मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शरद पवारांचा विजयी ‘प्रताप’, महायुतीचे सतीश चव्हाण यांचा पराभव, 18 वर्षांचा गड खालसा

Marathwada Graduate Constituency Election : सलग 18 वर्षं मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या सतीश चव्हाणांना यंदा पराभवाचा धक्का.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 28T220954.737

Marathwada Graduate Constituency Election : राज्यातील पाच विधानपरिषद निवडणुकांचा (Election) निकाल जाहीर झाला, असून महायुतीला तीन जागांवर विजय मिळाला, तर महाविकास आघाडीने दोन जागा जिंकल्या आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात धक्कादायक निकाल समोर आला आहे. सलग 18 वर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सतीश चव्हाण यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी चव्हाण यांचा दारून पराभव केला आहे. हा पराभव केवळ दोन उमेदवारांमधील लढतीचा निकाल नाही, तर 18 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा हिशेब, महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि जिल्ह्याच्या राजकारणातील बदलती समीकरणांचा परिणाम असल्याचं चित्र आहे.

महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी निवडणुकीत बदलाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी त्यांच्या प्रचारासाठी घेतलेला पुढाकारही महत्त्वाचा ठरला. सलग तीन टर्म एकाच नेतृत्वाला संधी दिल्यानंतर आता नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी भूमिका काही मतदारांनी स्वीकारली. चव्हाण यांच्याविरोधातील नाराजीला पर्याय देण्यात प्रतापसिंह पाटील यांना यश आलं अशीच चर्चा आहे. प्रताप पाटील यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे, पदवीधरचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी किसान सेलचे जगन्नाथ काकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी गुलाल विजयाचा जल्लोष साजरा केला.

चव्हाण यांच्या पराभवाची जास्त चर्चा

सलग तीन टर्म आमदार राहिल्यामुळं सतीश चव्हाण यांच्यासमोर यंदा 18 वर्षांच्या कामाचा हिशेब देण्याचं आव्हान होतं. ‘इतकी वर्षे प्रतिनिधित्व करून पदवीधरांसाठी नेमकं काय केलं?’ हा सवाल विरोधकांनी वारंवार उपस्थित केला. चव्हाण यांनी आपल्या कामांचा लेखाजोखा मांडला असला, तरी दीर्घकाळ सत्तेत राहिल्यानंतर निर्माण होणारी नाराजी अर्थात अँटिइन्कम्बन्सीचा त्यांना फटका बसला.

जिल्ह्याच्या राजकारणातील वाढता हस्तक्षेप काही स्थानिक नेत्यांना खटकला का? असाही मुद्दा उपस्थित होत आहे. महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाच्या दोन नेत्यांनी थेट विरोधी भूमिका घेतली होती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक राजकीय मतभेदांमुळं महायुतीची एकत्रित ताकद त्यांच्या मागं उभी राहिली नाही असंही बोललं गेलं.काही नेत्यांची नाराजी आणि कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता मतांच्या गणितावर परिणाम करणारी ठरली असण्याची शक्यता आहे.

follow us