ या नव्या रोमँटिक गाण्यातून सूरज बडजात्या पुन्हा एकदा प्रेम आणि पावसाचा सुंदर अनुभव प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत.
आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे पावसाच्या सुंदर पार्श्वभूमीवर प्रेमाचा उत्सव साजरा करते. दिवाळीच्या आठवड्याच्या पार्श्वभूमीवर हे गाणे प्रदर्शित होत असून, सणाच्या तयारीसोबतच घराची साफसफाई करताना संपूर्ण कुटुंब एकत्र येण्याचा आनंदही यातून दाखवण्यात आला आहे. गाण्यात आयुष्मान आणि शर्वरी पावसात एकमेकांसोबत सुंदर क्षण घालवताना दिसतात. त्यांच्या नजरा, हलकेसे हास्य आणि एकमेकांबद्दलचे आकर्षण जुन्या हिंदी चित्रपटांमधील रोमँटिक शैलीची आठवण करून देते. कोणतेही शब्द न वापरता केवळ नजरेतून आणि सुंदर क्षणांतून प्रेम व्यक्त करणारे हे गाणे आहे.
हिमेश रेशमिया यांनी या गाण्याला संगीत दिले असून, श्रेया घोषाल आणि केशव आनंद यांनी ते गायले आहे. तर मयूर पुरी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. श्रेया घोषाल यांचा भावपूर्ण आवाज आणि हिमेश रेशमिया यांचे मधुर संगीत यांचा सुंदर मेळ या गाण्यात पाहायला मिळतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार रोमँटिक गाण्यांची परंपरा पुढे नेणारे हे गाणे ठरणार आहे. सूरज बडजात्या यांच्या चित्रपटांमधील संगीताने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता या गाण्याच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा संगीताची तीच जादू अनुभवायला देणार आहेत.
बॉलिवूडमध्ये पहिल्या मोठ्या यशाला तीन दशके पूर्ण झाल्यानंतर सूरज बडजात्या पुन्हा एकदा आपल्या खास कौटुंबिक आणि रोमँटिक शैलीतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यावेळी आयुष्मान खुराना आणि शर्वरी नव्या प्रेम आणि प्रेमकथेची झलक पडद्यावर साकारताना दिसणार आहेत. या गाण्यात चित्रपटातील इतर कलाकारांचीही झलक पाहायला मिळणार आहे.
गीता अग्रवाल शर्मा, कृष राव आणि अश्नूर कौर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘सावन आया है’ हे गाणे उद्या प्रदर्शित होणार आहे. सूरज आर. बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती राजश्री प्रॉडक्शन्सने महावीर जैन फिल्म्सच्या सहकार्याने केली आहे. ये प्रेम मोल लिया हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.