गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटील यांचा महायुतीला इशारा; लोकशाही प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्न
Gokul Milk Union Election : गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या राजकीय संघर्षाला आता लोकशाहीचा मुद्दा पुढं करत सतेज पाटलांनी पत्र लिहलं आहे.
Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड (Gokul) रखडल्याने कोल्हापूरमधील राजकीय संघर्षाला नवं वळण मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या भूमिकेवर टीका करत लोकशाही प्रक्रियाच अडवली जात असल्याचा आरोप केला. निवडणुकीत पराभव स्वीकारण्याऐवजी अध्यक्ष निवडीची सभा होऊ न देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आज गोकुळमध्ये घडणारा प्रकार उद्या इतर कोणत्याही सहकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत घडू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. जनतेने मतदानातून दिलेला कौल तांत्रिक कारणांनी रोखला जात असेल तर निवडणुकांचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला 25 पैकी 13 जागा देत बहुमत दिलं आहे, असा दावा सतेज पाटील यांनी केला. मात्र, 29 ऑक्टोबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेल्या सभेला महायुतीचे सर्व 12 संचालक अनुपस्थित राहिले. परिणामी आवश्यक गणपूर्ती होऊ शकली नाही आणि सभा तहकूब करावी लागली. निवडणुकीत मिळालेला पराभव स्वीकारण्याऐवजी प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यासाठीच संचालक गैरहजर राहिल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत ट्विस्ट ! कोरभअभावी सभा तहकूब पण चुयेकरांची अध्यक्षपदी निवड
गोकुळमधील सत्तेचं गणित बदलण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची किंवा शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याची चर्चा सुरू असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. एखाद्या संस्थेतील बहुमत बदलण्यासाठी कायद्यातच बदल करायचे असतील तर मग निवडणुका घेण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गोकुळमध्ये असा निर्णय घेतला गेल्यास भविष्यात महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही स्वीकृत सदस्यांच्या माध्यमातून निवडणुकीतून मिळालेला जनतेचा कौल बदलण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गोकुळमध्ये प्रशासकीय कारभाराच्या काळात तोटा वाढत असताना दुष्काळ आणि चाऱ्याच्या समस्येवर निर्णय घेण्यासाठी लोकनियुक्त संचालक मंडळच अस्तित्वात नसणं ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. महायुतीच्या संचालकांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला कौल स्वीकारून पुढील अध्यक्ष निवडीच्या सभेला उपस्थित राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. आम्ही कायद्याच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने लढणार आहोत, मात्र गोकुळमध्ये आज घडणारा प्रकार उद्या कोणत्याही संस्थेत घडू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.