पडळकरांची एन्ट्री अन् जिल्हा बँकेत सत्तेचा पेच, जयंत पाटलांचे गणित बिघडलं; वाचा, संपूर्ण यादी

Sangli District Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निकालात दोन्ही आघाड्यांची ताकद समान ठरल्याने सत्तेची चावी आता एका अपक्षांच्या हातात.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 03T181737.635

Sangli District Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्तास्थापनेच्या (Election) गणिताला वेगळे वळण मिळाले आहे. 21 सदस्यीय संचालक मंडळात महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी 10 जागा मिळाल्याने दोन्ही बाजूंचे संख्याबळ समान झाले आहे. बहुमतासाठी 11 संचालकांची अपक्ष  गरज असल्याने आता तासगावमधून अपक्ष म्हणून विजयी झालेले माजी खासदार संजयकाका पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यांच्या एका मतावर बँकेचे अध्यक्षपद आणि सत्तेचे गणित अवलंबून असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

निवडणुकीतील महत्त्वाच्या लढतींमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत सोसायटी गटातून काँग्रेसचे विनोद पवार यांचा 20 मतांनी पराभव केला. पडळकर यांना 54, तर पवार यांना 34 मते मिळाली. तासगाव सोसायटी गटात संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा अवघ्या 1 मताने पराभव केला. संजयकाका यांना 39, तर सुमनताईंना 38 मते मिळाली. कवठेमहांकाळमध्ये अजित पवार गटाचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी शरद पवार गटाचे टी. व्ही. पाटील यांचा 4 मतांनी पराभव केला. घोरपडे यांना 37, तर टी. व्ही. पाटील यांना 33 मते मिळाली. मिरजमध्ये काँग्रेसचे अण्णासाहेब कोरे यांनी भाजपचे अनिल शेगूनशे यांचा 26 मतांनी पराभव केला. कोरे यांना 47, तर शेगूनशे यांना 19 मते मिळाली.

विजयानंतर गोपीचंद पडळकर यांनी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. खांद्यावर घोंगडे, हातात काठी, डोळ्यांवर गॉगल आणि पारंपरिक धनगरी वेशभूषा अशा थाटात ते थेट बँकेच्या दारात पोहोचले. यावेळी ‘बाप तो बाप रहेगा’ आणि ‘मै हूँ डॉन’ या गाण्यांवर त्यांनी समर्थकांसह ठेका धरला. विजयानंतर बोलताना पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली. “मला बाजूला ठेवून बिनविरोधची खेळी खेळली जात होती. मात्र, जतच्या जनतेने विरोधकांना टप्प्यात आणून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे,” असे ते म्हणाले.

सांगली जिल्हा बँकेच्या निकालात रोहित पाटील गटाला दोन धक्के; सुमनताईंचा पराभव, घोरपडे विजयी

पडळकर यांच्या विजयानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनीही जयंत पाटील यांना लक्ष्य केले. “प्रस्थापितांच्या चिरेबंद वाड्याला पडळकरांच्या विजयाने मोठा तडा दिला आहे. वाळव्याच्या नेत्याने जिल्हा बँकेला ‘अलीबाबाची गुहा’ बनवले होते. पण आता या गुहेतील टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आमचा वाघ आत शिरला आहे. वाळव्याच्या गब्बरसिंगाने आता सावध राहावे,” असा टोला खोत यांनी लगावला. दुसरीकडे, कवठेमहांकाळमधून विजयी झालेले अजित पवार गटाचे नेते अजितराव घोरपडे यांनीही जयंत पाटील यांच्यावर षड्यंत्र रचल्याचा आरोप केला. “माझ्याविरोधात मोठा कट रचला गेला होता, वरून ऑर्डर आली होती. मात्र, कट पूर्ण झाला नाही. या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड झाले असून याचे पडसाद आगामी काळात इतर पक्षांवर नक्कीच दिसतील,” असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही आघाड्यांकडून पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे, तर महायुतीकडून पडळकर, घोरपडे यांच्यासह प्रमुख नेते सक्रिय झाले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी 10 संचालक असल्याने संजयकाका पाटील कोणाला पाठिंबा देणार, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी महायुतीला साथ दिल्यास भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाला बहुमत मिळू शकते, तर महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गटाची सत्ता येऊ शकते. त्यामुळे सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेची चावी कोणाच्या हातात जाणार, याचा फैसला संजयकाका पाटील यांच्या भूमिकेवर होणार आहे.

10 विरुद्ध 10 एका मताची निर्णायक भूमिका

सांगली जिल्हा बँकेतील आघाड्यांचे पक्षनिहाय संख्याबळ पुढीलप्रमाणे आहे.

महाविकास आघाडी (एकूण 10 जागा):
– काँग्रेस : 06
– राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) : 04

महायुती (एकूण 10 जागा)

– भारतीय जनता पक्ष (भाजप) : 05
– शिवसेना (शिंदे गट) : 03
– राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 02
अपक्ष (निर्णायक 1 जागा):

– माजी खासदार संजयकाका पाटील : 01

follow us